बृहस्पती

हिंदू देवता

बृहस्पती हा हिंदू धर्मात देवांचा गुरू मानला जातो. गुरू नावाच्या ग्रहाचे पंचांगातले नाव बृहस्पती आहे आणि गुरुवारचे बृहस्पतिवार.

मानवी संस्कृतीमध्ये गुरू संपादन

गुरू ग्रह प्राचीन काळापासून मानवाला ज्ञात आहे. रात्री हा ग्रह दुर्बिणीविना दिसू शकतो तर काही वेळा सूर्य अंधुक असला तर दिवसासुद्धा दिसतो.[१] बाबिलोनियन संस्कृतीमध्ये गुरू हा त्यांचा देव मार्दुक याचे प्रतीक मानला जात असे. तसेच गुरूच्या जवळपास १२ वर्षाच्या परिभ्रमणवलन काळाचा उपयोग त्यांच्या राशींशी निगडित नक्षत्रे ठरविण्यासाठी केला जात असे.[२] [३]

रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. गुरूचे खगोलशास्त्रीय चिन्ह ♃, ज्युपिटरच्या हातातील वज्रास्त्र (विजेसारखे दिसणारे अस्त्र, भारतीय संस्कृतीमध्ये इंद्राजवळ वज्रास्त्र होते.) दर्शविते. ग्रीक देवता झ्यूससुद्धा गुरूशी संबंधित आहे. गुरूसाठी वापरण्यात येणारे झिनो हे विशेषण झ्यूसवरून आले आहे.[४]

जोवियन हे विशेषणसुद्धा गुरूला लावण्यात येते. भारतीय तसेच पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला प्रमुख स्थान आहे, आनंदी, सुखी असे गुरूचे गुणधर्म ज्योतिषात सांगितले जातात. इंग्रजीमधील जोवियल (jovial) हे आनंदी या अर्थाने वापरण्यात येणारे विशेषण यावरूनच आले आहे.[५] हिंदू ज्योतिषामध्ये गुरूला बृहस्पती म्हटले जाते. बृहस्पती हा देवांचा शिक्षक होता. त्यावरून या ग्रहाचे नाव गुरू ठेवण्यात आले आहे. गुरूचा दुसरा अर्थ 'जड, वजनदार' असा होतो.[६]

चिनी, जपानी, कोरियन व व्हियेतनामी संस्कृतीमध्ये गुरूला लाकडांचा तारा (wood star) म्हटले जाते.[७] हा शब्द चिनी संस्कृतीतील पाच मूलतत्त्वांशी संबंधित आहे. ग्रीक त्याला फेथॉन म्हणत, ज्याचा अर्थ 'दीप्तीमान' (blazing) असा होतो. इंग्रजीतील 'थर्स डे' (Thursday) हे नाव जर्मॅनिक दंतकथेतील थोरवरून आले आहे. ही कथा गुरूशी संबंधित आहे.[८] पहा :- चांदण्यांची नावे



पहा :- चांदण्यांची नावे; गुरू ग्रह