वीणा चिटको (१४ ऑगस्ट, इ.स. १९३५ - १९ सप्टेंबर, इ.स. २०१५) या मास्तर कृष्णराव यांच्या कन्या असून स्वतः लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक होत्या.[ संदर्भ हवा ]

नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणारे संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांची कन्या म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना लहानपणी गायला मिळत असे. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेल्या बुद्धवंदना मधील कोरसमध्येदेखील त्या गायल्या आहेत. त्या मैफलीत वडील मास्टर कृष्णरावांना तंबोऱ्यावर स्वरसाथसुद्धा करायच्या.[ संदर्भ हवा ]

केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी भारतीय संगीताचे कार्यक्रम सादर केले आहेत. पं. निखिल बॅनर्जी यांच्याकडून त्यांनी सतार वादनाचे प्रशिक्षण घेतले होते. अल्पावधीतच त्यांनी सतार या वाद्यावर प्रभुत्व मिळवून सतार वादनाचे काही काळ जाहीर कार्यक्रम केले;शिवाय सतारीचे शिक्षण देखील दिले. तसेच त्या संवादिनी हे वाद्यदेखील उत्तम वाजवत असत. दूरदर्शनवर अनेकदा त्यांनी 'सुंदर माझं घर' या कार्यक्रमात संवादिनी वाजवत स्वतः चाल दिलेल्या लोकगीतांचे, सुगम व भावगीतांचे गायन सादर केलेले आहे.[ संदर्भ हवा ] त्यांना उपजतच स्वरज्ञान होते आणि गाणं ऐकता ऐकता झटपट त्या गाण्याचे नोटेशन करण्याची कला त्यांना अवगत होती. त्या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या. एचएमव्हीच्या त्या भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री-संगीतकार होत्या म्हणून एचएमव्हीने त्यांचा जाहीर सन्मान केला होता.[ संदर्भ हवा ] तसेच त्या काही मराठी भावगीतांच्या गीतकारसुद्धा होत्या. पं. रामदास कामत, ज्योत्स्नाबाई भोळे, उत्तरा केळकर अशा दिग्गज गायकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले आहे.[ संदर्भ हवा ]

वीणा चिटको यांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रभा फुलंब्रीकर असे होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण पुणे येथील भावे स्कुलमध्ये झाले, तर पुणे भारत गायन समाज येथून त्यांनी 'संगीत विशारद' ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत - गायन विभागातील पदवी संपादन केली.[ संदर्भ हवा ] त्यांचा विवाह रामचंद्र चिटको या मूळ नाशिक येथील दंतवैद्यकांच्या कुटुंबातील अभियंता युवकाशी झाल्यानंतर त्यांचे नामकरण वीणा चिटको असे झाले. श्रीयुत रामचंद्र चिटको यांनी मुंबईतील व्ही.जे.टी.आय. मधून अभियांत्रिकी प्रशिक्षण घेतले होते. विवाहानंतर वीणा चिटको यांचा संगीतकार म्हणून प्रवास घडला. त्यांच्या सुरेल प्रवासात त्यांना पतीने नोकरी व घरची जबाबदारी सांभाळून उत्तम साथ दिली.[ संदर्भ हवा ]

वीणा चिटको यांचे अनेक मासिके व वृत्तपत्रे यांमध्ये ललित लेख आणि मास्टर कृष्णराव यांच्यावरील स्मृती लेख प्रसिद्ध झालेले आहेत. मास्टर कृष्णराव यांच्या समृद्ध व व्यापक संगीताविषयी त्या सप्रयोग व्याख्यान द्यायच्या. मास्टर कृष्णरावांचे प्रेरणादायी सांगीतिक योगदान नीट समजून येण्यासाठी श्रीमती चिटको यांचे लेख, सप्रयोग व्याख्याने व आकाशवाणीवरील मुलाखती या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.[ संदर्भ हवा ]

वीणा चिटको यांनी रचलेली गीते[ संदर्भ हवा ]

संपादन
  • अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला, मयुरा रे फुलवित ये रे पिसारा (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत)
  • मन माझे भुलले (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत)
  • सखी सांज उगवली (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत)
  • सांग प्रिये सांग प्रिये (संगीत वीणा चिटको; गायक रामदास कामत; राग पूरिया धनाश्री)

वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली गाणी[ संदर्भ हवा ]

संपादन