सदस्य:श्रीनिवास पाटील/s1
कोल्हापूरची फूटबॉल संस्कृती
कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्राचे ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. कुस्ती खेळाची परंपरा, गुळ, मांसाहारातील तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या लोकांची नाळ आणखी एका महत्वाच्या घटकबरोबर जोडलेली आहे ते म्हणजे फुटबॉल. कोल्हापूरच्या लोकांसाठी फुटबॉल हा फक्त खेळ नाही तर अतूट नात असलेला घटक आहे. जागतिक खेळ म्हणून फूटबॉलची ओळख आहे. या फूटबॉल सोबत कोल्हापूरचे खूप जुने नाते आहे. 1930 साली उरुग्वे येथे झालेल्या पहिल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी कोल्हापूर मध्ये ‘जामदार फुटबॉल क्लब’ हा फुटबॉल क्लब होता. जामदार फुटबॉल क्लब हा भारतातील जुन्या फुटबॉल क्लब पैकी एक आहे.
कोल्हापूरच्या राजघराण्याने नेहमीच खेळला आणि विशेषत फूटबॉलच्या वाढीसाठी व विकासासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कोल्हापूरची क्रीडा परंपरा जपली जावी आणि ती वाढीस लागावी या उद्देशाने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना 1940 साली करण्यात आली. फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, लॉनटेनिस, टेबलटेनिस, जिम्नॅस्टिक, जलतरण इत्यादी खेळ संपूर्ण तांत्रिक ज्ञानासह खेळाडूंना शिकता यावेत यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन नेहमी प्रयत्नशील असते. आज कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणार्यात कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंना कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे फूटबॉलमधील योगदान अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज कोल्हापूरचे अनेक खेळाडू राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव रोशन करत आहेत.कोल्हापुरात तयार झालेले अनेक खेळाडू आज राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक क्लब कडून करारबद्ध झालेले आहेत. 2017 मध्ये झालेल्या 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप फूटबॉल स्पर्धेत अनिकेत जाधव हा भारतीय संघात खेळणारा कोल्हापूरचा एकमेव खेळाडू होता. आजच्या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये फूटबॉलचे ए, बी, सी, डी, ई डिविजन आणि ग्रामीण भाग असे एकूण 122 संघ आहेत. जवळजवळ 2557 खेळाडूंचे रजिस्ट्रेशन या संघांच्या माध्यमातून झालेले आहे. वर्षभराच्या फुटबॉल हंगामात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात.अनेक खेळाडू कोल्हापूर फूटबॉल संघातून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित विविध राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होतात. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने ग्रासरूट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून फूटबॉल प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते तसेच ‘सी’ आणि ‘डी’लायसेंस फुटबॉल प्रशिक्षक प्रमाणपत्र कोर्स घेण्यात येतो.
https://ksakolhapur.org/
https://www.thehindu.com/news/national/other-states/kolhapurs-football-blessing-for-india/article19737963.ece