संध्याकाळच्या कविता (कवितासंग्रह)

संध्याकाळच्या कविता हा सुप्रसिद्ध मराठी कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांचा १९६७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे. इन्ग्रिड बर्गमन या अमेरिकी अभिनेत्रीच्या दिशेने कवी ग्रेस यांनी (त्यांच्याच भाषेत) हा काव्यसंग्रह सोडून दिलेला आहे. [] काव्यसंग्रहाच्या आरंभीच्या पृष्ठांमध्येच तसा स्पष्ट उल्लेख आहे. पाश्चात्य कलाकाराला मराठी साहित्यिकाने अर्पण केलेली ही बहुधा पहिलीच साहित्यकृती असावी. या संग्रहातील 'स्मरणशिल्प' या चौथ्या काव्यगुच्छात 'इन्ग्रिड बर्गमन्‌' या शीर्षकाची एक कविता आहे.

संध्याकाळच्या कविता

लेखक ग्रेस
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कवितासंग्रह
प्रकाशन संस्था पॉप्युलर प्रकाशन
प्रथमावृत्ती १९६७
चालू आवृत्ती तिसरी
माध्यम मुद्रित
पृष्ठसंख्या ८०
पुरस्कार कवी केशवसुत पुरस्कार, १९६८

अर्पणपत्रिका

संपादन

To Ingrid Bergman...

परिचय

संपादन

१९६० चे दशक सरता सरता पॉप्युलरच्या 'नवे कवी नवी कविता' या मालेतून ना. धों. महानोर (रानातल्या कविता), शंकर वैद्य (कालस्वर), वसंत सावंत (स्वस्तिक), पुरुषोत्तम पाटील (तळ्यातल्या सावल्या) हे कवी पुढे आले. याच मालेत ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता आल्या.

एकूण सहा काव्यगुच्छांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे. आषाढबन, चंद्रधून, मरणगंध, स्मरणशिल्प, ऊर्मिलेच्या कविता आणि बर्फाच्या कविता हे संग्रहातील काव्यगुच्छ आहेत. संध्याकाळी, सूर्य अस्ताला जात असताना निसर्गात उठणाऱ्या रंगतरंगांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कविता मानवी दुःखाचे अपूर्व चित्रण करतात आणि जड व चैतन्याच्या संगमावर तरळणाऱ्या संधिप्रकाशात इंद्रियगोचर सृष्टीपलीकडील अज्ञात प्रदेशाच्या लोभस खुणाही दाखवितात. या संग्रहात स्वतः कवीने पुस्तकाच्या अखेरीस दिलेल्या कालक्रमानुसार 'रंग' (जानेवारी १९५८) ते 'रंगास्त' (नोव्हेंबर १९६५) अशा सुमारे ८० कविता समाविष्ट आहेत.

ग्रेसच्या कवितेत सायंकालीन गूढ भावार्त मनस्थितीचा व्याकूळ सूर लागला आहे. ही पर्युत्सुकता सौंदर्यशास्त्राचे एक वैशिष्ट्यच आहे. मनाला भिजवून टाकणाऱ्या तरी निथळून जाणाऱ्या सायंकालीन संवेदना पकडताना ग्रेस यांनी वेगळीच प्रतिमासृष्टी निर्माण केली आहे. नवकाव्यातील यंत्रयुगीन, पाश्चात्यसंदर्भसंपृक्त प्रतिमासृष्टीहून वेगळी असलेली ग्रेसची प्रतिमासृष्टी लोकजीवनातून, भारतीय सांस्कृतिक संचितातून जन्म घेते. तलम, रेशमी, सांस्कृतिक संदर्भसंपन्न प्रतिमासृष्टी आपले परंपरेत रूजलेले भावविश्व अलगद जागे करते आणि गूढ, अपार्थिव, भारतीय मनात झिरपत आलेले ‘अरूपाचे रूप’ दाखवीत जाते.[]

दुर्बोधता?

संपादन

एकूण चार काव्यगुच्छांपैकी 'आषाढबन' या गुच्छातील 'उखाणा' ही कविता अतिशय मासलेवाईक आहे.

शुभ्र अस्थींच्या धुक्यात

खोल दिठीतली वेणा
निळ्या आकाशरेषेत
जळे भगवी वासना.
पुढे मिटला काळोख
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन

मऊ सशाचा उखाणा.

"कविता अनेक रूपांनी समोर येते. तिच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असू शकते. चित्रकार चित्र काढतो ते समोर दिसेल तसे. तसंच कवी सुरुवातीस कविते करतो ते घटना, प्रसंग किंवा वर्णनांवर. पण ज्याप्रमाणे क्रिएटिव्ह चित्रकाराला व्यक्त् होण्यासाठी सामान्य चित्रकला पुरेशी वाटत नाही, चित्राच्या माध्यमांतून मनातली वादळे, अस्व्स्थता, अशांतता या बाबींना तो चित्रबद्ध करू पाहतो तेव्हां त्याला वेगळं काही करावंसं वाटतं. मग त्याच्या मदतीला येतात त्या प्रतिमा. तुलनात्मक रित्या त्या भावनांची तीव्रता प्रगल्भ रसिकाला जाणवण्यासाठी प्रतिमेतून चित्रं मांडण्याने ते गूढ होत जाते. कुणी त्यास दुर्बोध म्हणेल. पण कविता समजण्यासाठी रसिकालाही प्रगल्भ असावे लागते. प्रा. सुरेशचंद्र नाडकर्णी, डॉ वि भा कुलकर्णी, ना. घ. देशपांडे यांची याबाबतची मतं अभ्यासूंनी पहावीत.

अशाच प्रकारे कवीलाही जाणिवांच्या प्रदेशात आपली कविता पोहोचतेय ही जाणीव होऊ लागते तेव्हां ती फक्त कविता राहत नाही. प्रत्येक साधकाला समाधीअवस्था, किंवा ध्यानावस्था पहिल्याच प्रयत्नात जमेल असं नाही. पण सरावाने अनेकांना ते जमू शकतं. पण प्रयत्नही न करता ध्यान अथवा समाधी याबद्दल शेरे मारण्याने नुकसान कुणाचंच होत नाही. ग्रेसजींच्या कवितेचं असंच आहे. या प्रतिमा मनात वादळं निर्माण करतात, किंवा शांतता. इथे अर्थाला स्थान कुठेय ?

खवळलेला समुद्र मनात अस्वस्थता निर्माण करतो, तर शांत समुद्र धीरगंभीर भाव. ओहोटीचा समुद्र निराशा उत्पन्न करतो, ढोबळमानाने या प्रतिमा अशा प्रकारे आपल्या भावनांचं प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे परंपरागत प्रतिमांमधून कविता त्याच त्याच पठडीत अडकल्यासारखी वाटले कि सर्जनशील कवीला नव्या प्रतिमा धुंडाळायला हव्यात हे जाणवू लागतं. एखादा कवी कुठली प्रतिमा कशी वापरतो हे कधी कधी त्याचा अभ्यास् असेल तरच लक्षात येतं. किंवा खूपदा वाचल्यानंतर सुसंगती लागण्याची शक्यता असतेही किंवा नसतेही. पण या प्रतिमा मनात चित्रं उमटवतात हे नक्की. ही उमटत काणारी चित्रमालिका एक अनुभव देते जो विलक्षण असतो हे ग्रेसजींच्या कुठल्याही कवितेत जाणवतं.

या कविता निव्वळ असंबद्ध असत्या आणि असा काही अलौकिक् अनुभव मिळत नसता तर ग्रेसजींना डोक्यावर् घेतले गेले असते का हा खरा प्रश्न आहे. हा संपूर्ण अभ्यास नसताना तोंडसुख घेण्याची एक पद्धत अलिकडे येऊ पाहते आहे जी अत्यंत घातक आहे.

या सर्वांना मुंगी उडाली आकाशी चाफा बोलेना, चाफा चालेना

या कवितांचे अर्थ विचारले असता ते निरुत्तर होताना दिसतात. या कविता आवडलेल्या आहेत हे मान्य तर करावेच लागते. मराठीत कविता ही काही काळ अध्यात्मवादी राहिली. संतांनी तिला फुलवली. त्यामुळे अध्यात्मातल्या अनेक प्रतिमा आज मराठी कवितेत आहे. ज्यांना गझल शिकण्यासाठी फार्सी, अरबी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ आहे त्यांनी अध्यात्मवादी कविता किमान नजरेखालून घालायला काय हरकत आहे ?

ग्रेसजींच्या कवितेत तर राघव, सीता या पौराणिक व्यक्ती , देवदेवता देखील प्रतिमा म्हणून सहज येतात. अहिल्येचा उल्लेख झाल्यास अहिल्येच्या कहाणीचा संदर्भ त्यात असणार हे उघड आहे. कवितेचा आशय पाहता अहिल्येच्या कहाणीचा नेमका कोणता संदर्भ लागू होतो हे पाहणे सोयीचे ठरते. अवतरण चिन्हातील मजकूर् हा या पानावर माझी भर असून वेळ मिळेल तसा नवा मजकूर इथे लिहिण्यात येईल"

मैत्रेयी भागवत्

याने ग्रेस कोणता परिणाम साधतात? स्वतः निर्मात्याने काही बोलल्याखेरीज ह्या कूटप्रश्नाचा निकाल लागणेच शक्य नाही असे वाटते. पहिल्या कडव्यात वेदनेचा संबंध डोळ्यांशी जोडलेला आहे. दुसऱ्या कडव्यातील 'पापणी' हा शब्दही साहचर्य दाखवितो पण एकंदरीत कविता म्हणून कुठलाही अर्थबोध ह्यातून होत नाही. अर्थाचे केवळ अंदाज बांधत राहणेच हाती उरते.
'पहाट' या कवितेत ग्रेस म्हणतात :

रित्या मुठीत झाकला

शुक प्रभेचा अनंत,
स्पर्शास्पर्शांत गोंदले

स्वप्न राधेचे हिवाळी.

पहाटेच्या रित्या मुठीतून सूर्य उदयास येतो आणि त्याच्या स्पर्शाने चराचर प्रकाशित होते असा सौंदर्यानुभूतीचा अनोखा प्रत्यय ही कविता देते जरूर पण राधेचा उल्लेख इथे का आणि राधेचे हिवाळी स्वप्न कोणते? या प्रश्नांची उत्तरे या कवितेमधून मिळत नाहीत. मातृत्वाचे साफल्य ही कल्पना कवीला अभिप्रेत आहे असे मानल्यास काहीसा अर्थ उलगडतो खरा पण तोही एक अंदाजच ठरतो.

"वरील समीक्षेबाबत टिप्पणी कराविशी वाटते. रित्या मुठीत झाकला, शुक प्रभेचा अनंत यातली शुक ही प्रतिमा वेदव्यास पुत्र महर्षी शुक यांच्याबाबत आहे. वेदनिपुण आणि अनंत प्रतिभा असलेले शुक रित्या मुठीत झाकून घेताना... इथे ग्रेसजींच्या कल्पनाशक्तीला, प्रतिभेला दाद द्यायची कि नाही ? ग्रेसजींची विद्वत्ता, व्यासंग हे समकालीन साहित्यिक, समीक्षक यामधे आढळत नाही. हा व्यासंग त्यांच्या कवितेत सहज दिसून येतो. अनेकदा सचिन तेंडुकलर आत्मविश्वासाने २० -२० स्पर्धेतला फटका टेस्ट क्रिकेट मधे खेळताना दिसतो. त्याचप्रमाणे पहिल्या द्विपदीत महाभारतातील प्रतिमा तर दुस-या द्विपदीत रामायणातील प्रतिमा हे अनेकदा त्यांच्या कवितेत दिसून येत. इथे त्या प्रतिमेचा व्यक्तीविशेष, स्वभावविशेष किंवा त्या प्रतिमेबाबत ठळकपणे समोर येणारी बाब इतकाच त्याचा वापर अपेक्षित असतो. "

मैत्रेयी भागवत

तसेच 'निर्मिती' ह्या कवितेचे.

अशा लाघवी क्षणांना

माझ्या अहंतेचे टोक
शब्द फुटण्याच्या आधी

ऊर दुभंगते हाक.

हाकेने ऊर दुभंगवल्यावरच शब्द फुटतात ही कल्पना सुंदर आहे पण कुणाची हाक? कसली हाक?
'चंद्रधून' या गुच्छातील 'पांढरे हत्ती' ही कविताही अशीच दुर्बोध ठरते. 'संध्याकाळचा सौंदर्यप्रत्यय' इथपासून ते 'अद्भुताचा झपाटून टाकणारा अनुभव' इथपर्यंत (ओढूनताणून) अर्थाच्या अनेक शक्यता ही कविता निर्माण करते. ग्रेस यांच्या कवितेत येणाऱ्या प्राचीन सांस्कृतिक प्रतिमा आणि यक्षिणींचे वाहन म्हणून पांढरा हत्ती असा अन्वय लावल्यास अर्थशोध सुलभ होईल असे वाटते खरे पण .. चाळीस वर्षे झाले पांढरे हत्ती 'अंधारबनातच' आहेत!
'कावळ्यांचा रंग' या कवितेतील अखेरचे कडवे असे आहे :

रात्र आंधळ्या कौलांची

कुणी आढ्याला बांधली
चंद्र पडला मरून

इथे पहाडाच्या खाली.

पहिल्या दोन ओळी अर्थबोध घडवितात पण मरून पडलेल्या चंद्राचे काय? पहाड कोणता? चंद्र का, कसा 'मेला'? कवितेतून तर काहीही सुचत नाही अशी स्थिती होते.

पानांच्या जाळीमधले

वाऱ्याचे कुंडल डुलते
ओठांची मिथिला ल्याया

पदरातुन नभ व्याकुळते

'मिथिला' ही एक पुराणकालीन नगरी आहे. ओठांची मिथिला म्हणजे काय? ती कशी ल्यायची? कवी ग्रेस यांच्या एका कन्येचे नावही मिथिला आहे. 'मिथिलेचे ओठ' असे तर त्यांना म्हणायचे नाही?
कवी ग्रेस यांचा आत्मा संध्याकाळच्या प्रहरी एकटा एकटा होतो हे त्यांच्या कवितांमधून सहज लक्षात येते. त्या आत्म्यातून एक अनुभवस्रोत वाहतो हे त्यांच्या भावाकुल, लयात्म शब्दांतून आणि ओळींतून जाणवते. हा स्रोत आंधळ्या प्रतीक्षेचा आहे. तिला एक 'स्वप्नगंध' आहे. तोच 'हरवला गंध' आहे. तोच 'मरणगंध' आहे. या प्रतीक्षाधर्मी स्रोताची दिशा धुक्यात लोपलेली आहे. ती कधी 'सांजबना'त, कधी 'अंधारबना'त आणि नेहमीच 'दुःखबना'त गोठून राहिलेली आहे.
प्रतीक्षा कशाची? कुणाची? कशाकरता? ग्रेस हे लपवतात. प्रतीक्षेचा शेवट आणि तिचा उगम कवितांमधून उलगडत नाही. शब्द ओळखीचे आणि अर्थही ओळखीचे पण अर्थाची सांगड मात्र जुळत नाही. त्यांची कविता भुलवते, अक्षरशः अवाक्‌ करून सोडते, काही वेळा अगदी थक्क करणारा प्रत्यय देते पण अर्थाच्या कोणत्याही दुलईत ऊब घेण्याचे ती नाकारते. या कवितेचा अर्थ हाच किंवा कवीला अभिप्रेत असलेला संदर्भ हाच याचीही हमी देता येत नाही.
सायास करूनही या कवितेशी संवाद साधता येत नसल्याने तिला दुर्बोध म्हणणे क्रमप्राप्तच आहे पण दस्तुरखुद्द ग्रेस यांच्या म्हणण्याप्रमाणेच ती कवितेच्या आकलनासंदर्भात अनेक मूलभूत प्रश्न निर्माण करते.

संदर्भ

संपादन
  1. ^ काळे, अक्षयकुमार. ग्रेसविषयी. p. १९.}.
  2. ^ प्रदक्षिणा, खंड दुसरा, कॉन्टिनेंटल प्रकाशन, १९९१, पृ. ३९.