पुणे ही लोकांची खास निवड आहे. येथील विविध शैक्षणिक संस्थांमुळे विद्येचे माहेरघर म्हणून पुणे आता जगभर प्रसिद्ध झाले आहे. पुणे विद्यापीठाचे विस्तीर्ण आवार जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला सर्व तऱ्हेच्या शिक्षण संस्थांचा, शाखांचा मुकुटमणीच भासते. शहराच्या मध्यभागापासून व गजबजाटापासून दूर असलेल्या विद्यापीठाने आंतराष्ट्रीय स्तरावरही आपले स्थान निर्माण केले आहे. उत्साहाने भरलेली आणि भारलेली तरुण मुले मुली या शांत परिसरात इकडून तिकडे जात येत असतात, तेव्हा भविष्यातील भारतच माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. या शहरात मी अगदी भरभरून जगलो आहे आणि या शहरानेच मला अनेकानेक विद्वानांची भेट घडवली आहे. पेंटिंग,गायन,वादन,राजकारण,शिक्षण,साहित्य,पत्रकारिता,नृत्य,नाट्य वगैरे कुठलेही क्षेत्र घेतले तरी ज्यात अनेक हुशार व्यक्तींनी अत्युच्च यश मिळविले नाही असे कुठलेही क्षेत्र शोधून सापडणार नाही. अशा व्यक्तींमध्ये अगदी वरच्या स्थानावर श्री. पी. ए. इनामदार आहेत. त्यांनी गेल्या पंधरा वर्षात आपली क्षमता व बुद्धिमत्ता यांच्या जोरावर शैक्षणिक क्षितिज उजळून टाकले.