संजीव गलांडे (जन्म २० सप्टेंबर १९६७) हे भारतातील नामवंत जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत.

गलांडे यांनी पुण्यातील सरस्वती मंदिर मराठी शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर, ज्ञान प्रबोधिनीत बारावी सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर एस.पी. कॉलेजमधून ते पदवीधर झाले.१९९६ मध्ये ते बंगळुरू येथे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेत दाखल झाले व तेथे ते जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. झाले. १९९६ ते २००१ या काळात गलांऎ यांनी अमेरिकेत लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी येथे डॉक्टरेट केली. २००१ मध्ये पुण्यात परत येऊन राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रात (एन.सी.सी.एस.मध्ये) त्यांनी संशोधन सुरू केले. सध्या ते 'आयसर' (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) - पुणे) या संस्थेत 'सेंटर फॉर एक्सलन्स इन एपिजेनेटिक्स' या विभागाचे प्रमुख आहेत.

डॉ. संजीव गलांडे यांचे संशोधन संपादन

मानवी शरीरात अब्जावधी जनुके असतात व ती ऋतुमानानुसार आपले काम करीत असतात. थंडीत काम करणारी जनुके उन्हाळ्यात चक्क गुंडाळून ठेवली जातात. पर्यावरणाचा मोठा परिणाम जनुकांच्या कार्यावर होतो, त्यामुळे जुळ्या मुलांपैकी एक भारतात राहिला अन् दुसरा अमेरिकेत गेला, तर दहा वर्षांनी जुळी असूनही दोघांमध्ये फरक दिसून येतो. अशा प्रकारे, जनुकांवर बाह्य घटकांचा जो परिणाम होतो त्याला 'एपिजेनेटिक्स' असे म्हणतात व याच विषयावर डॉ संजीव गलांडे यांचे संशोधन आहे.

डॉ. गलांडे यांच्या संशोधनाचा उपयोग संसर्गजन्य रोग व कर्करोग यांच्यामागची कारणे समजावून घेताना होईल असे वाटते. त्यांच्या प्रयोगशाळेने एपिजेनेटिक्सचे संशोधन करताना यीस्ट, ड्रॉसोफिला व झेब्राफिश या सजीवांची प्रारूपे तयार केली आहेत.

एपिजेनेटिक्स संपादन

एपिजेनेटिक्स म्हणजे जनुकशास्त्राच्या पुढच्या टप्प्याचे-एपि- शास्त्र. मानवात, तसेच बहुतेक सजीवांत पेशींच्या केंदकांत डीएनए असतात. या डीएनएवरील माहिती ए, टी, जी आणि सी या रासायनिक स्वरूपांत असते. या रासायनिक स्वरूपांत बदल होतो. म्हणजे डीएनएची शृंखला तशीच असते, परंतु रासायनिक स्वरूप बदलत जाते. या बदलांचा अभ्यास एपिजेनेटिक्समध्ये केला जातो.

मानवांमधीलच नव्हे, तर काही प्राण्यांमधील डीएनए सारखेच असतात. असे असताना प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते. तिचे रंग, रूप, आचार, विचार हे सारे वेगळे असते. याचे कारण डीएनएच्या रासायनिक स्वरूपातील बदल. यामुळे आनुवांशिकत्व बदलत रहाते. ही बदलाची प्रक्रिया सतत चालू असते. डीएनए व त्यांच्या जोडीने काम करणारी प्रथिने यांमध्येही बदल होत असतात. आणि त्यांची दखल पेशींमध्ये घेतली जाते. या बदलांना क्रोमेटिन चेंजेस म्हटले जाते. या क्रोमेटिन चेंजेसचा अभ्यास करता आला, तर विविध व्याधींबद्दल माहिती मिळू शकते.

डॉ. संजीव गलांडे यांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • तरुण संशोधकांना जीवशास्त्रातील उल्लेखनीय संशोधनासाठी भारत सरकारचा 'बायोसायन्सेस ॲवॉर्ड फॉर कारकीर्द डेव्हलपमेंट'
  • भारत सरकारची सुवर्णजयंती शिष्यवृत्ती .
  • जी. डी. बिर्ला पुरस्कार
  • शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार