भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात.जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात.

वाऱ्यामुळे ढग वाहून नेण्यास, पाऊस पडण्यास, वस्तू वाळण्यास मदत होते. तसेच वादळे, चक्रीवादळे होतात. वाऱ्यावर पवनचक्की चालते.

वाऱ्याचे कार्य संपादन

वाऱ्यामुळे होणारी झीज किंवा भर विशेषतः कोरड्या हवेच्या प्रदेशांत (मरुप्रदेशांत) दिसून येते. वाऱ्याच्या माऱ्याने खडकांचे ढिले झालेले कण किंवा कपचे सुटून पडण्यास मदत होते; परंतु वाऱ्याचे कार्य मुख्यतः त्याच्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूच्या माऱ्याने दिसून येते. वाळूच्या घर्षणाने खडक झिजतात आणि त्यांचे तुकडे तुकडे व शेवटी बारीक वाळू बनते. वाळू आणि वारा यांच्या संयुक्त माऱ्यामुळे रुक्ष प्रदेशातील खडकांची झीज होऊन त्यांस चित्रविचित्र आकार प्राप्त होतात. कधी कधी वाऱ्याच्या मार्गात उभ्या असलेल्या खडकाचा मधलाच भाग जास्त झिजून छत्री खडक तयार होतो. वाऱ्यामुळे वाळू दुसरीकडे वाहून नेली जाऊन तिची भर पडते आणि वालुकागिरी निर्माण होतात. काही वालुकागिरी स्थिर असतात, तर बहुतेक अस्थिर असतात; कारण त्यांच्या वाताभिमुख सौम्य येथे आकृती आहे. उतारांवरून वाऱ्याने वाहून येणारी वाळू त्यांच्या तीव्र, वातपराङ्‌मुख उतारावरून पलीकडे पडत राहते आणि सबंध वालुकागिरीच पुढे सरकल्यासारखा वाटतो. चंद्रकोरीच्या आकाराचे बारखान वालुकागिरीही वाऱ्यामुळेच निर्माण होतात. वाऱ्यामुळे एका ठिकाणची माती दुसरीकडे वाहून नेली जाते आणि तेथे तिची भर पडते. हे ‘लोएस’ मातीचे थर होत.