सदाशिव टेटविलकर महाराष्ट्रातल्या ठाणे शहरात राहणारे हे एक मराठी दुर्ग अभ्यासक आहेत.

१९७० पासून समविचारी मित्रमंडळीबरोबर सुरू केलेली टेटविलकरांची गड-किल्ल्यांची वारी अविरत चालू आहे. याच वारीत त्यांना गो.नी. दांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. १९७८ पासून टेटविलकरांनी इतिहासविषयक लेखनास सुरुवात केली. दै. लोकसत्ताने लेखनासाठी उपलब्ध करून दिलेली संधी त्यांनी पेलून धरली. त्यांचे वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिकांमधून दोनशेच्यावर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील गडकोट आणि अन्य ऐतिहासिक स्थळांवर प्रदीर्घ लेखन केले आहे. त्यांची 'गडकिल्ल्यांच्या जावे गावा' (बालसाहित्य), 'दुर्गयात्री', 'दुर्गसंपदा ठाण्याची', 'ठाणे किल्ला', 'विखुरल्या इतिहास खुणा', 'दुर्गलेणी दीव, दमण, गोव्याची', 'महाराष्ट्रातील वीरगळ' आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

कोकणच्या इतिहास अभ्यासकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने इ.स. २०१०मध्ये स्थापन झालेल्या कोकण इतिहास परिषदेचे ते संस्थापक-सचिव आहेत.

सदाशिव टेटविलकर यांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • सिंहगडच्या पायथ्याशी २० ते २२ फेब्रुवारी २०१५ या काळात होणाऱ्या दुर्ग साहित्य संमेलनात टेटविलकर यांना 'दुर्ग साहित्य पुरस्कार' दिला जाणार आहे. रोख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • “ठाणे गुणीजन” पुरस्कार
  • वेक-अप ह्युमन संस्थेचा राज्यस्तरीय “साहित्य रत्‍न”, पुरस्कार
  • महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा “लोकगौरव” पुरस्कार