सनई-चौघडा ही मंदिरात किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरच्या ओट्यांवरून वाजणारी आणि लग्नसमारंभ, उद्‌घाटन समारंभ यांसारख्या मंगल प्रसंगी वाजणारी वाजणारी वाद्यांची जोडगोळी आहे. सनई, संबळ, सूर धरणारी पेटी आणि चौघडा या सर्वांच्या एकत्रित वादनाला वाजंत्री म्हणतात.

चौघडा वादन

लग्नातल्या मंगलाष्टकांच्या अंतिम ओळी म्हणून झाल्या की ‘वाजवा रे वाजवा’ घोष आणि त्यानंतर वाजंत्री वादन सुरू होई. मंगलकार्य संपन्न झाले, असे जाहीर करणाऱ्या चौघड्याचा पहिला दणका झाला की, सनईवर 'अहिर भैरव' रागातील धून सुरू होते. परंपरावादी सनईवादक नंतर ‌दिवसभरात वेगवेगळ्या रागांच्या सुरांचे गुंजन चालू ठेवतात. जेवणाची पंगत बसली की, वृंदावनी सारंग सुरू होतो.

पारंपरिक भारतीय संस्कृतीत सनई या सुषिरवाद्याला (भोके असलेल्या नळीत फुंकर मारून वाजवल्या जाणाऱ्या वाद्याला) खूप महत्त्व होते. पहाटेच्या मंगलमय शांत वातावरणात दिवसाची सुरुवात गावागावांतून मंदिरांमध्ये सनई या मंजुळ वाद्याने करण्याची प्रथा होती. गडांच्या आणि वाड्यांच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या देवडीवर दिवसाचा प्रारंभ सनई-चौघड्याने होत असे. भविष्यात दिगंत कीर्ती लाभलेली अनेक सनईवादकांच्या यशाचा प्रारंभ मंदिराच्या प्रवेशद्वारी उभारलेल्या निनादणाऱ्या चौघडा-सनईवादनाने होत असे. महाराष्ट्राचे विख्यात सनईवादक शंकरराव गायकवाड हेही एक चौघडाचमूचे वादक होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहनाईनवाझ बिस्मिल्लाखान हेही वाराणसीच्या काशी-विश्वेश्वराच्या मंदिरासमोर सनईवादन करीत असत.

या सनईला आडव्या ठेवलेल्या दोन चर्मवाद्यांची म्हणजेच चौघड्यांची तालसाथ दिली जाते. हे तालवाद्य टिपऱ्यासारख्या दोन काठ्यांनी वाजविले जाते. तबलावादनाला हाताचाच उपयोग होत असल्यामुळे, त्यावर नैसर्गिक नियंत्रण सुलभ असले, तरी चौघड्यातील तालवाद्यात दोन काठ्यांचा समन्वय साधणे हे कौशल्याचे काम असते. चौघडा पथकात साधारणतः एक सदस्य सूरपेटी धरून बसलेला असतो. काही पथकांमध्ये मुख्य सनईवादकाला साथ देण्यासाठी नवोदित शिकाऊ वादक सुरांत सूर मिसळत असतो. गायकाच्या मागे जसा तंबोरावादक रंग भरीत असतो, तसा हा शिष्य मुख्य सनईवादकाला श्वास घेण्यास उसंत देत मंजुळ सुरावट थोपवू देत नाही.

चौघडा आणि नौबत (नगारा) यांचा इतिहास थेट कौरव-पांडवांच्या युद्धापर्यंत जाऊन थडकतो. त्या काळात चौघडा आणि नौबत जेव्हा एकत्रित वाजत असत, तेव्हा त्याला 'दुंदुभी' म्हणत. सैनिकांना स्फुरण चढण्यासाठी युद्धाच्या प्रारंभी नौबत वाजवत, तर युद्धातील विजयानंतर दुंदुभी वाजवून विजयाची स्फूर्तिदायी वार्ता प्रजाजनांपर्यंत पोहोचवली जात असे.

महाराष्ट्रातले गाजलेले सनईवादक संपादन

महाराष्ट्रातले गाजलेले चौघडावादक-पाचंगे संपादन

महाराष्ट्रात अनेक चौघडेवाले चौघडा-वादनाचा उद्योग पिढीजात करीत आहेत. पिंपळ गावातील पाचंगे कुटुंबीय चार पिढ्या वाजंत्री-चौघडा वाजवित आहेत. साप्रंतचे वाजंत्रीवादक रमेश पाचंगे याचे आजोबा जयाजी पाचंगे यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांना चौघडासम्राट ही पदवीही बहाल करण्यात आली होती. संपूर्ण भारतातून त्यांना चौघडा वादनासाठी पाचारण केले जात असे. ती परंपरा चालू ठेवणारे रमेश पाचंगे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक समारंभात अप्रतिम चौघडा वादन करून वाहवा मिळविली होती. अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी त्यांचे वादन ऐकले आणि शाबासकी देऊन, स्वतःच्या घरच्या मंगलप्रसंगी त्यांना निमंत्रण देऊन वादन करविले.

सनई, संबळ आणि सूर धरणारी पेटी या तिघांच्या एकत्रित वादनाला वाजंत्री म्हणतात. वाजंत्री-चौघडा वादनाची पिढीजात कला मुंबईत मुगभाटातील साळुंखे कुटुंबीयांनी राखली आहे. मुंबईतील मुगभाट, ठाकूरद्वार, दादरची खांडके चाळ येथे चौघडावादकांची दुकाने पूर्वी हारीने थाटलेली असत.