संगीत वीर विडंबन हे न.चिं केळकरांनी लिहिलेले एक नाटक आहे. हे नाटक बलवंत संगीत मंडळीने रंगमंचावर आणले. नाटकाच्या प्रयोगाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १८-१-१९१९ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला.

शापित अर्जुनाचा अज्ञातवास या विषयावर हे नाटक आहे. उत्तरेच्या गायनशाळेत नृत्य शिकवणारी बृहन्नडा (स्त्रीवेषातील अर्जुन) आपल्या अज्ञातवासाची मुदत संपताच आपले गांडीव धनुष्य घेऊन रणांगणावर आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होतो. या कथेवर हास्यरसाला प्राधान्य देत हे तीन-अंकी बहुप्रवेशी नाटक आहे. नाटकातील खटकेबाज संवादांमुळे इ.स. १९१४ ते १८ या काळात झालेल्या पहिल्या महायुद्धातील अनेक गोष्टींची आठवण करून देणारे हे पौराणिक नाटक आहे. तसल्या अनेक संवादांना प्रेक्षकांच्या ठमखास टाळ्या पडत असत.

आपल्या नृत्य-गायनाने व नटखट अभिनयाने नाटकभर संचार करणाऱ्या उत्तरेचे काम मास्टर दीनानाथांनी केले होते. या नाटकातील अन्य भूमिका आणि त्या करणारे नट असे :-
अर्जुन (बृहन्‍नडा)-जोशी, उत्तर-दिनकर ढेरे, द्रौपदी (सैरंध्री)-कृष्णराव कोल्हापुरे, भीम (बल्लव)-चिंतामणराव कोल्हटकर, शकुनी-भावे, सुदेष्णा-शंकरराव मोहिते, वगैरे.

या नाटकात ‘उरला थोडा सूड’, ‘का न दिधले मरण राया’, काय देवा अजुनी येत येत तुजला’, ‘चल जाऊ भाऊराया’, ‘जरी पांडव मजला’, ‘पहा पहा काय सुंदर’, ‘भगिनी तुझीच’ ‘मिरवित नेऊ चला’ अशी अनेक पदे होती.