'समीक्षेची अपरूपे' (२०१७) हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षग्रंथ असून तो हर्मिस प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथात प्राचीन आणि अर्वाचीन अशा साहित्यकृतींची व लेखकांची समीक्षा केली आहे. या समीक्षेत लेखकाचे व्यक्तिमत्त्व, साहित्यकृतीचे स्वरूप आणि तिचे अनन्यसाधारण वैशिष्ट्ये यांचा शोध घेतला आहे. उदा. चक्रधरांचा दृष्टांत हा आधुनिक कथारूप कसा आहे, तुकारामाचा, जनाबाईचा अभंग भावकविता कशी आहे इत्यादी वेध या समीक्षेत आहे. चक्रधरांचा 'परिसाचा दृष्टांत: कथातत्त्वाचे आकलन', ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील रूपकांचा शोध, तुकारामातील लोकशिक्षक हे विषय त्यांनी यात उलगडले आहेत. याशिवाय ग्रंथात 'कुसुमाग्रजांचा साहित्यविचार', 'मुक्तिबोधांचा साहित्यविचार', 'मुक्तिबोधांचा मानुषतेचा सिद्धांत', 'दभि : साहित्यविचार आणि समीक्षा', 'अक्षयकुमार काळे यांची मर्ढेकर समीक्षा', 'काय डेंजर वारा सुटलाय आणि उत्तर आधुनिकता', 'दोन फुल एक हाफ : मराठी समाजाची सांस्कृतिक समीक्षा', 'टाइमपास : आत्मचरित्राच्या पलीकडे', 'दिंडीभ्रष्टाचाराची : तपशीलप्रधान कादंबरी', 'जागतिकीकरण आणि ग्रामीण साहित्याच्या दिशा', 'सीमेवरचा भाषा संसार' हे लेख आहेत.