दामले, सीताराम केशव

पत्रकार, कादंबरीकार

१८७८ - १९२७

सीताराम केशव दामले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाला. सुप्रसिद्ध कवी केशवसुत व व्याकरणकार मोरो केशव दामले यांचे हे बंधू होत. हे मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून बी. ए. झाल्यावर ‘फेलो’ या नात्याने तेथेच काम करीत होते. याच काळात त्यांनी एल्एल.बी.चा अभ्यास केला. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते ‘ज्ञानप्रकाश’च्या संपादक मंडळात प्रविष्ट झाले. वंगभंग चळवळीने राष्ट्रभर चैतन्य पसरविले होते. लोकभावना सतत जागृत व उत्तेजित राखण्यासाठी मुंबईसारख्या शहरी एखादे दैनिक असावे, असे राष्ट्रीय पक्षाला वाटत होते. लोकमान्य टिळकांना या गोष्टीची पुरेशी जाण असल्याने त्यांनी या नव्या दैनिकाची धुरा दामलेंवर सोपवली व १९०८ साली मुंबई येथे ‘राष्ट्रमत’ दैनिकाचे काम सुरू झाले. सरकारी दडपशाहीमुळे हे दैनिक दोन वर्षांनी बंद पडले. या अल्पकाळातही ‘राष्ट्रमता’ने आपली कामगिरी कौतुकास्पद रितीने पार पाडली. यानंतर दामले पुण्यास गेले व वकिली करू लागले. ‘राष्ट्रोदय’ नावाचे मासिकही त्यांनी काही काळ चालविले. ते ‘चित्रमयजगत’मध्ये ‘महायुद्धाची स्थित्यंतरे’ या सदरात माहितीपूर्ण लेख लिहीत.[१]

दामले यांनी ‘जग हे त्रिविध आहे’ व ‘न्याय की अन्याय’ या सामाजिक आणि ‘दोनशे वर्षांपूर्वी’ व ‘वसईचा रणसंग्राम’ या ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या या लेखनावर टिळकपंथीय सामाजिक व राजकीय विचारसरणीची चांगली छाप आहे. राजकारणाची आवड असणारे दामले क्रियाशील असल्याने त्यांनी ‘राजकारण’ हे साप्ताहिक १९१८साली पुण्यात काढले. असहकारितेच्या चळवळीत या साप्ताहिकाने चांगलीच कामगिरी बजावली. पुढे मुळशी सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना कारावास भोगावा लागला आणि हे साप्ताहिक बंद पडले. कारावासातील श्रम त्यांना झेपत नसत. त्यांची प्रकृती नंतर खालावत गेली व १९२७ साली पुणे येथे त्यांचे निधन झाले. दामले यांनी प्रसंगोपात काव्यदेवीचीही उपासना केली. त्यांच्या विनोदी वृत्तीचा नमुना ‘वाचाळरावाचे विचित्र अनुभव’ (१९१२) या पुस्तकात मिळतो.

याशिवाय दामले यांनी ‘टॉम्स कार्लाईल’ (१९०३), ‘तुरुंगाचे कोठडीतून’ (१९२३), ‘महात्मा गांधी’ (१९२४), ‘सभा, अध्यक्ष व सभासद’ (१९२७), ‘घरचा कायदा’ (१९२७), ‘पुराव्याचा अ‍ॅक्ट’ अशी पुस्तके लिहिली.[२]

- वि. ग. जोशी

संदर्भ :

१.     खानोलकर गं. दे.; ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक’,  खंड-२; १९३८.

२.     नेने वि. पां.; प्रकाशक; ‘अर्वाचीन मराठी साहित्य’ , १८७५ ते १९३५.

  1. ^ www.bookganga.com https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4630322671206315984. 2019-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ mr.vikaspedia.in http://mr.vikaspedia.in/education/93893e93993f92494d92f93e93593f93792f940-93893094d93591593e939940/93893e93993f92494d92f93e91a947-92a94d93091593e930/90593094d93593e91a940928-92e93093e920940-93893e93993f92494d92f#section-3. 2019-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)