व्यवसाय शिक्षण
व्यवसाय शिक्षण (व्होकेशनल एज्युकेशन). कृषी, व्यापार, उद्योग इ. क्षेत्रांतील प्रगतीसाठी व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाच्या मिश्र शिक्षणपद्धतीद्वारे,माध्यमिक शाळांत तसेच महाविद्यालयीन दर्जाच्या शिक्षणसंस्थांत दिले जाणारे प्रशिक्षण. हे प्रशिक्षण सर्वसामान्य शिक्षणापेक्षा वेगळे असते. नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता ह्या शिक्षणाद्वारे संपादन करता येते. या गुणवत्तेमध्ये कौशल्य, क्षमता, ज्ञान, वृत्ती, कार्यव्यग्रता व पारख करण्याची शक्ती या सर्व गोष्टींचा समावेश होतो.
व्यवसायात काही प्रकारभेद आढळतात, ते असे : (१) पारंगततेसाठी शिकणाऱ्यांच्या अंगी आवश्यक असणारी गुणवत्ता काही व्यवसायांत उच्च, दर्जाची, तर काहींत सामान्य दर्जाची असते. (२) पारंगततेसाठी मिळवावयाचे ज्ञान काही व्यवसायांत विविध प्रकारचे व जटिल असते, तर काहींत अल्प ज्ञान पुरेसे होते. (३) पारंगतता मिळविण्यासाठी लागणारा कालावधी काही व्यवसायांत दहा वर्षांपर्यंत, तर काहींत दोन-तीन महिन्यांचा असतो. थोडक्यात, विविध व्यवसायांसाठी लागणारे शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचे असते. वैद्यकासारख्या व्यवसायात पारंगत होण्यासाठी श्रेष्ठ बुद्धिमत्ता, तसेच तात्त्विक व प्रात्यक्षिक अभ्यास आवश्यक असतो. याउलट डाकघरात पत्रांचे वर्गीकरण करणाऱ्यां व्यक्तीला भाषाज्ञान पुरते आणि व्यवसायातील कुशलता अल्पज्ञानाने किंवा प्रत्यक्ष अनुभवाने मिळविता येते.
व्यवसाय शिक्षण हे व्यवसायांची विविधता आणि विपुलता या कारणांनी अनेक स्तरांवर आयोजित केले जाते किंवा उपलब्ध असते. त्या दृष्टीने सामान्यपणे व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणाची संरचना व्यापक ठरते. मराठी विश्वकोशात या दृष्टीने अनेक नोंदी स्वतंत्रपणे दिलेल्या आहेत : उमेदवारी, औद्योगिक शिक्षण, कामगार प्रशिक्षण, कृषिशिक्षण, तंत्रविद्या, तांत्रिक शिक्षण, विज्ञान, विज्ञानशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शिक्षण व शिक्षणशास्त्र इत्यादी. यांशिवाय अभियांत्रिकी, वैमानिकी यांसारख्या नोंदींत संबंधित विषयांच्या शिक्षण-प्रशिक्षणाविषयीची माहिती थोडक्यायत दिलेली आहे.
व्यवसाय शिक्षणाच्या पद्धती
संपादनव्यवसायशिक्षण देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांपैकी व्यवसाय-विद्यालयात शिक्षण देणे हा एक प्रकार व कारखान्यांत उमेदवारी पद्धतीने शिकविणे हा दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारात वरील दोहोंचा समन्वय केलेला असतो. तांत्रिक शिक्षण घेत असताना त्याच्या जोडीला व्यवसाय-स्थळी उमेदवारी पद्धतीने शिक्षण देण्यात येते. ही तिसरी पद्धत सर्वोत्कृष्ट मानली जाते. म्हणून प्रगत देशांत व्यवसाय-विद्यालये आणि कारखाने, औद्योगिक कंपन्या, यंत्रशाळा व उद्योगशाळा इत्यादींत व्यवसायशिक्षणासाठी परस्परसहकाऱ्याचे संबंध जोडले जातात.
व्यवसायशिक्षणाची दोन भिन्न स्वरूपे आढळतात. नोकरीत प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असे व्यवसायपूर्व शिक्षण हा एक प्रकार आणि सेवाकालात अधिक कार्यक्षमता मिळविण्यासाठी योजिलेले व्यवसायांतर्गत किंवा व्यवसाय-मध्य शिक्षण हा दुसरा प्रकार. उमेदवारी पद्धतीमध्ये या दोन्ही स्वरूपांचा संयोग आढळतो. व्यवसायपूर्व शिक्षण साधारणत: पूर्ण वेळ चालणाऱ्या शिक्षणसंस्थांतून देतात आणि व्यवसाय-मध्य शिक्षण साधारणपणे अल्पकाळ चालणाऱ्या सायंकालीन प्रौढ शिक्षणवर्गात देतात.
व्यवसाय शिक्षणाचा हेतू विशिष्ट धंदा करून उपजीविका करता यावी, हा असतो, तर गुणवत्तेच्या शिक्षणाचा हेतू दृष्टिकोन व्यापक करण्याचा असतो. उदा., प्राथमिक व माध्यमिक शाळांत चित्रकला शिकविण्याचा हेतू सौंदर्यदृष्टी निर्माण करणे व कल्पकतेस उत्तेजन देणे, हा असतो. उलट पहिल्या प्रकारात रोजगार यशस्वीपणे करावा, म्हणून शिल्पशाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षण दिले जाते. प्रगत देशांत व्यवसायशिक्षणाचा व्याप मोठा आहे. विद्युत, इलेक्ट्रॉ निकी, तंत्रविद्या, स्थापत्य, वैद्यक, सैनिकी, विधी, वाणिज्य, व्यवस्थापन, कृषी इ. विषयांच्या शिक्षणाची सोय विद्यापीठांत व महाविद्यालयांत केलेली असते. याच व्यवसायांतील निम्नस्तरीय उमेदवारांसाठी माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवर प्रशाळा असतात. इतकेच नव्हे तर न्हावी, धोबी, स्वयंपाकी, वाढपी, रक्षक, विक्रेता, मोटारचालक इ. व्यावसायिकांसाठीही शिक्षणाची सोय केलेली असते. एखादे काम केवळ सरावाने करू लागणे व तेच काम तंत्रमंत्र समजून घेऊन शिकणे, यांत कार्यक्षमतेच्या दृष्टीने महदंतर असते, हे त्यामागील गृहीततत्त्व आहे. सर्व कामगार समाजाचे सेवक असतात, त्यांनी करावयाची सेवा कमीत कमी काळात व अल्प श्रमात समाधानकारक होण्यासाठी, केवळ उमेदवारी व्यवसायपद्धतीचा वापर न करता, विविध व्यवसायांसाठी शास्त्रोक्त शिक्षणाची सोय उपलब्ध होणे अगत्याचे आहे.
व्यवसाय शिक्षणाची सूत्रे
संपादनव्यवसायशिक्षण यशस्वी होण्यासाठी पुढील काही सूत्रांचे पालन होणे आवश्यक असते : (१) व्यवसाय करणाऱ्याच्या अंगी आवश्यक ती मानसिक व शारीरिक क्षमता असावी. उदा. संशोधकांच्या व्यवसायासाठी श्रेष्ठ बुद्धिमत्ता व चिकाटी हे गुण आवश्यक असतात, तर परिचारिकेच्या अंगी सोशिकता व सहानुभूती हे गुण असावे लागतात. आवश्यक गुण अंगी नसणारी व्यक्ती अंगीकृत व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून गुणवत्तेची चिकित्सा व तीनुसार मार्गदर्शन होण्याची सोय शिक्षणव्यवस्थेत समाविष्ट असणे आवश्यक आहे. अशा मार्गदर्शनाच्या अभावी व्यवसायशिक्षणाची उद्दिष्टे पुरी होऊ शकणार नाहीत. (२) शिक्षणात केवळ कौशल्य हस्तगत करण्यावर भर नसावा. त्या कौशल्याच्या पार्श्वभागी असणारे शास्त्र व त्या कौशल्याचे समाजधारणेतील स्थान या गोष्टींचाही समावेश शिक्षणात व्हावा. उदा. कापसाची परीक्षा, त्यावर होणारा हवामानाचा परिणाम, यंत्रज्ञान, रंगपरीक्षा व तदंगभूत पदार्थ, विज्ञान, रसायन इ. शास्त्रांचे ज्ञान, तसेच विणकर व्यवसायाची परंपरा व त्या व्यवसायाची समाजासाठी उपयुक्तता यांचाही विणकराच्या प्रशिक्षणात समावेश व्हावा. अमेरिकन तत्त्वज्ञ व्हाइटहेड यांनी यासंबंधी असे नमूद केले आहे, की व्यवसायशिक्षणाचे स्वरूप व्यक्तीची सांस्कृतिक प्रगती करणारे असावे. व्यावसायिकाने व्यवसायाचे मर्म समजून त्यात रस घेऊन, कार्यक्षमतेने व स्वाभिमानाने आपला व्यवसाय करावा, असे व्यवसाय शिक्षणाचे स्वरूप असावे. (३) व्यवसायशिक्षणात तत्त्व व व्यवहार यांचा समन्वय असावा. त्या तत्त्वाचा व ज्ञानाचा उपयोग शिक्षकास वर्गात करता येणे आवश्यक असते. पुष्कळदा असा अनुभव येतो, की रेडिओ प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळविलेल्या इसमास घरचा रेडिओ दुरुस्त करता येत नाही. अशा प्रकारचे व्यवसायशिक्षण निकामी ठरते. म्हणून प्रगत राष्टांत व्यवसायशिक्षण व व्यवसायकेंद्रे यांची सांगड घालण्यात येते. (४) व्यवसायशिक्षणासाठी वापरावयाची यंत्रसामग्री अद्ययावत असावी. जुन्या यंत्रांवर प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नवीन यंत्रावर काम करणे कठीण जाते. काही कारखानदार स्वतःच प्रशाळा स्थापन करून त्यांद्वारे कामगारांना प्रशिक्षण देतात. (५) व्यवसायशिक्षण सामाजिक गरजांना अनुसरून असावे. आवश्यक कामगारांचा तुटवडा व प्रशिक्षितांची बेकारी हे दोन्ही अनर्थ टाळणे इष्ट आहे. म्हणून व्यवसायशिक्षणाची योजना करताना प्रारंभी प्रादेशिक पाहणी वा योग्य ते सर्वांगीण सर्वेक्षण करणे आवश्यक असते. तसेच संबंधित व्यवसायासंबंधी उपयुक्त आकडेवारी प्रारंभी गोळा करणे आवश्यक ठरते. व्यवसाय पुष्कळ असल्यामुळे प्रत्येक व्यवसायाबाबात अशी माहिती किंवा आकडेवारी गोळा करणे सुलभ होत नाही तथापि शासन, कारखानदार इत्यादींचे सहकार्य झाल्यास हे सहज साध्य करता येईल. शास्त्रीय पद्धतीने प्रत्येक व्यवसायातील उपलब्ध नोकऱ्यांची गणना करून त्यानुसार त्या त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणाची व सेवांची तरतूद करणे, हेच हिताचे ठरते. नवी दिल्लीस येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग या नावाची संस्था, भारताच्या भविष्यकाळातील प्रगतीचा अंदाज घेऊन ,कोणती कौशल्ये वा ज्ञान असणारे किती तंत्रज्ञ वा कामगार किती आणि केव्हा लागतील, याचा वेळोवेळी अंदाज जाहीर करते. नियोजन मंडळासही पंचवार्षिक योजनांचे आराखडे तयार करताना ही माहिती उपयुक्त ठरते.
प्रशिक्षणव्यवस्था
संपादनव्यवसायशिक्षण व सामान्य शिक्षण हे परस्परपूरक आहेत. पहिल्याचा हेतू उत्तम कामगार तयार करणे, तर दुसऱ्याचा हेतू उत्तम माणूस व नागरिक तयार करणे हा असतो. शिक्षणसोपानात सुरुवातीस सामान्य शिक्षण व नंतर व्यवसायशिक्षण हा क्रम असतो. बहुतेक सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये सामान्यपणे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत सामान्य शिक्षण देण्यात येते आणि नंतर अठराव्या वर्षांपर्यंत व्यवसायशिक्षण व साधारण शिक्षण असा संमिश्र अभ्यासक्रम असतो. जी मुले विद्यापीठशिक्षण वा उच्च व्यावसायिक शिक्षण घेण्यास अपात्र असतात, त्यांच्यासाठी निम्नस्तरीय व्यवसायशिक्षणाची व्यवस्था केलेली असते. काही व्यवसायांचा अभ्यासक्रम दोन वर्षांत संपतो व वयाची पंधरा वर्षे पूर्ण झालेली मुले व्यवसायांत पडतात. अशा मुलांसाठी अठरा वर्षे होईपर्यंत अल्पकालीन व्यवसायशिक्षणाची तरतूद केलेली असते. इतर व्यवसायांसाठी दोन वर्षांचा कनिष्ठ व नंतर तीन वर्षांचा वरिष्ठ अभ्यासक्रम असतो.
निम्नस्तरावरील व्यवसायशिक्षण देणाऱ्या संस्थांचे दोन वर्ग पडतात. पहिल्यात व्यवसायात असलेल्या उमेदवारांसाठी शिक्षण देणाऱ्या प्रशाळा मोडतात. यांचे काम साधारणत: सायंकाळी अथवा सप्ताहाच्या अखेर चालते. व्यवसायांत पडलेली मुले या संस्थांत एका आठवड्यात आठ ते दहा तास शिक्षण घेतात. दुसऱ्या वर्गात पूर्ण वेळ चालणाऱ्या प्रशाळा येतात. यांत शिकणाऱ्यांना व्यवसाय करता येत नाही. उच्च. स्तरावरील व्यवसायांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांत विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये, तसेच स्वतंत्रपणे ज्यांचा व्यवहार चालतो, अशी तांत्रिक महाविद्यालये आणि तत्सम प्रयोगशाळा यांचा समावेश होतो. निम्नस्तरावरील व्यवसायांच्या शिक्षणाची व्यवस्था कशा प्रकारची असते, याची नीट कल्पना यावी, म्हणून पुढे काही देशांतील व्यवसायशिक्षण व्यवस्थेची माहिती थोडक्यावत दिली आहे.
रशिया
संपादनरशियात सर्वसामान्य बुद्धीच्या मुलांसाठी व्यवसायशिक्षण देणाऱ्या संस्थांना ‘राखीव श्रमिक शाळा’ असे म्हणतात. यांत दोन प्रकारचे अभ्यासक्रम असतात. पहिला दोन वर्षांचा. यात खाणी, धातुकाम, वाहतूक, संदेशवहन व लोहमार्ग या व्यवसायांचे शिक्षण देतात. दुसरा सहा महिन्यांचा. यात कारखाने, खनिजतेल-उद्योग व बांधकाम इ. व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांस वसतिगृहांत राहावे लागते, त्यांना शुल्क पडत नाही व राहण्याजेवण्याची सोय शासकीय खर्चाने उपलब्ध होते. अधिक गुणवत्ता असलेल्या मुलांसाठी तेराव्या वर्षी सुरू होणारे ३, ४ वा ५ वर्षांचे अभ्यासक्रम असतात. यांत उद्योगधंदे, कृषी, व्यापार व शासन यांतील कनिष्ठ दर्जाचे प्रशासकीय काम तसेच विविध कला, शिल्प इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येते. परिचारिका, तसेच समाजकल्याण खात्यातील कामगार यांचेही शिक्षण याच संस्थांमधून होते. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मुलांपैकी पाच टक्के मुलांना गुणवत्तेप्रमाणे उच्च तर व्यवसाय-विद्यालयांत प्रवेश मिळतो. एका प्रशाळेत फक्त एकाच प्रकारचे शिक्षण देतात. शिक्षणात व्यवसायक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव अंतर्भूत असतो. दोन्ही प्रकारच्या संस्थांतील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर कमीतकमी चार वर्षे प्रशिक्षित उमेदवारास रोजगार करण्याचे बंधन असते. अलीकडे रशियात राजकीय बदल झाल्यापासून व्यवसायप्रशिक्षणात सरकारचे नियंत्रण कमी झाले आहे. मुले व त्यांचे पालक यांना स्वतःच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर्मनी
संपादनजर्मनीत- विशेषतः बर्लिन येथील-आठ वर्षांचा सक्तीचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पंधराव्या वर्षी व्यवसायांत पडणाऱ्या मुलांसाठी अल्पकाळ प्रशिक्षण देणाऱ्या व्यावसायिक शाळा असतात. यांत आठवड्यातून चार ते दहा तास शिक्षण देण्यात येते. शाळेत खर्च होणाऱ्या तासांचा पगार उमेदवारास मालकाकडून मिळतो. शिक्षणाच्या कालावधीपैकी अर्धा भाग सामान्य शिक्षणासाठी व अर्धा भाग व्यावसायिक शिक्षणासाठी खर्च होतो. पहिला अभ्यासक्रम तीन वर्षात पूर्ण होतो. त्यानंतर उमेदवाराची शिकण्याची इच्छा असेल, तर तो त्याच संस्थेत आणखी एक वर्षाचा वरचा अभ्यासक्रम पुरा करू शकतो अथवा दोन वर्षे प्रशिक्षण देण्याऱ्या पूर्ण वेळ प्रशाळेत प्रवेश मिळवू शकतो. पहिल्या तीन वर्षाँचा अभ्यासक्रम सर्व व्यवसायांतील उमेदवारांसाठी सक्तीचा असतो. यास आणखी एक पर्याय आहे. तो असा की, पाच वर्षाँचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून उमेदवार चार वर्षे शिक्षण देणाऱ्या तांत्रिक शाळेत जाऊ शकतो. अर्थात अशा शाळांतील प्रवेशासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता उमेदवाराच्या अंगी असणे आवश्यक असते. अभ्यासक्रम पूर्ण करून उमेदवार व्यवसायात पडतो. असा व्यवसाय करीत असताना वर वर्णिलेला अल्पकालीन अभ्यासक्रम उमेदवार चालू ठेवतो. नंतर त्यास पूर्ण वेळ प्रशाळेत अथवा त्याची गुणवत्ता असल्यास विद्यापीठाशी संलग्न असलेल्या तांत्रिक महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकतो.
जपान
संपादनजपानमध्ये वयाची १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत शिक्षण सक्तीचे असते. पहिल्या सहा वर्षांचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तीन वर्षाचा उच्च माध्यमिक अभ्यासक्रम असतो. यात मच्छीमारी, कृषी, गृहविज्ञान व कारखान्यांतील काम या विषयांतील मुलांची गुणवत्ता व अभिवृत्ती यांचे संशोधन करणारे अभ्यासक्रम असतात. त्यांना सप्ताहात आठ तासांचा वेळ देतात. शेकडा पन्नास मुले नंतर माध्यमिक शाळांत जातात. येथे व्यवसायांचे विशिष्ट शिक्षण देणारे अभ्यासक्रम असतात. उर्वरित पन्नास टक्के मुले व्यवसायांत पडतात. त्या मुलांसाठी अल्पकाळ व्यवसायशिक्षण देणाऱ्या शाळा व तांत्रिक शाळा असतात. वरील तीन देशांतील व्यवसायशिक्षणाच्या तरतुदींचे वैशिष्ट्य असे की, १५ ते १८ वर्षे वयाच्या सर्व मुलांना व्यवसायशिक्षणाची सक्ती केलेली आहे. सर्व व्यवसायांतील कामगार प्रशिक्षित व कार्यक्षम असावेत, ही कल्पना या सक्तीच्या मुळाशी आहेया तिन्ही देशांनी कारखानदारीत व एकंदर उत्पादनक्षमतेत मिळविलेल्या अपूर्व यशाचे बीजही या सक्तीतच आढळते.
भारत
संपादनस्वातंत्र्यपूर्व काळात भारतात कारकुनी विद्येचेच शिक्षण प्रामुख्याने दिले जाई. देशातील कारखाने, उद्योगधंदे, व्यापार-उदीम यांचा प्रसार होऊन उत्पादनक्षमता वाढावी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षणाची तरतूद व्हावी, ही आकांक्षा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रबळ झाली. त्यानंतर अल्पकाळात व्यवसायशिक्षणाची वाढ झाली. स्थापत्य, शिल्प, वैद्यक, संशोधन, प्रशासन, व्यवस्थापन, सैनिक शिक्षण, वैमानिक इ. विषयांतील व्यवसायशिक्षणाची सोय होऊन माध्यमिक शिक्षणपातळीवर जिल्हानिहाय तांत्रिक विद्यालये स्थापन करण्यात आली. तथापि ग्रामीण भागात व्यवसायांचे शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमीच आढळतात.
भारतात चार स्तरांवर व्यवसायशिक्षण देण्याची सोय आहे. अभियांत्रिकी, वैद्यक अथवा तत्सम विषयांतील पदवी, पदव्युत्तर शिक्षण, एम्.फिल. व पीएच्.डी. हा सर्वाँत वरिष्ठ स्तर होय. या अभ्यासक्रमांना विद्यापीठांची मान्यता असते. त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमांवर अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) किंवा अखिल भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद (ऑल इंडिया कौन्सिल फॉर मेडिकल एज्युकेशन) यांसारख्या संस्थांचे नियंत्रण असते. राज्य सरकारांनी नियंत्रित केलेले, पण अखिल भारतीय सूत्रांना धरून आखलेले पदविका-शिक्षण हा दुसरा स्तर होय. अभियांत्रिकी, शेतकी, वाणिज्य यांसह अनेक विद्याशाखांमध्ये पदविका अभ्यासक्रम असतात. राज्य सरकारांनी पुरस्कृत केलेले वा मान्यता दिलेले विविध कालावधीँचे तसेच प्रमाणपत्रांचे अभ्यासक्रम हा तिसरा स्तर होय. माध्यमिक आणि उच्चि माध्यमिक परीक्षांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले व्यावसायिक विषय हा या शिक्षणाचा चौथा स्तर होय. याशिवाय शासकीय विभाग, तसेच अनेक स्वयंसेवी संस्था अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबवीत असतात. त्यातून शासनमान्य पदवी-पदविका-प्रशस्तिपत्रक दिले जात नाही. मात्र निश्चित उद्दिष्ट मनात ठेवून अमलात आणलेल्या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्याला हजेरीचे प्रमाणपत्र संस्थेकडून मिळते.
व्यवसायशिक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य समजले जाते. वर नमूद केलेल्या सर्व स्तरांवरील व्यवसायशिक्षण महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहे. मार्च १९९९ अखेर महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती पुढीलप्रमाणे होती. राज्यात ४२ विधी महाविद्यालये होती. त्यांत २४,५२९ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांपैकी ७,२७२ विद्यार्थिनी होत्या. प्राध्यापकांची संख्या ७०१ होती. त्यांपैकी १५४ प्राध्यापिका होत्या. याच वर्षी राज्यातील १४४ अध्यापक महाविद्यालयांत १५,२८१ विद्यार्थी (पैकी ६,७८३ विद्यार्थिनी), १,३२५ प्राध्यापक (पैकी ६४२ प्राध्यापिका) होते. शारीरिक शिक्षण महाविद्यालये एकूण १०३ होती. त्यांत १८,२७९ विद्यार्थी (२,६०३ विद्यार्थिनी) होते. प्राध्यापकांची संख्या ८६९ (त्यांतील १११ प्राध्यापिका) होती. शेतकी विषयाची १५ महाविद्यालये, विद्यार्थी ६,३३० (६५२ विद्यार्थिनी), ९१८ प्राध्यापक (२० प्राध्यापिका) पशुवैद्यकशास्त्राची ५ महाविद्यालये, विद्यार्थी १,२१३ (१३५ विद्यार्थिनी), १८६ प्राध्यापक (९ प्राध्यापिका) व्यवस्थापनशास्त्राच्या ५५ संस्था, ९,७०२ विद्यार्थी (२,१३८ विद्यार्थिनी), ५५४ प्राध्यापक (९३ प्राध्यापिका) ग्रंथपालनशास्त्राच्या ६ संस्थांमधे ४३३ विद्यार्थी (१७९ विद्यार्थिनी), ३४ प्राध्यापक (१४ प्राध्यापिका) मत्स्यव्यवसायाच्या एका संस्थेत १३९ विद्यार्थी (१४ विद्यार्थिनी), २२ प्राध्यापक (१ प्राध्यापिका) तर वैद्यकशास्त्रातील सर्व शाखांच्या एकूण ११६ संस्था होत्या. त्यांत ३३,५१० विद्यार्थी (१५,८९५ विद्यार्थिनी) व ६,४२२ प्राध्यापक (२,३४७ प्राध्यापिका) होते. ललितकला, श्रमविज्ञान इ. विषयांच्या ५४ संस्था असून ६,०४१ विद्यार्थी (३,५३४ विद्यार्थिनी) व ८२० प्राध्यापक (३७६ प्राध्यापिका) डी.एड्. पदविका शिक्षण देणारी २७५ विद्यालये असून त्यांत २८,५४८ विद्यार्थी (१५,३९३ विद्यार्थिनी) होते. प्राध्यापकांची संख्या २,३१२ असून त्यातील ८३५ प्राध्यापिका होत्या.
संदर्भ
संपादन1. Badger, A. R. Man in Employment, London, 1966.
2. Chandrakant, L. S. Technical Education in India Today, New Delhi, 1963.
3. Clark, Harold F. Sloan, Harold S. Classrooms in the Factories, New York, 1960.
4. Liepmann, Kate, Apprenticeship, London, 1960.
5. Roberts Roy W. Vocational and Practical Arts Education, New York, 1971.
6. Robinson, E. A. G. The Structure of Competitive Industry, Cambridge, 1959.
७. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय, शिक्षणावरील दृष्टिक्षेप : १९९८-९९, पुणे २०००