व्ही.के. विस्मया

भारतीय धावपटू
(व्ही.के.विस्मया या पानावरून पुनर्निर्देशित)

व्ही. के. विस्मया (वेलुवा कोरोथ विस्मया) (जन्म: १४ मे १९९७) ही एक भारतीय धावपटू आहे, ती ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रवीण आहे. २०१८ च्या आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिलांच्या ४×४०० मीटर रिले संघाचा ती भाग होती. २०१९ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने ४×४०० मीटर रिलेमध्ये महिला गटात तसेच मिश्र गटात रौप्यपदके जिंकली.

व्ही. के. विस्मया ही दोहा येथील २०१९मधील वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मिश्र रिले संघाची सदस्या होती. हा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आणि आता त्याने २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकसाठीही आपले स्थान पक्के केले आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी संपादन

विस्मयाचा जन्म १९९७ साली केरळच्या कन्नूर जिल्ह्यात झाला. उच्च-माध्यमिक शिक्षण घेत असताना तिचे ध्येय अभियंता बनण्याचे आणि त्यापुढेही उच्च शिक्षण घेण्याचे होते. पण त्याच दरम्यान तिची बहीण विजिशा एक अ‍ॅथलीट होण्यासाठी प्रशिक्षण घेत होती. अखेर विस्मयानेसुद्धा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अ‍ॅथलीट होण्याचा निर्णय घेतला. [१]२०१३साली कोडमंगलम येथील सेंट जॉर्ज उच्च-माध्यमिक विद्यालयात इयत्ता ११वीत असताना तिने दक्षिण क्षेत्र शालेय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. विस्मयाचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत आणि आई गृहिणी आहे.

प्रशिक्षण संपादन

विस्मया अभ्यासात हुशार असल्याने तिला अव्वल अ‍ॅथलीट तयार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या असम्पशन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. २०१४मध्ये तिने तिच्या केरळ राज्यासाठी दोन रौप्य पदके जिंकली, तरीही व्यावसायिक खेळाडू होण्याचा पेशा स्वीकारण्याबद्दल तिला खात्री नव्हती. त्यामुळे ती शिक्षण आणि खेळ यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करू लागली, दोन्ही क्षेत्रांमध्ये हेलकावे खाऊ लागली. अखेरीस तिचे प्रशिक्षक आणि असम्पशन कॉलेजमधील क्रीडा संचालकांनी तिला करीअर म्हणून अ‍ॅथलेटिक्स घेण्यास तयार केले.घरची आर्थिक परिस्थिती बघता  तिला करीअर निवडताना खूप विचार करावा लागला. कारण इंजिनीअरिंग कॉलेजमधून बाहेर पडून पूर्णवेळ क्रीडाक्षेत्रात येणे, तिच्यासाठी खूप मोठा निर्णय होता.

कारकीर्द संपादन

व्ही . के. विस्मयाने अडथळा शर्यतीतली धावपटू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण एका दुखापतीमुळे तिला दुसरी वाट धरावी लागली. [२]मग तिने मध्यम पल्ल्याची धावपटू म्हणून प्रशिक्षण सुरू केले. शाळेतना कृत्रिम सिंथेटिक ट्रॅक होताना आधुनिक व्यायामशाळा. त्यामुळे पावसाळ्यात मातीच्या ट्रॅकवर सराव करणे खूपच कठीण होऊन बसत असे.

व्यावसायिक यश संपादन

२०१७मध्ये व्ही. के. विस्मयाच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक क्षण आला. २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. सोबतच एक २५ वर्षाचा विक्रम मोडीत काढला. तिथेच तिने ४०० मीटर शर्यतीत रौप्य पदकही जिंकले, तेव्हा लोक तिला ओळखू लागले.

याच चॅम्पियनशिपमधील कामगिरी बघून तिची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. तिथे तिला सर्व आधुनिक प्रशिक्षण सोयीसुविधा मिळाल्या, शिवाय चांगले प्रशिक्षकही लाभले.

२०१८ च्या जकार्ता येथील आशियाई खेळांमध्ये ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला ४×४०० मीटर रिले संघाची सदस्य होती. हा तिच्यासाठी पहिला मोठा अभिमानास्पद क्षण होता.[३]

दोहा येथील २०१९ विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत विस्मया, मोहम्मद अनस, नोआ निर्मल टॉम आणि जिस्ना मॅथ्यू या संघाने ४×४०० मीटर मिश्र रिलेमध्ये भाग घेतला. इथे त्यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आणि २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान पक्के केले.

एका वर्षानंतर २०१९मध्ये चेक प्रजासत्ताकच्या बर्नो शहरात झालेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत विस्मयाने ४०० मीटरचं अंतर ५२.१२ सेकंदांमध्ये पार करत सुवर्णपदक जिंकले. [४]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "BBC News मराठी".
  2. ^ "Interview: VK Vismaya, accidental runner who held off a world champ to seal 4X400 Asian Games relay gold". The New Indian Express. 2021-03-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Interview: VK Vismaya, accidental runner who held off a world champ to seal 4X400 Asian Games relay gold". The New Indian Express. 2021-03-13 रोजी पाहिले.
  4. ^ "What A Run! Indian Sprinter VK Vismaya Wins 400m Gold In Czech Republic". IndiaTimes (इंग्रजी भाषेत). 2019-08-29. 2021-03-13 रोजी पाहिले.