सरोज खान (२२ नोव्हेंबर, १९४८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ३ जुलै, २०२०) या हिंदी चित्रपटसृष्टीतली नृत्य दिग्दर्शिका होत्या. खान यांनी दिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्यदिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले होते.

सरोज खान

वयाच्या तिसऱ्या वर्षी खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी पार्श्वभूमितील नर्तिका म्हणून काम केले. खान यांनी सन १९७४मध्ये त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून गीता मेरा नाम या चित्रपटासाठी काम केले होते.

खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुमारे पाच दशके नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. श्रीदेवीपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींना त्यांनी दिग्दर्शन केले. श्रीदेवीचे ‘‘हवा हवाई…‘’ आणि माधुरी दीक्षितचे ‘‘धक धक करने लगा…‘’ या गाण्यातील नृत्यांना खान यांचे दिग्दर्शन होते. ही गाणी आणि त्या गाण्यांतील नृत्ये आजही लोकप्रिय आहेत.

खान यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे २०००हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षितच्या कलंक चित्रपटातील ‘‘तबाह हो गये…’‘ या गाण्याचे केलेले नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांचे अखेरचे होते. खान यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत मिस्टर इंडिया (१९८७) चित्रपटातील ‘‘हवा हवाई…’‘, तेजाब चित्रपटातील (१९८८) ‘‘एक दो तीन…’‘, बेटा चित्रपटातील (१९९२) ‘‘धक धक करने लगा…‘’ आणि देवदास चित्रपटातील (२००२) चित्रपटातील ‘‘डोला रे डोला’‘ आदींचा समावेश होतो.