बाळकृष्ण रघुनाथ सप्रेः-

बाळ सप्रे

गोमंतकात साहित्याच्या प्रामुख्याने साहित्याच्या तीन पिढ्या असलेल्या दिसतात. गोवा मुक्तीपूर्वकाळ, मुक्तीनंतर आणि समकाल म्हणजे सामान्यतः २००० नंतरचा काळ असा कालमानाचा लिखाण करणाऱ्या या तीन पिढ्या आहेत. त्यात बाळ सप्रे हे समकालिन साहित्यिक असून त्यांनी कथा, कादंबरी, ललित असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले आहे. मुक्तीपूर्वकाळात जन्मलेल्या सप्रेंनी गोमंतकातील तीनही काळ पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या साहित्यातून गोमंतकाच्या समाजजीवनाचे नेमके चित्र उमटताना दिसते.

       ‘बाळ सप्रे’  हे अगदी अलिकडच्या म्हणजेच गोवामुक्तीनंतरच्या काळात   उदयाला आलेले लेखक होय. त्यांचे संपूर्ण नाव बाळकृष्ण रघुनाथ सप्रे. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1943 साली वेलींग या गावी झाला. ते शिक्षणासाठी कारवारला आपल्या आजोळी होते. लहानपणापासून त्यांच्या घरात सर्वांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांच्या आजोळी रोज वर्तमानपत्र येत असे. शिवाय  अनेक प्रकारची नियतकालिके  आणि दिवाळी अंक सारखी  विशेषांक येत. पुस्तकांप्रमाणेच नियतकालिकांविषयीही सप्रेंना  कुतुहल वाटत असल्यामुळे ते घरी आलेली मासिके आणि वृत्तपत्रे वाचू लागले.  हळूहळू त्यांना वाचनाचे वेड लागले.  हा छंद त्यांना इतका जडला की,संत रामदासस्वामींनी ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ म्हटल्याप्रमाणे  दिवसभरात काही तरी वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. त्यामुळेच  त्यांनी जे मिळेल ते वाचण्यास सुरूवात केली.

       पुढे  अकरावी पास झाल्यानंतर  ते गोव्यात आले. गोव्यात  त्यांना ‘अडवलपाल’ या गावी शिक्षकाची नोकरी लागली. त्या गावात खाणीवर काम करणारा अशिक्षित वर्ग असल्यामुळे मैत्री करावी असं कोणी नव्हतं. मुळातच वाचनाची आवड असल्यामुळे ते अडवलपालहून डिचोलीला शांतादुर्गा वाचनालयात सायकलने जाऊन दर आठवड्याला दोन पुस्तके आणीत असत. वि.स. खांडेकर, ना. सि. फडके अशा प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचण्यात त्यांना आनंद वाटे.  या लेखकांच्या लेखनाने सप्रेंची वाचनाची भूक त्यावेळी भागत असे. त्यानंतर ते पणजीला एक वर्ष ट्रेनिंगच्या निमित्ताने होते. वाचनाच्या वेडापायी त्यांचा बराचसा वेळ पणजीच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये जात असे.

     जेव्हा  ते त्यांच्या मुळ गावी म्हणजे वेलींगला परतले. तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांनी काही ना काही लिखाण करण्यास  प्रारंभ केला. काही दिवसानी वेलींगला लक्ष्मणराव सरदेसाई या जेष्ठ कथाकारांशी त्यांचा परिचय झाला. श्री. लक्ष्मणराव सरदेसाई  नृसिंहाच्या देवळाजवळच्या एका छोट्या घरात लिखाण करण्यासाठी राहिले होते. त्यामुळे सप्रेंनी आपलं लिखाण त्यांना दाखवले. त्यांनी सप्रेंना सांगितले की, “तुमच्यामध्ये लिखाणाची आवड आहे पण ते कशाप्रकारे लिहावं हे तुम्हाला अजून जमलेलं नाही”  इतकेच नव्हे तर त्यांनी  पुढे सप्रेंना मार्गदर्शनही केले आणि चांगल्या लेखकांच्या कथा वाचण्यास सांगितले. त्याप्रमाणे सप्रेंनी वाचन केले आणि त्यांना लेखन जमत गेले. काही काळ त्यांनी लक्ष्मणराव सरदेसाईंचा लेखनिक म्हणून काम केले. लक्ष्मणराव सरदेसाई वहीमध्ये जे काही आणि जेवढं लिहितील तेवढी पानं फाडून ते प्रसिद्धीसाठी पाठवित. त्यांच्या लिखाणाची ती पद्धत होती. असे बाळ सप्रे सांगतात. वेलिंगला पु.ल.देशपांडे आले होते. सप्रेंनी त्यांची भेट घेतली आणि तिथे जे घडले ते सर्व वर्णन  करणारा ‘पु.ल.देशपांडे यांची अशीही एक संध्याकाळ’ या नावाने पहिला   लेख लिहिला आणि तो लेख ‘गोमंतक’ या वृत्तपत्रात छापून आला. त्यानंतर त्यांच्या अनेक कथा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांना कथास्पर्धेत  बक्षीसेही मिऴाली आहेत.  बाळ सप्रे हे शिक्षण क्षेत्रात होते. आणि तिथूनच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. लेखनाला वेळ खूपच कमी मिळत असल्यामुळे त्यांनी ३०-३१ वर्ष नोकरी करून राजिनामा दिला आणि पूर्णपणे स्वतःला लेखनाला वाहून घेतले. त्यांनी शांता शेळके यांचे एक विधान सांगितले. त्या म्हणत “जर आपल्याला सतत लेखन करायचे असेल तर एकदा तरी आपण सदर लेखनाच्या खालून गेले पाहिजे”.त्यांनी ‘तरूण भारत’ वृत्तपत्रातून सदर लेखन सुरू केले. त्या सदराचे नाव होते ‘शब्दांची दुनिया’.                                                  

       तरूण भारतमध्ये लिहित असताना गोमंतकचे संपादक ‘चंद्रकांत शेजवल’ यांनी गोमंतक वृत्तपत्रात सदर लिहिण्यास विनंती केली. सप्रेंचे एकाच वेळी दोन्ही ठिकाणी लिखाण चालू होते. ‘गोवादूत’ मधूनही तीन-चार सदरांमध्ये त्यांनी लेखन केले आहे.  इ.स 2000 मध्ये ‘शब्दमुद्रा’ नावाचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पणजी आकाशवाणीठी काही नभोनाट्येही त्यांनी लिहिली आहेत आणि पणजी दूरदर्शन केंद्रावर विनोदी नाट्य संहितेचे लेखन केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. ‘गोवा मराठी अकादमी’ कडून स्तंभलेखनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच कथास्पर्धेसाठीही गोवा मराठी अकादमीतर्फे त्यांना बक्षिस मिळाले आहे. मडगावच्या संगम मासिकाच्या कथालेखनासाठी आणि सावंतवाडीच्या आरती मासिकाच्या ‘संभ्रम’ या लेखनासाठीही ‘मधु मंगेश कर्णिक’ यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि दोन वर्षापूर्वी शिक्षक विकास परिषद नावाच्या एका संस्थेकडून त्यांच्या समग्र साहित्यासाठी साहित्य भुषण पुरस्कार प्राप्त झाला आहे.

   यानंतर ‘प्रकाश संत’ यांचा सहवास हा कथासंग्रह वाचनात आला आणि त्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी कथा लिहिण्यास सुरूवात केली आणि हळूहळू त्यांच्याकडून कदंबरीची निर्मिती झाली ती ‘अपूर्णांक’ होय. त्यांची ‘निवडूंग’ ही कादंबरी २०१६ मध्ये प्रकाशित झाली. सप्रेंना कथा हा साहित्यप्रकार अधिक लिहायला आवडतो, तसेच त्यांना सर्व प्रकारचे वाचन करायला आवडते. वाचनाव्यतिरिक्त त्यांनी नाटकात कामही केले आहे. लहानपणापासून ते वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत ते नाट्यक्षेत्रात कार्यरत राहिले. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात ते होते. विश्व हिंदू परिषदेच्या हिंदूवार्ता या मुखपत्राचे त्यांनी काही काळ संपादन केले आहे.

       गोवामुक्तीनंतर म्हणजे इ.स. २००० मध्ये बाळ सप्रेंचा पहिला ‘शब्दमुद्रा’ नावाचा ललितसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘शब्दप्रभा’, दिवसेंदिवस असे ललित संग्रह प्रसिद्ध झाले. बाळ सप्रेंनी ललित प्रमाणेच कथालेखन आणि व्यक्तिचित्रलेखन तसेच कादंबरी लेखनही केले आहे. ‘यक्षप्रश्न’, ‘ज्याचा त्यांचा परिघ’, ‘मी  चिंतामणी बोलतोय’, ‘संभ्रम’ असे कथासंग्रह तसेच ‘अल्बम’ हा व्यक्तिचित्रसंग्रह आणि ‘अपूर्णांक’ आणि ‘निवडूंग’ अशा कादंबऱ्या असे त्यांचे प्रकाशित  साहित्य आहे.

       त्यांच्या मते आपले सगळेच अनुभव हे कादंबरीत मांडता येत नाहीत.  स्वानुभवा बरोबरच इतरांचेही अनुभव त्यात येऊ शकतात. त्यांच्या अपूर्णांक या कादंबरीतील सुरुवातीचा बालपणातील भाग हा त्यांच्या स्वानुभाव आहे. पण नंतरचा भाग हा त्यांनी अनुभवलेला नाही असे त्यांनी सांगितले. ही त्यांची कादंबरी गोमंतक या वृत्तपत्रात सदर रुपाने प्रसिद्ध झालेली आहे. या कादंबरीवर बऱ्याच जणांनी परिक्षणे लिहिली आहेत. त्यामध्ये डॉ.प्रल्हाद वडेर यांचाही समावेश होतो.

     त्यांच्या कथांमध्येही स्वानुभव आहेच पण त्यांनी ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टींवर विचार करून कल्पनेच्या सहाय्यानेही काही कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या अल्बम नावाच्या व्यक्तीचित्र संग्रहामध्ये जी स्वभाव चित्रणे आली आहेत. ती माणसे बाळ सप्रे यांना प्रत्यक्ष जीवनात भेटलेली माणसे आहेत. सप्रे सांगतात की “लेखन करताना आपल्या डोक्यात प्रथम विशिष्ट लेखनाचा आराखडा तयार करावा लागतो. तसे केले तर आपल्या अपेक्षेप्रमाणे लिखाण होतं नाहीतर मग लेखन कुठल्या कुठे भरकटत जाते”.

      समाजात जे घडते ते साहित्यात उमटले पाहिजे, आणि आजच्या काळात पूर्वीच्या काळाचे प्रतिबिंब न उमटता या वर्तमान काळातील सामाजिक घटनेचे प्रतिबिंब उमटले पाहिजे असे बाळ सप्रेंचे मत आहे.