✒️ *वाचन . . . .*

    *एक चांगला छंद*

१) वाचन ही खूप चांगली सवय आहे. वाचन केल्याने भरपूर फायदे होतात, म्हणून प्रत्येकाने वाचनाची सवय लावून घ्यावी. वाचनाने ज्ञानप्राप्ती होऊन त्या ज्ञानात वाढही होते. वाचनाने माणसाला जगाची ओळख होते. 2)वाचनामुळे मेंदू अधिक शक्तिशाली, क्रियाशील व सक्षम होतो. वाचन मेंदूसाठी प्रोटीनसारखं काम करतं. म्हणजेच असं नक्की म्हणता येईल की, वाचन हे मेंदूसाठी उत्तम टाॅनिक आहे. ३) सतत वाचत राहा. वर्तमानपत्र वाचा, पुस्तकं वाचा, मासिकं वाचा, दिवाळी अंक वाचा व वाचनाची आवड कायम जोपासा कारण वाचन हे विचाराला चालना देणारं सर्वात प्रभावी साधन आहे. ४) वाचन हे मनाचे अन्न आहे. जसे शरीराला अन्न व व्यायाम आवश्यक असतो, तसे मनाला वाचन आवश्यक असते. अन्न आणि व्यायामाने शरीर घडते. वाचनाने मन समंजस, विचारी व बहुश्रूत होते. वाचनामुळेच मनाला समृद्धता येते. ५) वाचन आचार देते, विचार देते, वाचनच माणूस घडवते. होय, वाचनामुळेच माणूस घडतो. ६) वाचन केल्यानेच घडून गेलेला इतिहास आणि सध्याचा वर्तमान नीटपणे कळतो. ७) *You Hear You May Forget But You Read You Remember.* (तुम्ही ऐकलेलं कदाचित विसरु शकता पण वाचलेलं लक्षात राहतंच) ८) वाचन केल्याने सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट प्राप्त होते, ती म्हणजे ज्ञान. माणसाच्या जगण्यामध्ये ज्ञान हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. ज्ञानामुळेच माणसाचे वेगळेपण स्पष्ट होते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा- *ज्ञान हे पैशापेक्षाही श्रेष्ठ असते.* ९) वाचनामुळे माणसामधील अज्ञानाचे पर्वत कोसळून पडतात आणि त्याठिकाणी ज्ञानाचे भक्कम पर्वत उभे राहतात. १०) सतत वाचन केल्याने माणसाच्या बंदिस्त मनाचे दरवाजे उघडतात. ११) वाचनाने माणसाकडे चांगल्या विचारांची संपत्ती जमा होत जाते. म्हणजेच वाचनाने माणूस वैचारिकरीत्या संपन्न बनतो. १२) शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. १३) अखंड वाचनाने माणूस तल्लख बुद्धीचा होतो. १४) वाचनाची सवय असणे ही माणसाच्या व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणारी बाब आहे. वाचनाने माणसाचे बौद्धिक सामर्थ्य वाढते. मन प्रगल्भ होते. वाचनाची आवड असणे हा सुसंस्कृतपणाचा गुण समजला जातो. जगात जी अनेक मोठी आणि यशस्वी लोकं ज्यात विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, नेते, लेखक, कवी होऊन गेलेत त्यांच्या जडणघडणीत वाचनाचा खूप मोठा वाटा होता. असं ते स्वतः कबूल करतात. १५) वाचनातून माणसाला ज्ञान, सद् विचार, सद्गुण, आनंद, मानसिक शांतता, समाधान, प्रेरणा, स्फूर्ती, सकारात्मकता, धीर, संयम ह्या कुठेही विकत न मिळणा-या गोष्टी प्राप्त होतात. १६) वाचनामुळे माणसाच्या विचारामध्ये खूप मोठे परिवर्तन होते. १७) वाचनाने आयुष्याला एक नवे वळण मिळते, एक नवी दिशा मिळते. १८) वाचनामुळे माणसामध्ये अमूलाग्र बदल घडू शकतो. १९) वाचन केल्याने माणसाच्या मनाची, बुद्धीची आणि विचारांची फक्त उंचीच नाही तर खोलीही वाढत जाते. २०) प्रत्येक गोष्टीची स्वच्छता आवश्यक असते. आचार-विचारांनी, मनाची आणि बुद्धीची सुद्धा. आणि ही स्वच्छता वाचनामुळे होते. २१) एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते. २२) पुस्तके हे माणसाचे सच्चे मित्र असतात. या पुस्तकरुपी मित्रांना तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नसते. उलट ते तुम्हाला ज्ञान देतात, चांगले विचार देतात, स्फूर्ती व प्रेरणा देतात. २३) भारतातील मागच्या पिढीतील स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ही सर्व थोर माणसे मनस्वी पुस्तकप्रेमी होती. ही माणसे वाढली ती पुस्तकांच्या सहवासात. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी जो प्रदीर्घ एकांतवास (म्हणजे तुरुंगवास) सुसह्य केला तो केवळ पुस्तकांच्या सहवासामुळेच. लोकमान्य टिळक म्हणाले होते, 'मी नरकातसुद्धा पुस्तकाचे स्वागत करीन. कारण नरकाचे स्वर्गात रुपांतर करण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. २४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांनाच आपला खरा मित्र मानायचे. एकवेळ त्यांना उपाशीपोटी झोप लागायची, पण जर पुस्तक वाचले नाही तर त्यांना झोप लागायची नाही. त्यांच्या विद्वत्तेचे मूळ त्यांच्या चौफेर वाचनामध्ये होते. २५) पुस्तकाची सोबत कायम जवळ असणारा माणूस कधीच एकटा पडत नाही. ज्याला पुस्तके वाचण्याचा छंद असतो तो जगात कुठेही सुखी व समाधानी राहू शकतो. २६) कुंभार जसे मेहनतीने पण काळजीपूर्वक गोलाकार आकाराची मडकी घडवतो, तसेच पुस्तके सुद्धा माणसाला सुंदर आकार देऊन त्याला घडवत असतात. २७) पुस्तके माणसाला सज्ञान करण्याचे काम करत असतात. एकवेळ वस्तूंवर केलेला खर्च वाया जाऊ शकतो, पण पुस्तकांवर केलेला खर्च कधीच वाया जात नाही. २८) वृत्तीने समाधानी आणि विचारांनी श्रीमंत होण्यासाठी पुस्तकांशी मैत्री जोपासली पाहिजे. २९) जीवनाचा तोल सांभाळण्यासाठी वाचन आवश्यक असते. ३०) ‌‌वाचन आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करते. ३१) पैशाच्या श्रीमंतीपेक्षा वाचनाची श्रीमंती श्रेष्ठ असते. ३२) सतत‌ वाचन करीत राहा. वाचन करणारा माणूस विचाराने कधीच म्हातारा होत नाही. तो कायम तरुणच राहतो. ३३) जी सुखे पैशाने मिळत नाहीत ती‌ वाचनाने मिळतात. ३४) वाचन ही अशी अद्भूत गोष्ट आहे, 'जी काचेच्या तुकड्यालासुद्धा पैलू पाडून हिरा बनवते.' ३५) वाचन हा एक "परीस" आहे. आणि हा परीस जो स्वत:जवळ बाळगतो त्याच्या जीवनाचे सोने होतेच.🌹💐🌻🌺🌈🌸🌻💐🌹