प्रेशर कुकर हे एक अन्न शिजवण्याचे आधुनिक साधन आहे.

कार्यतत्त्व संपादन

इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरचे कार्यतत्त्व 'दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे' हे आहे.

जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.

प्रेशर कुकर हे एक ॲल्युमिनियमचे भांडे असते. कुकरच्या भांड्यात तळाशी थोडे पाणी राखतात. पाण्यावरच्या तबकडीवर शिजवायच्या अन्नाची भांडी ठेवतात. कुकरचे झाकण रबरी गॅस्केट लावून कुकरला हवाबंद करते. भांड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रावर एक छोटी पण जड शिट्टी ठेवलेली असते. कुकरच्या तळाच्या पाण्याची वाफ झाली की ती शिट्टी वर उडवून भोकातून बाहेर पडायचा प्रयत्‍न करते, आणि असे करताना आवाज करते.

फायदे संपादन

प्रेशर कुकरचे फायदे:-

१. वेळ कमी लागतो.

२. इंधनाची बचत होते.

३. तापमानाचे समान वितरण झाल्याने अन्न एकसारखे शिजते.

४. तापमान अधिक असल्याने किटाणू नष्ट होतात.

योग्य वापर संपादन

प्रेशर कुकरचा वापर-

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजताना त्यातील तळाला ठेवलेल्या पाण्याची वाफ कुकरच्या बाहेर न गेल्यामुळे आतील अन्‍नावर वाफेचा दाब पडतो. त्यामुळे कुकरमधील उष्णता वाढून अन्न जलद शिजते. कुकरची शिट्टी वर उडते आणि तिच्या खालच्या फटीमधून हिस्स आवाज येतो. असे झाले की योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या तापमानाची वाफ तयार झाली आहे असा इशारा मिळतो. शिट्टी वाजल्यानंतर कुकरच्या खाली लावलेली आच कमी करतात, आणि मग आतील अन्नाच्या प्रकाराप्रमाणे १ ते ४ मिनिटे तशीच ठेवून नंतर बंद करतात. मंद आचेवर कुकर असून शिवाय वाफेचा दाब ही १ ते ४ मिनिटे कायम राहिल्याने इंधनाची बचत होते. शिट्टीचा उपयोग फक्त वाफ तयार झाल्याचा संकेत देण्यासाठी असतो. आच बंद केल्यानंतर वाफेचे बाहेर पडणे चालू राहते. ते पूर्णपणे थांबल्यावरच कुकरचे झाकण उघडतात. आधीच उघडले तर कोंडलेली वाफ बाहेर पडून अपघात होऊ शकतो.

कुकर आचेवर बराच वेळ ठेवूनही शि्ट्टी वाजली नाही तर (१) कुकरमध्ये तळाशी पाणी ठेवलेले नाही किंवा (२) शि्ट्टीच्या खालचे वाफेला बाहेर पडण्यासाठीचे छिद्र बुजले आहे असे समजतात.