यु.एस.एस. हॉर्नेट (सीव्ही-८)

अमेरिकेची एक विमानवाहू नौका

यु.एस.एस. हॉर्नेट (सीव्ही-८) ही अमेरिकेची दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेली विमानवाहू नौका होती. यॉर्कटाउन प्रकारची ही विमानवाहू नौका हॉर्नेट हे नाव असलेली सातवी नौका होती. दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागरातातील रणांगणात लढत असलेल्या या नौकेवरून जपानवर डूलिटल झडप घालण्यात आली होती. याशिवाय तिने मिडवेच्या लढाईत, सॉलोमन द्वीपांच्या लढाईत तसेच ग्वादालकॅनालच्या लढाईत आणि बुइन-फैसी-तोनोलैवरील झडपेत भाग घेतला. सांता क्रुझ द्वीपांच्या लढाईत जपानी आरमाराने हीचे अतोनात नुकसान केले व त्यात ही विवानौका बुडाली. हॉर्नेट सेवेत रुजू झाल्यापासून एक वर्ष आणि सहा दिवसांनी बुडाली. शत्रूने बुडवलेली ही अमेरिकेची शेवटची विवानौका आहे. अनेक लढायांमध्ये मोठी कामगिरी बजावल्याबद्दल या नौकेला चार सेवाचांदण्या, डूलिटल झडपेबद्दल प्रशस्तिपत्र देण्यात आले. याशिवाय मिडवेच्या लढाईत दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल या नौकेवरील आठव्या टॉरपेडो स्क्वॉड्रनला राष्ट्राध्यक्षांचे विशेष प्रशस्तिपत्र देण्यात आले.