’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक नरहर गणेश कमतनूकरांनी इ.स. १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले, पण तत्कालीन व्यावसायिक रंगभूमीवर मात्र काही दिवसातच ते अपयशी ठरले. तरीही, कमतनूकरांनी लिहिलेल्या संवादांचा नूर काही औरच आहे हे समीक्षकांच्या नजरेस आले, आणि कमतनूकर हे नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत लेखक आहेत, हे सिद्ध झाले. नाटकाची संहिता राम गणेश गडकरी यांच्या खटकेबाज संवादांची आठवण करून देणारी आहे.

’श्री’चे ५०-६० प्रयोग झाल्यानंतर बापूराव पेंढारकरांनी प्रयोग करणे थांबवले. ललित कलादर्शच्या शतक महोत्सवात हे नाटक परत रंगभूमीवर आणायचे असे डोंबिवलीकरांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे ४ जानेवारी २००८ रोजी या नाटकाचा प्रयोग ’डोंबिवली भूषण’ शं.ना. नवरे यांच्या उपस्थितीत झाला.

नाटकाची मूळ संहिता २५० पानांची होती, ती ६० पानांवर आणली गेली. अप्पासाहेब रावबहादुर, त्यांचा जुगारापायी बिघडलेला मुलगा कुसुमाकर, त्यांची तरुण मुलगी श्री व घरजावई श्रीकांत, कुसुमाकर याची पत्‍नी कात्यायनी व कुटुंबाला पूर्णपणे बरबाद करणारा अप्पासाहेबांचा मित्र व खलनायक विश्राम आणि रेसचा बुकी सत्यवान सत्यवादी अशी मोजकी सात-आठ पात्रे नाटकात आहेत.

नाटकातल्या ’सत्यवान सत्यवादी’ नावाच्या इरसाल पात्राची भूमिका सुहास नवरे यांनी व्यावसायिक अंदाजाने खुलवली होती. श्रीकांतला घोड्याच्या रेसचा नाद सत्यवान आणि विश्राम हे दोघे लावतात; पण गांजेकस असलेला सत्यवान मनाने चांगला आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. विश्रामची भूमिका डोंबवलीकर विवेक जोशी यांनी, अप्पासाहेबांची सुरेश ताम्हाने यांनी आणि ’श्री’ची प्रज्ञा देवस्थळे यांनी रंगविली होती नाटकातल्या पदांना विलास हर्षे यांनी चाली बसवून दिल्या होत्या. नाटक वेलणकर यांच्या ’सार्थक’ या संस्थेने रंगभूमीवर सादर केले. नाटकाचे वैशिष्ट्य

बापूराव पेंढारकार जेव्हा हे नाटक रंगभूमीवर सादर करायचे, तेव्हा पडद्यावर कॅमेराच्या साहाय्याने ते घोड्यांची शर्यत दाखवायचे. लोकांसाठी तो सर्वाधिक आकर्षणाचा मामला होता. २००८ साली डोंबिवलीत झालेया प्रयोगात मात्र पडद्यावर शर्यती दाखवणे शक्य झाले नव्हते.