चित्रबलाक

करकोचा जातीचा पक्षी

चित्रबलाक किंवा चाम ढोक हा करकोचा जातीचा पक्षी असून पाणथळ जागी याचा अधिवास असतो.

चित्रबलाक
शास्त्रीय नाव
(Mycteria leucocephala)
कुळ बलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश पेंटेड स्टॉर्क
(Painted Stork)
संस्कृत काचाक्ष, पिंगलाक्ष
हिंदी कठसारंग, जंघिल

वर्णन संपादन

सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते.

चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.

आढळस्थान संपादन

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.

अधिवास आणि खाद्य संपादन

दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो.

विणीचा हंगाम संपादन

चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर बगळे आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते. मादी चित्रबलाक फिकट पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ५ अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात.

पूर्व विदर्भात स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात.

चित्रदालन संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
 
विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) वर या संदर्भात अधिक माहिती आहे: