संगीत रत्‍नाकर

(संगीत रत्नाकर या पानावरून पुनर्निर्देशित)

हा भारतात तेराव्या शतकात रचलेला संगीतशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा महाराष्ट्रातील देवगिरीच्या सिंहणराजाच्या काळात आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ शारंगदेव—अथवा निःशङ्क शार्ङ्‌गदेव—यांनी १३व्या शतकात रचला. हा ग्रंथ आजही हिंदुस्तानी संगीताचा प्राण समजला जातो. याचे लेखन इ.स. १२१० पासून इ.स. १२४७ पर्यंत म्हणजे ३७ वर्षे चालू असावे असे मानले जाते.

स्वरूप

संपादन

संगीत रत्‍नाकरात शारंगदेवाने संगीताच्या सिद्धान्तांचे इतके सक्षम, स्पष्ट आणि प्रामाणिक विवेचन केले आहे.या ग्रंथात शारंगदेवाने संगीताच्या अत्यंत व्यापक आणि विशाल क्षेत्राचा परिचय करून दिला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या काळात आणि त्याच्याही आधी होऊन गेलेल्या सुमारे ४० पूर्वाचार्यांच्या मतांचे सार काढले आहे. या चार-खंडी ग्रंथात एकूण सात प्रकरणे आहेत. संगीतावर लिहिल्या गेलेला संस्कृतमधील ग्रंथांपैकी हा सर्वात मोठा ग्रंथ आहे असे मानले जाते. या ग्रंथावर सर्वात जास्त टीका लिहिल्या गेल्या आहेत,तसेच या ग्रंथाच्या सर्वाधिक अवृत्ती निघाल्या आहेत असे मानले जाते. या ग्रंथावर काशीपती कविराज, कलानिधी (इ.स. १४३०), कल्लिनाथ (इ.स. १४३०), गंगाधर, सिंहभूपाल (इ.स. १३३०) वगैरे विद्वानांनी टीका लिहिल्या आहेत. सिंहभूपाल यांनी लिहिलेल्या टीकाग्रंथाचे नाव संगीतसुधाकर असे आहे.[]

जगांतल्या अनेक भाषांत संगीत रत्‍नाकरचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

ग्रंथाचा परिचय

संपादन
ग्रंथातील सात प्रकरणे
  1. स्वरगताध्याय
  2. रागविवेकाध्याय
  3. प्रकीर्णकाध्याय
  4. प्रबंधाध्याय
  5. तालाध्याय
  6. वाद्याध्याय
  7. नर्तनाध्याय

ही सर्व प्रकरणे त्यांच्या नावाप्रमाणेच कंठसंगीत, वाद्यसंगीत, तंतुवाद्ये आणि तालवाद्ये या विषयांवर आहेत. सातवे नर्तनाध्याय नावाचे प्रकरण नृत्यासंबंधी आहे. संगीत रत्‍नाकरात अनेक तालांचा उल्लेख आहे. दहाव्या शतकाच्या अंतापर्यंत असलेल्या संगीतपद्धतीला प्रबंध म्हणले जाई. हे प्रबंध दोन प्रकारचे होते, निबद्ध प्रबंध आणि अनिबद्ध प्रबंध. निबद्ध प्रबंध तालांच्या मर्यादेत राहून गायला जाई, तर अनिबद्ध प्रबंध मुक्त रूपात गायला जाई.

प्रबंध

संपादन

प्रबंध ही गेय रचना असून तो संगीतातील एक पारिभाषिक शब्द आहे. उदाहरणार्थ,

चतुभिर्धातुभिः षड्‌भिश्चाङ्‌गैर्यस्मात्‌ प्रबध्यते।
तस्मात्‌ प्रबन्धः कथितो गीतलक्षणकोविदैः॥

१२व्या शतकात झालेल्या कवी जयदेव याने आपले गीतगोविंद हे काव्य प्रबंध रूपात रचले आहे. ते प्रबंध असे आहेत. :-
१ला प्रबंध : राग मालव, ताल रूपक
२रा प्रबंध : राग गुर्जरी, ताल प्रतिमठ
३रा, १४वा आणि २०वा प्रबंध : राग वसंत, ताल यति
४था प्रबंध : राग रामकली, ताल रूपक
५वा प्रबंध : राग गुर्जरी, ताल रूपक
६वा प्रबंध : राग मालवगौड, ताल एकताल
७वा, ११वा आणि १५वा प्रबंध : राग गुर्जरी, ताल एकताल
८वा प्रबंध : राग कामदा, ताल एकताल
९वा प्रबंध : राग देस, ताल एकताल
१०वा, १६वा आणि २२वा प्रबंध : राग वराडी, ताल रूपक
१२वा प्रबंध : राग गुणकली, ताल रूपक
१३वा प्रबंध : राग मालव, ताल यति
१७वा प्रबंध :राग भैरव, ताल रूपक
१८वा प्रबंध : राग गुर्जरी, ताल यति
१९वा प्रबंध : राग वराडी, ताल अष्टताल
२१वा प्रबंध : राग वराडी, ताल आडव
२३वा प्रबंध : राग विभास, ताल एकताल आणि,
२४वा प्रबंध : राग रामकली ताल यति

मराठी भाषांतर

संपादन
  • संगीतरत्‍नाकर या संस्कृत ग्रंथाचे, त्यावरील ’कलानिधि’ टीकेसह मराठी भाषांतर, गणेश हरी तार्लेकर (जन्म : १९१४) यांनी केले, आणि ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने इ.स. १९७५मध्ये प्रकाशित केले.
  • महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीने ’संगीत रत्‍नाकर - एक अध्ययन’ या श्रीराजेश्वर मिश्र यांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या ग्रंथाचा मदनलाल व्यास यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशित केला आहे.
  1. ^ Sarangadeva, Srangadeva. Sangita Ratnakara.