पिंपळ हे भारतीय उपखंडातील एक प्रमुख वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओडीसा व कोलकत्ता येथे मोठया प्रमाणात आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव. ज्या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्यामुळे या विशिष्ट वृुक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच 'ज्ञानाचा वृक्ष' म्हटले जाते. हा वृक्ष बिहारमधील बॊधगया या ठिकाणी आहे.