चितमपल्ली, मारुती भुजंगराव

निसर्ग निरीक्षक-लेखक

५ नोव्हेंबर  १९३२

निसर्ग लेखक चितमपल्ली यांचे जन्मगाव सोलापूर असून येथेच त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाले. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामधून आपले शिक्षण पूर्ण करून पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी कोइमतूर फॉरेस्ट कॉलेज, बंगलोर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश) डेहराडून वगैरे ठिकाणच्या वने आणि वन्यजीवविषयक संस्थांतून घेतले. वनाधिकारी म्हणून काम करताना त्यांना या शिक्षणाची आवश्यकता होती.

नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत, तसेच पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पंडित गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे, वैद्य, वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने त्यांनी संस्कृत साहित्याचे अध्ययन केले; ते त्यांना त्यांच्या पक्षीविषयक लेखनासाठी विशेष साह्यभूत झाले. त्यांनी निर्मिलेला ‘पक्षीकोश’ (२०००) मराठी साहित्यासाठी लक्षणीय आहे.

आनंददायी ‘वनवास’-

चितमपल्लींनी महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. १९९० साली ते निवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्प यांच्या विकासात त्यांनी भरीव योगदान केले.

यासाठी चितमपल्लींच्या बहुभाषिकत्वाचा त्यांना फार उपयोग झाला. मराठी, संस्कृत यांबरोबरच त्यांनी जर्मन, रशियन या भाषांचे अध्ययन केले आणि माहितीचा खजिना निर्माण केला. वननिरीक्षण, वनभ्रमण यांतून पक्षितज्ज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली. वन्यजीव व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगत यांविषयी उल्लेखनीय संशोधन केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आणि निबंधवाचन केले.

वनविभागातील सेवाकाळ आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्यांत सक्रिय सहभाग घेतला. डॉ. सलीम अली वन्यप्राणी संस्थेचे ते संस्थापक सचिव आहेत. राज्य वन्य संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद), या समित्यांचे ते सदस्य होते. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी कार्य पाहिले.

वनविभागातली नोकरी ही संधी मानून ते निसर्ग जीवनाशी समरस झाले. त्यांचे लौकिक व्यक्तित्व आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व  अशा दोन पैलूंतून दर्शन घडते. ते पैलू परस्परांशी संलग्न, विरोधी अथवा तटस्थही असू शकतात. चितमपल्लींच्या लौकिक व्यक्तित्वासोबत त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व समरस झाले आहे, याचा प्रत्यय त्यांच्या ललित लेखनातून येतो.

चितमपल्लींच्या लेखनात त्यामुळे अनुभवाचा अस्सलपणा आहे. संशोधनाच्या निमित्ताने जवळपास तीन तपांहूनही अधिक काळ त्यांनी ‘वनवास’ भोगला आहे. त्या जीवनाचा आणि वनाचा आनंदानुभव घेतला आहे. या ललित लेखकाचे संपूर्ण भावविश्व जंगलप्रेमाने भरून गेले आहे. अरण्यानुभवांचे घबाड त्यांना लाभले आहे. त्यांचे सर्व लेखन अशा अनुभवसंपृक्ततेतून निर्माण झाले आहे.

चितमपल्लींच्या लेखनामागचे चार टप्पे किंवा पैलू सांगता येतील. एक म्हणजे माहिती, दुसरा म्हणजे संशोधन आणि  तिसरा म्हणजे अनुवाद, प्राचीन ग्रंथांचा व भाषांचा अभ्यास आणि चौथा म्हणजे ललित गद्य लेखन होय! शास्त्रीय लेखनाने आपल्या लेखनाची सुरुवात करून तत्संबंधित अनुवाद वाटेने त्यांनी आपले अरण्यप्रेम बहुदेशी केले. संस्कृत, मराठी, तेलगू (आईकडून आलेली), इंग्रजी, रशियन, जर्मन, बंगाली, जपानी भाषांशी स्नेह जोडला आणि ललित गद्य लेखनाची वाट चोखाळली. त्यांची अभ्यासूवृत्ती कामातील चिकाटी आणि आत्मीयता यांमुळे त्यांचे लेखन सातत्याने होत गेले.

रानवाटांची ‘माहेरओढ’-

चितमपल्लींच्या ललित गद्य लेखनाचा एक गुण असा की, अरण्यविद्येतून मिळालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रुचिर शैलीत त्यांनी मांडली. तिला अलंकृत भाषेची, भावपरतेची जोड दिली. याबाबतीत जी.ए.कुलकर्णी या कथालेखकाने व्यक्त केलेला अभिप्राय बोलका आहे. ते म्हणतात, “तुमच्या लेखातील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. (तशी तुमची नाही.) शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे, याचेही दर्शन तुमच्या लेखातून घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का? याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्यात आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे.” गंगाधर गाडगीळ यांनीही असाच उल्लेख त्यांच्या अभिप्रायात केला आहे. ते म्हणतात, “मारुती चितमपल्ली हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांच्या विषयाचे ज्ञान तर त्यांना आहेच, पण त्याबरोबर विषय रोचक व रसपूर्ण पद्धतीने मांडण्याची हातोटीही त्यांच्याजवळ आहे.”

चितमपल्लींची सुमारे अठरा-वीस पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली. त्यात साहित्य प्रसार केंद्र, नागपूर यांचा सहभाग अधिक आहे. ‘पक्षी जाय दिगंतरा’ (१९८३), ‘जंगलचं देणं’ (१९८५), ‘रानवाटा’ (१९९१), ‘शब्दांचं धन’ (१९९३), ‘रातवा’ (१९९३) ‘मृगपक्षिशास्त्र’ (१९९३ अनुवादित), ‘घरट्यापलीकडे’ (१९९५) ‘पाखरमाया’ (२०००), ‘निसर्गवाचन’ (२०००), ‘सुवर्णगरुड’ (२०००), ‘आपल्या भारतातील साप’ (२०००, इंग्रजी; मराठी अनुवादित), ‘आनंददायी बगळे’ (संस्कृत साहित्यातील काही पक्षी २०००), ‘पक्षिकोश’, ‘निष्ठावंती’ (२०००), ‘चैत्रपालवी’ (२०००), ‘चकवा चांदणं एक वनोपनिषद’ (आत्मकथन २००५) ‘केशराचा पाऊस’ (२००५) अशा साहित्यकृतींतून अरण्यानुभवांचे व वनविद्येचे अचंबा वाटावे असे कलापूर्ण चित्रण आले आहे, त्या त्यांच्या साहित्यसंपदेने मराठी साहित्यातील अनुभवाचे क्षितिज विस्तारले. या अनुभवसमृद्ध लेखनाने मराठी साहित्यसृष्टीला एक नवे आभाळ मिळाले. याशिवाय आगामी लेखनासाठी ‘नवेगावबांध’, ‘श्यौनिकशास्त्र’ आणि ‘चित्रकंठ’ या पुस्तकांची योजना आहेच.

चितमपल्लींच्या साहित्यास अनेक पुरस्कार मिळाले. ‘जंगलचं देणं’ (१९८९), ‘रानवाटा’ (१९९१) व ‘रातवा’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाले. विदर्भ साहित्य संघ पुरस्कार (जंगलचं देणं, १९९१), भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार (रानवाटा १९९१), मृण्मयी साहित्य पुरस्कार (रानवाटा, १९९१) हे पुरस्कार जाहीर झाले. त्याबरोबरच फाय फाउंडेशन इचलकरंजी या प्रतिष्ठानद्वारा १९९१च्या राष्ट्रीय पुरस्काराने ते सन्मानित झाले. साहित्य सेवेच्या स्मरणार्थ १४ जानेवारी १९९९ रोजी विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्याकडून ‘साहित्य-वाचस्पती’ पुरस्कार प्राप्त झाला. शिवगिरिजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डूवाडी (पक्षिकोश) व विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार यांनी ते सन्मानित झाले. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड सु.ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय सन्मान व साहित्य पुरस्कार, सारथी संस्था नागपूर, यांच्याकडून उत्कृष्ट निसर्ग साहित्याबद्दल स्क्रोल ऑफ ऑनर, शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान (सहकार महर्षी) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार असे अनेकानेक पुरस्कार चितमपल्लींना प्राप्त झाले आहेत. या त्यांना मिळालेल्या विविध सन्मानांनी त्याच्या कार्याची थोरवी सर्वदूर गेली आहे.२०१७ साली महाराष्ट्र राज्याचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार चितमपल्ली यांनी प्राप्त झाला आहे.

विविध प्रकारची सन्माननीय अध्यक्षपदे त्यांनी भूषविली. सोलापूर येथे झालेल्या ७९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२००६), औंदुबर येथील ५७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१४ जानेवारी २०००), विदर्भ साहित्य संमेलन उमरखेड येथील ५१ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष (२०००) असे सन्मान त्यांच्या नावावर आहेत.

निसर्ग जीवन दर्शन-

पक्षी आणि निसर्ग ह्यांविषयी गेली ३५ वर्षे सतत निरीक्षण करून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. आणि मराठी साहित्य विश्वाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद आणि मराठी विज्ञान महासंघ यांच्याकडून सन्मानपत्र (१९९६) प्राप्त झाले असून विदर्भ साहित्य संघाचे सन्माननीय सदस्यपद त्यांना बहाल करण्यात आले आहे.

चितमपल्लींचे लेखन कला-जाणिवेने समृद्ध आहे. ‘केशराचा पाऊस’मधील  (२००५) दहा कथा, ललित गद्य कथा, आत्मकथन, व्यक्तिचित्रे, अनुवाद असे विविध प्रकारचे साहित्य त्यांनी निर्माण केले आहे. पक्षिशास्त्रज्ञ म्हणून जसे ते ओळखले जातात, तसे ते ‘ग्रंथपुण्यसंपत्ती’ जपणारा ग्रंथवेडा माणूस म्हणूनही सुपरिचित आहेत. आपल्या निसर्गानुभवाला अधिक समृद्ध करण्यासाठी देशोदेशीच्या लेखकांचे कसदार साहित्य त्यांनी मनस्वीपणे आस्वादले आहे. अन्य भाषांमधील, निसर्गानुभवावर आधारलेल्या अनुभवास मराठीत आणण्याची जबाबदारी घेतली. त्यासाठी अनुवाद प्रपंच केला. त्यात ‘भारतातील साप’, ‘मृगपक्षिशावक’ अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश होतो.

आज मराठी साहित्यसृष्टीला निसर्ग साहित्याचे नवनवे धुमारे फुटत आहेत. निसर्ग जीवनाचे सम्यक दर्शन त्यातून घडत आहे. मराठी साहित्याचे वनमित्र चितमपल्ली यांच्या ललित प्रतिभेचे हे देणे म्हणावे लागेल. निसर्गाची अनुपम देणगी असणारी वने, भोवतालच्या प्रदेशाला पाचूचे वैभव देणारे जलस्रोत, अमर्याद सागर, आकाशाची निळाई, सुजलसुफळ सस्यश्यामल धरणी, तिच्या अंगाखांद्यावर वाढणारी अद्भुत जीवसृष्टी, विविध आकार आणि स्वभावाची वनचरे, नाना रंग व बोलींचे पक्षी, त्यांचे सहजीवन, ऋतुचक्रांची बदलत जाणारी वैशिष्ट्ये, सृष्टीचे मनोहर विभ्रम आणि जनन-मरण सोहळे या सर्वांशी अभिन्न असे नाते असलेला निसर्ग-निर्भर माणूस आणि त्याची वनविद्या असे अनोखे जग चितमपल्लींच्या साहित्यातून सजीवपणे प्रकटले आहे.

ज्या-ज्या प्रदेशातील अरण्यात ते राहिले, तिथले मूळ रहिवासी गोंड, आदिवासी, कोरकू, आदी जंगलवासींशी त्यांचे मैत्र झाले. त्यांची त्यांनी लोभस व्यक्तिचित्रे रेखाटली. लोकसाहित्याशी त्यांच्या लेखनाचा असलेला अतूट धागा हा त्यांच्या लेखनाचा एक आगळा आविष्कार आहे.

मराठी साहित्याला निसर्ग हा काही नवीन नव्हता. मानवी भावभावनांनी आरोपित असा निसर्ग, पार्श्वभूमी किंवा परिणामद्रव्य म्हणून येणारा निसर्ग, मराठी साहित्याला परिचित होता. आपल्या अनुभव दर्शनासाठी ललित लेखकांनी निसर्गाचा असा कलात्मक जाणिवेतून उपयोग करून घेतला होता.

एक ललित लेखक म्हणून निसर्गाकडे पाहण्याचा चितमपल्ली यांचा दृष्टीकोन याहून भिन्न आहे. निसर्ग चैतन्यमय आहे. आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांनी तो समृद्ध आहे. त्याला स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आहे. त्याचे रसवैभव नित्यनूतन आहे आणि हे चैतन्यमय निसर्गजीवन अखंड वाहते आहे. या जीवनाशी माणसाचा निकटचा संबंध आहे. नव्हे, तो या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हे निसर्गभान आणि व्यापक असे जीवनभान त्यांच्या निसर्गानुभवामागे आहे. ते त्यांच्या साहित्यातही प्रतिबिंबित झाले आहे. चितमपल्ली हे निसर्ग आणि मानव यांचे नाते ओळखणारे वनमहर्षी आहेत. जंगलाविषयीच्या गाढ अनुभवातून हे जीवनसूत्र त्यांना गवसले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व साहित्य निसर्ग आणि माणूस यांच्या अन्वय स्थळांचे उत्तम दर्शन घडवते. चितमपल्लींचा हा दृष्टीकोन त्यांच्या साहित्याला वेगळेपण प्राप्त करून देतो.

त्यांची भाषाशैली निरलंकृत, सरळ व सुबोध आहे. त्यांच्या चिंतनशील वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या या सुगम निवेदनात स्पष्टपणे पडते. त्यांच्या ललित लेखनाची भाषा काव्यात्म आहे. स्वभावतःच सुंदर, एका अर्थाने जंगलचे देणे आहे, ती निसर्गबोली आहे. निसर्गानुभवाच्या आश्रयाने ती व्यक्त होते. वन्यजीवनाशी संबंधित कितीतरी नवीन शब्द, नावे येतात. भाषेला अर्थवाही करण्यातही त्यांची ही शैली, त्यातले अर्थवाहकत्व मनाला भिडते. त्यामागल्या कथा निसर्गाचा वेगळा अन्वय लावून दाखवतात. पर्यावरण प्रबोधनाच्या जाणिवाही चितमपल्लींच्या लेखनातून कधी अगदी थेट तर कधी सूचकतेने व्यक्त झाल्या आहेत.

वनोपनिषद-

आपल्या ललित लेखनातून अद्भुत, रंजक आणि ज्ञानवर्धक अशी निरीक्षणे ते नोंदवतात. त्याला संशोधनाचा, सूक्ष्म निरीक्षणाचा आधार असतो. ‘पक्षिकोश’, ‘आनंददायी बगळे’, ‘रातवा’, ‘पाखरमाया’ यांमधील अनेक विलक्षण नोंदी याचा प्रत्यय देतात. चितमपल्लींचे लेखन हे एका अर्थाने ‘निसर्गाचे लीलाचरित्र’ होय, असे डॉ. सुहास पुजारी म्हणतात ते सार्थच होय.

आपले समकालीन लेखक व्यंकटेश माडगूळकर, रेखाचित्रकार, आणि निरीक्षक, समीक्षक यांच्याशी चितमपल्लींचे मित्रत्वाचे नाते होते.

‘चकवा चांदणं: एक वनोपनिषद’ हे त्यांचे आत्मकथन वेगळ्या वाटेवरचे आगळ्या पद्धतीचे आत्मकथन आहे. त्यात ते म्हणतात, “वनविभागातली नोकरी काही मी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून आडवाटेच्या रानात आलो आणि चालत असताना मला आयुष्याची सुंदर वाट सापडली.” याच वेगळ्या जीवन सौंदर्याचे दर्शन या आत्मचरित्रातून लेखक घडवतो.

चितमपल्ली यांनी मराठी साहित्यात आपल्या निसर्ग-लेखनाने अधिक समृद्ध बनवले. अनुभव आणि आविष्कार या दोन्ही पातळ्यांवर हे समृद्धपण दिले. त्यात नाविन्य आहे, ताजेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी या निसर्गदृश्यातून लाभते. चितमपल्ली यांच्या ह्या सर्व लेखनामुळे मराठी साहित्यात निसर्ग-चित्रणाची ‘हिरवी वाट’ निर्माण झाली. त्यांच्या निसर्गपर लेखनाने मराठी साहित्यात निसर्गसाहित्याची ही पहाट झाली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.

निसर्गाची विविध रूपे आदिम काळापासून मानवी प्रतिभेला आवाहन करीत राहिली आहेत. कलावंताच्या सर्जनशील मनालाही विविधरूपिणी सृष्टीची रूपचित्रे रेखाटण्याचा मोह पुन्हा-पुन्हा होत राहिला आहे. मराठी साहित्यात, विशेषतः कविता, कादंबरी, कथा या साहित्यप्रकारांत कितीतरी निसर्गचित्रे त्यातून चित्रित झालेली आहेत. निसर्ग-लेखक चितमपल्ली यांनी अशा लेखनातून आपल्या नावाची ठसठशीत मुद्रा मराठी साहित्यात उमटवलेली आहे.

गेल्या तीन दशकांपासून चितमपल्ली यांनी सातत्याने निसर्ग-लेखन केले आहे. निसर्गानुभवांना मुखरित करणे ही त्यांची एकमेव अशी लेखन प्रेरणा आहे. अशी निसर्गनिष्ठा ही मराठी साहित्यात एकमेव द्वितीय म्हणावी लागेल.

- प्रा. अनुराधा साळवेकर/ आर्या जोशी

संदर्भ :

१.     चितमपल्ली मारुती[१]; ‘चकवाचांदण- एकवनोपनिषद’; मौज प्रकाशन गृह, मुंबई.

२.     पुजारी सुहास; ‘रानावनातला माणूस’; पद्मगंधा प्रकाशन, पुणे; २००६.

३. https://www.esakal.com/maharashtra/maruti-citamapalli-state-awards-24332

  1. ^ मराठी विश्वकोश https://marathivishwakosh.org/853/. 2019-02-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)