सदस्य:SavitaPundlik/माझी धूळपाटी१
हरितगृह
हरितगृह[१] हि मानवाने वनस्पती वाढवण्यासाठी निर्माण केलेली एक पद्धत आहे. यानुसार प्लास्टिक, काच किंवा तत्सम पदार्थांचा उपयोग करून झाडांच्या सभोवती मंडपासारखे एक आच्छादन तयार केले जाते. या पदार्थांच्या पारदर्शकतेमुळे सूर्याची दृश्य प्रारणे हरितगृहाच्या आत जाऊ शकतात. बाहेरील अतिथंड हवामानापासूनहि आतील झाडांचे रक्षण होते. हरितगृहातील जमिनीवर पडणारा सूर्यप्रकाश काही प्रमाणात जमिनीकडून शोषला जातो, काही दृश्य प्रारणांच्या रुपात तर काही अवरक्त प्रारणांच्या रुपात परावर्तित होतो. अवरक्त प्रारणांच्या रुपात परावर्तित होणारी उर्जा हरितगृहाच्या बाहेर जाऊ शकत नाही ज्यामुळे हरितगृहाच्या आतील तापमान उबदार होते जे झाडांसाठी पोषक आणि जरुरी असते. याचा उपयोग झाडे जोमाने वाढण्यात होतो[२].
हरितगृह परिणम
पृथ्वीवरून परावर्तीत होणाऱ्या सूर्यप्रकाशातील अवरक्त प्रारणे पृथ्वीच्या वातावरणातच उर्जेच्या स्वरूपात साठून राहिल्याने पृथ्वीवरील तापमानात वाढ होते. याला हरितगृह परिणाम म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणातील काही वायू हरितगृहातील पारदर्शक आच्छादनाप्रमाणे काम करतात व अवरक्त प्रारणे शोषून घेतात. त्यामुळे यांना हरितगृह वायू असे म्हणतात.
वातावरणातील वायू
पृथ्वीवरील वातावरण हे प्रामुख्याने नायट्रोजन (साधारण ७८%) आणि ऑक्सिजन (साधारण २१%) या वायूंनी बनलेले आहे, ज्यामध्ये आर्गोन (साधारण १%) हा निष्क्रीय वायू अल्प प्रमाणात आहे. हे प्रमाण कोरड्या, बाष्प-विरहित हवेचे आहे. वातावरणात पाण्याचे बाष्पहि असते, ज्याचे प्रमाण पृथ्वीवरील ठिकाण आणि तेथील तापमान यांवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. जेव्हा एखाद्या तापमानस्थितीत पाण्याची वाफ तिच्या दाबाने संतुलित झालेली असते, तेव्हा हवेतील बाष्पाचे प्रमाण साधारणपणे ३-५% असते. बाष्पाचे प्रमाण ५% असल्यास नायट्रोजन ७४% व ऑक्सिजन २०% अशा प्रमाणात हवेतील घटक बदलू शकतात[३].
पृथ्वीच्या वातावरणात पृष्टभागापासून साधारण १०० कि.मी. उंचीपर्यंत कोरडी हवा (बाष्प-विरहित) ज्या प्रमुख घटक वायूंनी बनलेली आहे, ते कार्बन डाय ऑक्साईड या वायूची सुधारित पातळी वापरून खालील तक्त्यात दाखवले आहेत[४] - नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गोन व कार्बन डाय ऑक्साईड, त्यांची रासायनिक सूत्रे, रासायनिक बंध रचना तसेच सर्वसाधारण घनफळीय टक्केवारी इथे बघता येईल.
वायू | रासायनिक सूत्र | रासायनिक बंध रचना | हवेतील प्रमाण |
---|---|---|---|
नायट्रोजन | N2 | NᗴN | ७८.०८४ % |
ऑक्सिजन | O2 | O=O | २०.९४६ % |
आर्गोन | Ar | Ar | ०.९३४ % |
कार्बन डाय ऑक्साईड | CO2 | O=C=O | ०.०४१३ % |
या वायूंपैकी कार्बन डाय ऑक्साईड वगळता इतरांचे प्रमाण प्रत्यक्षपणे स्थळ व काल सापेक्ष नसले तरीही हवेतील बाष्पाच्या प्रमाणानुसार ते बदलू शकते. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण मात्र पृथ्वीवरील ठिकाण तसेच दिवसभरातील, वर्षभरातील नैसर्गिक घडामोडी याबरोबरच औद्योगिक क्रांतीनंतरचा उलटलेला काळ, यांवर अवलंबून असते. कार्बन डाय ऑक्साइडच्या प्रमाणात पडणारी मानवनिर्मित भर ही मुख्यतः औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने सुरू केलेल्या दगडी कोळसा व इतर खनिज इंधनांमुळे होत आहे.
बाष्प व कार्बन डाय ओक्साईड या दोहोंचेही वातावरणातील प्रमाण मोजता येईल इतके ठळक आहे. या वायुंखेरीज[५] मिथेन, नायट्रस ऑक्साईड, जमिनीलगत तयार होणारा प्रदूषक ओझोन तसेच हायड्रोफ्लोरोकार्बन प्रकारची रासायनिक संयुगे हरितगृह वायू म्हणून काम करतात. यांचे हवेतील प्रमाण फारच कमी असले तरी ते हरितगृह वायू म्हणून मोठा परिणाम करतात, तसेच पूर्व औद्योगिक काळानंतर (साधारण इ.स. १७५० नंतर) त्यांचे प्रमाण सतत वाढते राहिले आहे.
मिथेन हा सजीवांच्या जैविक क्रियेतून निर्माण होतो. इंधन म्हणून वापरला जाणारा नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेनच असतो. हवेतील बाष्पाशी मिथेनची रासायनिक क्रिया होऊन कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. याशिवाय मिथेनची हवेतील इतर वायुंशी रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन या आणखी एका हरितगृह वायूची निर्मिती होते. कार्बन मोनो ऑक्साईड हा वायुदेखील प्रत्यक्षपणे हरितगृह वायू नसला तरी तोही बाष्पाबरोबरच्या रासायनिक क्रियेतून कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो.
नायट्रस ऑक्साईडचेही वातावरणातील प्रमाण अतिशय कमी आहे, परंतु हरितगृह परिणाम साधण्याची त्याची क्षमता कार्बन डाय ऑक्साईडच्या तिप्पट आहे. शेतीमध्ये वापरली जाणारी नत्रयुक्त खते, वाहनांमुळे होणारे प्रदूषण तसेच औद्योगीकरण, हे नायट्रस ऑक्साईडचे प्रमुख स्त्रोत आहेत.
पृथ्वीच्या वातावरणात स्त्रतोस्फीअर नावाच्या वरच्या थरातील ओझोन हा अतिनील किरणे शोषून पृथ्वीवरील जीवनाचे रक्षण करतो. परंतु हाच ओझोन जमिनिलगतच्या ट्रोपोस्फीअर या वातावरणाच्या खालच्या थरातसुधा असतो जो अति औद्योगीकरण आणि वाहन प्रदूषणा यांच्यामुले हवेत सोडल्या जाणाऱ्या इतर वायुंपासून तयार होतो. शहरांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते. स्त्रतोस्फीअरमधील ओझोन वायु फार काळ स्वतंत्रपणे अस्तित्वात रहात नसला तरी तो देखील कार्बन डाय ऑक्साईडच्या कैक पटींनी हरितगृह परिणाम करतो.
हायड्रोफ्लोरो कार्बन या प्रकारातल्या रासायनिक संयुगांमध्ये कार्बन, हायड्रोजन यांबरोबर फ्लोरिन आणि/किंवा क्लोरीन हि मूलद्रव्ये असतात. या रासायनिक संयुगांचा उपयोग मुख्यत्वे वातानुकुलीत यंत्रांमध्ये होतो. इतरही काही औद्योगिक क्रियांसाठी त्यांचा वापर होतो. त्यांचे वातावरणातील अस्तित्व अतिशय विरळ असले तरी त्यांच्या प्रमाणातल्या थोड्या फरकानेसुध हरितगृह परिणाम वाढू शकतो.
हरितगृह वायू हे वातावरणातले मुख्य वायु, नायट्रोजन व ऑक्सिजन यांपेक्षा निराळे आहेत. याचे कारण आहे त्यांची रेणुकीय रचना, ज्यामुळे रेणूभोवतीच्या विद्युतभाराचे अनियमित वितरण झालेले असते. परिणामी त्यांच्यातील रेणुकीय बंध कंपनावास्थेत जातात आणि या तालबद्ध कंपनांची तरंगलांबी वर्णपटलाच्या ताम्र टोकापेक्षा थोडी अधिक (वारंवारता थोडी कमी) या प्रमाणात असते.
वायू | रासायनिक सूत्र | सन १७५० नंतर झालेली वाढ |
---|---|---|
कार्बन डाय ऑक्साईड | CO2 | ४१.२ % |
मिथेन | CH4 | १५१.७ % |
नायट्रस ऑक्साईड | N2O | २०.०१ % |
ओझोन | O3 | ४२ % |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ https://en.wikipedia.org/wiki/Greenhouse
- ^ Glass Houses: A History of Greenhouses, Orangeries and Conservatories (इंग्रजी भाषेत). Aurum Press. 1988. ISBN 978-1-85410-113-6.
- ^ https://mccord.cm.utexas.edu/chembook/page.php?chnum=2§=1
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Atmosphere_of_Earth
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Greenhouse_gas