शाब्दबंध
शाब्दबंध म्हणजे शब्दगत संकल्पनांचा कोश. मानवी भाषेचे शब्दसंग्रह, रूपव्यवस्था, पदान्वय आणि अर्थविचार ही अंगे अभ्यासकांनी मानली आहेत. ह्यांपैकी शब्दसंग्रह ह्या अंगाचा अभ्यास अभ्यासक करीत असतात. मनोवैज्ञानिक दृष्टीने भाषेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी मानवी बुद्धीत शब्द कशा प्रकारे साठवले जातात, त्यांची धुंडाळणी कशी होते ह्याविषयी प्रयोग करून काही निष्कर्ष काढलेले आहेत. ह्या अभ्यासातून लाभलेल्या मर्मदृष्टीचा वापर करून प्रिन्स्टन विद्यापीठातील डॉ. जॉर्ज मिलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाब्दबंध ह्या संकल्पनेला मूर्त रूप दिले.
सांकल्पनिक पार्श्वभूमी
संपादनशाब्दबंधाची घडण ही भाषाविज्ञान, संगणकविज्ञान, शब्दकोशरचनाशास्त्र अशा विविध शास्त्रांशी संबंधित आहे .
विभागात्मक अर्थविचार आणि संबंधात्मक अर्थविचार
संपादनभाषाविज्ञानात भाषेच्या अर्थ ह्या अंगाविषयी विविध सिद्धान्त मांडले जातात. १९९०पूर्वीच्या दशकात पाश्चात्त्य भाषाविज्ञानाच्या परंपरेत विभागात्मक अर्थविचाराचे प्राबल्य होते. ह्या विचारातला मुख्य भाग म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ हा अनेक अर्थघटकांच्या एकत्रीकरणाने बनलेला असतो. शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण करून आपल्याला काही अर्थघटक मिळतात. उदा. मुलगा = + मानव + नर - वयस्क विभागात्मक अर्थविचाराच्या पुरस्कर्त्यांची अटकळ होती की ह्या रीतीने विश्लेषण करत राहिल्यास आपल्याला अर्थाचे मूलभूत घटक हाती लागतील. मात्र ९० च्या दशकापर्यंत तरी हा प्रयत्न सफल झाला नव्हता.
घडण
संपादनशाब्दबंधातील एकेक सुटी नोंद म्हणजे समानार्थी शब्दांचा संच असते. संक्षेपाने ह्याला नुसतेच संच म्हणता येईल. उदा. झाड, वृक्ष, तरू. हा समानार्थी शब्दांचा संच एक अर्थ दाखवतो. नोंदीत हा अर्थ समानार्थी शब्दांच्या पुढे लिहिलेला असतो. आणि शेवटी उदाहरणादाखल एक वाक्य दिलेले असते. एकंदर नोंद आपल्याल्या पुढीलप्रमाणे दिसते.
झाड, वृक्ष, तरुवर, द्रुम, तरू, पादप -- मुळे,खोड,फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष"झाडे पर्यावरण शुद्ध करण्याचे काम करतात"
ह्याच प्रकारे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या नोंदींद्वारे दाखवले जातात.
शब्दकोशाहून वेगळेपण
संपादनशब्दकोशात शब्द काही एका धोरणाने मांडलेले असतात. उदा. शब्दरूपांची अकारविल्हे मांडणी आपल्याला परिचित असते. भाषेचा वर्णक्रम ठाऊक असला की हवा असलेला शब्द कोशातून अचूक हुडकता येतो. अर्थात अकरविल्हे मांडणी आपल्याल्या अधिक सरावाची असली तरी कोशातील मांडणीचे ते एकमेव तत्त्व नाही. पर्यायकोशात समानार्थता, विरुद्धार्थता इ. निकष वापरून शब्द मांडलेले असतात.