फेर्दिना द सोस्यूर (१८५७ - १९१३) हा स्वीडिश भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा ‘Course in General Linguistics’ हा ग्रंथ १९१९ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध केला. या ग्रंथातील त्याचे विचार म्हणजे मुळात त्याची विविध व्याख्याने होत. पण त्या व्याख्यानातील सोस्यूरचे संशोधन अत्यंत मुलभूत व मौलिक आहे. त्यामुळे हा आधुनिक भाषाविज्ञानातील मूलभूत ग्रंथ मानला जातो. त्यामुळे सोस्युरला आधुनिक भाषाविज्ञानाचा जनक मानले जाते.

सोस्यूरचे योगदान संपादन

सोस्यूरच्या आधी भाषेचा अभ्यास ऐतिहासिक म्हणजे कालक्रमिक पद्धतीनेच होत असे. त्याने, प्रथम ऐतिहासिक आणि वर्णनात्मक म्हणजे एककालिक भाषाभ्यास पद्धतीतील फरक स्पष्ट केला. तसेच त्याच्या आधीच्या ग्रीम या अभ्यासकाच्या ऐतिहासिक पद्धतीवर आक्षेप घेऊन वर्णनात्मक पद्धतीचा पुरस्कार केला आणि आपले म्हणणे मांडले. 

१.  ऐतिहासिक भाषा अभ्यासपद्धती भाषेच्या विकासाचे निश्चित नियम ठरवते. प्रत्यक्ष भाषेचा अभ्यास करत नाही. म्हणून दोन कालखंडातील भाषेचा वर्णनात्मक अभ्यास केल्यास भाषिक परिवर्तनाचे नियम निश्चित करता येतात, भाषेच्या स्वरूपाचा नाही हे त्याने सिद्ध केले; आणि दोन कालखंडातील प्रत्यक्ष बोलली जाणारी भाषा अभ्यासासाठी महत्त्वाची मानली. 

२. संवाद हाच भाषेचा प्रधान हेतू असतो. त्यामुळे समाजव्यवहारामधील प्रत्यक्ष वापरणारी भाषाच भाषाविज्ञान अभ्यासासाठी महत्त्वाची आहे. ग्रंथातील लिखित भाषा नाही. पूर्वीचे भाषावैज्ञानिक भाषेला साधन म्हणून पाहायचे आज भाषेला माध्यम म्हणून पाहतात. भाषेला साध्यात्मक व वस्तुनिष्ठ मानतात. हा दृष्टीकोन सोस्यूरनेच दिला आहे.[१]

३.    पारंपारिक अभ्यासपद्धती ऐतिहासिक होती. या अभ्यासासाठी ग्रंथातील व अभिजनांचीच भाषा वापरली जायची. अभिजनच लिहित असल्यामुळे तीच ग्रंथातील भाषा अभ्यासली जायची. त्यामुळे भाषेत शुद्ध- अशुद्ध, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद मानले जायचे. सोस्यूरच्या नव्या मांडणीमुळे भाषेचे लिखित प्रमाणरूप नाकारून प्रचलित मौखिक रूपाचा वर्णनात्मक आणि संरचनात्मक अभ्यास सुरू झाला.   

सोस्यूरचा भाषा विचार संपादन

१.      सोस्यूरने भाषाविषयक एक भूमिका मांडली. त्याच्या मते, भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे. तो चिन्ह (Sign) व्यवस्थेनुसार भाषेचे विश्लेषण करतो.[२]

२.      तो म्हणतो, “ भाषेत प्रत्यक्ष ध्वनी (ध्वनिरूप चिन्हक-signifier) असतो आणि त्या ध्वनीला प्राप्त होणारा अर्थ (अर्थरूप चिन्हित -signified ) असतो. त्यामुळे, भाषा म्हणजे ध्वनी आणि त्याचा अर्थ यांची सांगड घालणारी चिन्ह व्यवस्था होय.

३.      भाषा यांत्रिक नसून ती गुंतागुंतीची आणि व्यामिश्र आहे. मर्यादित ध्वनीतून (स्वनिम) अमर्यादित अर्थपूर्ण संदेशवाहक रूपे (भाषिक रूपे) भाषेत तयार केली जातात. या रूपातूनच (linuistic forms) मधूनच विविध वाक्यरचना तयार केल्या जातात.

४.      या वाक्यात कर्ता, कर्म. क्रियापद असे अनेक भाषिक घटक असतात. या घटकातील विशिष्ट व आवश्यक ती रूपे निवडून तो तो भाषिक आपला व्यवहार (अन्वय - संबंध ) साध्य करीत असतो.

भाषिक घटकांचे वर्गीकरण संपादन

सोस्यूर भाषेतील घटकांचे दोन गटात वर्गीकरण करतो.

१.      अन्वयनिष्ठ – syntagmatic

२.      गणनिष्ठ – Paradigmatic

       उदा. १. आई गावाला गेली. २. बाबा बाहेरून आले. ३ नीता हुशार आहे.

या तिन्ही वाक्यात कर्ता (आई, बाबा, नीता), कर्म (गावाला, बाहेरून, हुशार) आणि क्रियापद (गेली, आले, आहे) आहेत. त्यांचे अनुक्रमे कर्त्याचा एक, कर्माचा दोन आणि क्रियापदाचा तीन असे तीन गट आपण करू शकतो. या गटांनाच सोस्यूर गणनिष्ठ गट म्हणतो.

   या वाक्यात आईचा अन्वय गावी जाण्याशी व गावी जाण्याचा अन्वय म्हणजे संबंध आईशी आहे. या प्रमाणेच, बाबांचा बाहेरून येण्याशी आणि नीताचा हुशार असण्याशी व या उलट सुद्धा परस्परांशी अन्वय (संबंध) आहे. म्हणजे असा अन्वय साधूनच भाषेत अर्थव्यवहार होतो.

प्रत्येक भाषेनुसार हा अन्वय बदलतो, म्हणजे पृष्ठस्तरीय रचना बदलत असते. यालाच सोस्यूर  अन्वयनिष्ठ घटक म्हणतो.

भाषा : ध्वनि व अर्थाची चिन्हव्यवस्था संपादन

 सोस्यूरच्या मते, भाषेचे ध्वनी (चिन्हक) आणि तिचे अर्थरूप (चिन्हित) यांच्यातील संबंध यादृच्छिक असून ते सामाजिक परंपरेत योगायोगाने प्राप्त झालेले असतात. म्हणून या संकेतात निश्चित अर्थ नसतात त्यामुळे तो अर्थ विचाराकडे दुर्लक्ष करतो. अशा ध्वनी आणि अर्थ यांच्यात संबंध प्राप्त करून देणाऱ्या चिन्ह व्यवस्थेला तो भाषा म्हणतो.

भाषा ही समकालीन जीवनाचा भाग आहे, ती ऐतिहासिक किंवा कालक्रमिक विकासाची प्रक्रिया नव्हे.

भाषेचा अभ्यास म्हणजे प्रत्यक्ष बोलण्याचा भाषेचा अभ्यास, लिखित भाषेचा नव्हे.

सोस्यूरने भाषा (lang-लांग)  आणि भाषण (parol-परोल) असा भेद केला आणि भाषेचा अभ्यास म्हणजे लांगचा अभ्यास होय.

भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ व्याकरणाचा किंवा सुट्या स्वनिमिक गुणधर्माचा अभ्यास नसून तो अंतर्गत संरचनेचा अभ्यास असावा असे त्याचे म्हणणे होते.

सोस्यूरचे टीकाकार संपादन

सोस्यूरचा भाषेकडे पाहण्याच्या या दृष्टीकोनामुळे भाषेकडे पाहण्याची पारंपरिक दृष्टी बदलली. त्यातून पुढे भाषाविज्ञानाच्या अनेक शाखा उदयास आल्या. सोस्यूरच्या या सिद्धांतानुसार पुढे वर्तनवाद्यांनी भाषाविज्ञानाची नवी मांडणी केली. त्याचा पाया घालणारा वॅटसन याने मात्र सोस्यूरची ध्वनी आणि अर्थ यातील संबंधांची प्रक्रिया नाकारली आहे. मात्र त्यामुळे भाषाविज्ञानातील सोस्यूरच्या भाषाविचाराचे महत्त्व जरा देखील कमी होत नाही. उलट भाषेचा वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय अभ्यासाला त्याच्या विचारामुळेच सुरुवात झाली हे त्याचे मोठे योगदान होय.

संदर्भ संपादन

भाषाविज्ञान, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक, कल्याण काळे-हे. वि. इनामदार,

  1. ^ आधुनिक भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि  ऐतिहासिक, मिलिंद स मालशे, लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई
  2. ^             मराठीचे वर्णनात्म्क भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे