श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय (सातारा)

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा हे सातारा शहरातील सार्वजनिक वाचनालय आहे. महाराष्ट्रातील १५० वर्षे पूर्ण केलेल्या मोजक्या ग्रंथालयांत याचा समावेश होतो.

स्थापना संपादन

प्रतापसिंह महाराजांना ग्रंथसंकलन करण्याचा छंद होता. त्यांनी स्वतःचे एक ग्रंथालय सुरू केले होते. त्यांच्यानंतर त्यांचे बंधू आप्पासाहेब यांनीही त्यांत भर घातली. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सगुणाबाई यांनी हे ग्रंथालय त्याच्या जागेसह जनतेच्या स्वाधीन केले. अशाप्रकारे या वाचनालयाची स्थापना ६ जुलै १८५३ रोजी झाली. सुरुवातीचे नाव 'नेटिव्ह जनरल लायब्ररी' असे होते. १८६६ मध्ये आणखी एका वाचनालयाचे यात विलीनीकरण होऊन 'सातारा सिटी जनरल लायब्ररी' असे नामकरण झाले.[१]

सन १९०१ साली व्हिक्टोरिया राणीच्या निधनानंतर सातारा शहरात त्यांच्या नावाने एखादे स्मारक असावे असा प्रस्ताव कलेक्टर यांनी मांडला. तो मान्य होऊन त्यासाठी रु. २०००चा फंड गोळा करण्यात आला. या फंडात पूर्वीचे कलेक्टर जे. आर. आर्थर यांच्या नावे जमविलेला रु. ४०००चा फंड व वर्गणीचे रु. २००० अशा आठ हजार रुपयात दुमजली इमारत बांधली गेली. याचे उद्घाटन ७ ऑगस्ट १९०५ साली करण्यात आले. यावेळी या वाचनालयाचे नामकरण 'व्हिक्टोरिया लायब्ररी' असे झाले. सभागृहाला 'आर्थर हॉल' असे नाव देण्यात आले. सन १९२० मध्ये तत्कालीन अबकारी कमिशनर आर्थर यांचे चिरंजीव होते. या हॉलमध्ये इंग्रज राजवटीच्या विरोधात चर्चा घडत असल्याने त्यांनी नाव बदलण्यास सांगितले. सार्वजनिक कामात सक्रीय असणारे रावबहादुर वि. ना. पाठक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वारसांनी हा हॉल अद्ययावत करण्यासाठी रु. २०००चा निधी दिला. यामुळे या हॉलचे नामकरण 'पाठक हॉल' असे करण्यात आले.

सन १९३८ मध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणात जनतेच्या मागणीमुळे याचे नाव बदलून 'नगर वाचनालय' असे केले गेले.[२] सन १९४९ मध्ये सरकारने ' मुक्तद्वार जिल्हा वाचनालय' म्हणून मान्यता दिली.

वैशिष्ठ्ये संपादन

अनेक प्रतिथयश व्यक्तींच्या घडणीत या वाचनालयाचे योगदान आहे. शिवाजीराव भोसले, दत्तप्रसाद दाभोलकर, म. वि. कोल्हटकर इ.चा यात समावेश होतो.[३]

संग्रह संपादन

वाचनालयात एकूण ८२,२१८ पुस्तके, १०४ नियतकालिके, २७ वर्तमानपत्रे आणि २१६ दुर्मिळ ग्रंथ आहेत.[४]

उपक्रम संपादन

महाराष्ट्र शासनाचे अनुदान, वर्गणी व देणग्या यावर सर्व कामकाज चालते. वाचनालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सन २००३ मध्ये साजरा झाला. यावेळी 'श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय' असे नामकरण केले गेले. शतकोत्तर हीरक महोत्सव फेब्रुवारी २०१३ मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी संकेतस्थळ, अभ्यासिका व इतर नवीन सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.[५]

संदर्भ संपादन

  1. ^ Bombay Gazetteer Deccan - Satara. Bombay. 1853. pp. 414, 415.
  2. ^ आचार्य, श्री. बा. (१९७८). नगर वाचनालय : १२५ वर्षांची वाटचाल (स्मरणिका). सातारा: नगर वाचनालय, सातारा.
  3. ^ दाभोलकर, देवदत्त (२००३). शतकोत्तर सुवर्ण महोत्सव स्मरणिका. सातारा: नगर वाचनालय.
  4. ^ "New Library Registration | National Mission on Libraries". www.nmlindia.nic.in. 2019-12-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ "नगरवाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवास साताऱ्यात शनिवारी प्रारंभ". Loksatta. 2019-12-02 रोजी पाहिले.