गाडगीळांच्या अखेरच्या सुंदर कथा ("उन्ह आणि पाउस"- गंगाधर गाडगीळ,पॉप्युलर प्रकाशन ,मुंबई पृष्ठे-२७७,मूल्य-२७५ रुपये.)

        १९४६-४७ पासून 'नवकथालेखक' आपल्या नावामागे लावलेल विशेषण गंगाधर गाडगीळ आजतागायत टिकवून आहेत.१९४० पासून ते आता त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या 'उन्ह आणि पाऊस' या त्यांच्या कथासंग्रहापर्यन्त गाडगीळांच्या कथालेखनाची चढती कमानच दिसून येते. त्यांच्या लेखनातील टवटवीतपणाही अद्याप अम्लानच राहिलेला आहे. वयोमानानुसार त्याचे शरीर थकले होते, परंतु त्यांच्या मनात नवनवीन उन्मेषाचे धुमारे मात्र तरारून येत होते. नवथर तारुण्याच्या असोशीने शब्दावर,कल्पनेवर आणि वास्तव परिस्थितीवर गाडगीळ मनस्वीपणे प्रेम करत होते, हे 'उन्ह आणि पाऊस'या संग्रहावरून स्पष्ट पणे दिसून येते. सृजनशील कथालेखनाच्या बाबतीत गाडगीळ कायमच अतृप्त होते. म्हणूनच त्यांच्या कथेच्या वाटचालीत विकास दिसून येतो.आपल्या कथा तठस्थपणे न्याहाळाण्याची गाडगीळांना मोठी हौस होती. हि हौस जीवनदर्शनसह कलादर्शनाचीसुधा होती. हे त्यांच्या कादंबरी व समीक्षा अशा दोन्ही लेखनाच्या बाबतीत खरे आहे  
      प्रस्तुतच्या नवा कथासंग्रह हा त्याच्या अखेरच्या काळातील आहे.सतरा कथांचा हा एक सुंदर, सरस असा धोस आहे. त्यांच्या वयाची,लेखनाची आणि वाद्न्मयीन परिपक्व जानिवांची कल्पना या क्थावरून येते. अनुभव ओतून कथेची निर्मिती करण्यापेक्षा त्या अनुभवाचे सहज,स्वाभाविक उपयोजन गाडगीळ करतात. तेही अत्यंत बिनचूकपणे,विलक्षण पद्धतीने व भावनिक जिव्हाळ्याने. कथा सजीव करताना कथातंत्राच्या खटाटोपात ते पसलेले दिसत नाहीत. आत्मनिवेदनतून ते कथा सांगतात.दुपारच्या गप्पांत भाषेवर प्रभुत्व असलेल्या प्रौढ,समंजस स्त्रीने अत्यंत आस्थेवाईकपणे, परंतु जराशा तठस्थेपणे काही गोष्टी कराव्यात तसे गाडगीलाचे कथा सांगणे आहे. त्याच्या या शैलीमुळे त्याची कथा प्रगल्भ जाणीवेची व दोषरहित होते. त्यांच्या कथाशैलीत एक प्रकारचा संथेपणा जाणवतो; पण तो त्याच्या शैलीचा  थाटच म्हटला पाहिजे.