महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आले आहे.

शिशुपाळवध
लेखक भास्करभट्ट बोरीकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार काव्यग्रंथ

परिचय

संपादन

१०८७ ओव्या. महाभारताच्या सभापर्वात आणि भागवताच्या दशमस्कंधात शिशुपाळवधाची कथा आहे पण भास्करभट्ट केवळ आधारांवरच अवलंबून नाहीत. माघ, जयदेव, कालिदास हे भास्करभटांचे आदर्श होत : देखौनि महाकवींचा पंथु : मज होतसे मनोरथु : विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचेच संस्कार या ग्रंथात अधिक आढळतात. साहित्याचेनि परिमळे : शृंगाराचेनि मेळे : प्रबंध होति मातावळे : कविजनांचे । असे भास्कराने म्हटलेले आहे. भास्कराने लिहिलेल्या या ओवीतच त्याचा साहित्यविषयक दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला आहे; नव्हे त्याचे प्रात्यक्षिक ‘शिशुपाळवधा’त करून आपला प्रबंध शृंगाराने ‘मातावळा’ बनवला आहे. सभावर्णन, निसर्गवर्णन, युद्धवर्णन, जलक्रीडावर्णन, विरहवर्णन, द्वारकावर्णन या पद्यात आढळतात.

पंथीय समीक्षा

संपादन

भटो ग्रंथु निका जाला : परि निवृताजोगा नव्हेचि (ग्रंथ तर उत्तम जमून आला आहे पण निवृत्तीमार्गासाठी हा उपयुक्त नाही!) : इति बाइदेवबास. बाइदेवबासांचे हे उद्गार मराठी समीक्षेचे पहिले वाक्य ठरते. पाल्हाळ, औचित्यानौचित्याचा विवेक नसणे, अस्थानी शृंगार, कालविपर्यास हे दोष या काव्यात आहेत. शृंगारबहळता हा गंभीर दोष या पद्यात आहे.