बारामोटेची विहीर

ऐतिहासिक वास्तू

बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात.

Baramotechi vihir

स्थळ संपादन

राष्ट्रीय महामार्ग क्र.४ ने सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण १२ कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर ३ कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला २ कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे. पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो, तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो. त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते.

स्थापना संपादन

अशा ह्या सुंदर बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता, सुमारे इसवी सन 1719 ते 1724 ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे ३०० झाडांची आमराई होती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली. [१]

स्थापत्य संपादन

विहिरीचा व्यास ५० फूट आणि खोली ११० फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे मोडी लिपीतील एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर १५ थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की १२ मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.

प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहीरी साठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे. तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्या साठी छुप्या भुयारी वाटा आहेत. महालात गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात. (भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडून च होत असल्याने या दिशेचा संदर्भ इथे महत्त्वाचा ठरतो)

विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादाक्रांत केल्याची प्रतीकात्मकता त्यात दिसून येते. उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रुपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष्य प्रतिबिंबित होते. (याची प्रचिती अटकेपार झेंडा रोवून मराठ्यांनी जगाला दिलीच) वाघाचा चेहरा आणि सिंहाच्या शरीराचे शिल्प शौर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अशीच महालातील प्रत्येक शिल्पाची आणि दगडी खांबावरील कोरीव कामाची योजना गूढ आणि प्रतीकात्मक आहे.

ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्रचे उत्तम उदाहरण आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-10-27. 2019-02-14 रोजी पाहिले.