भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमानआकारमान यांचे गुणोत्तर होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते.

वेगवेगळ्या घनतेचे द्रव पदार्थ भरलेली परीक्षा नळी

दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत चुरमुरे भरले व दुसऱ्या डब्यात काठापर्यंत तांदूळ भरले. तांदुळाने भरलेला डबा जड लागतो पण चुरमुऱ्यांनी भरलेला डबा मात्र तुलनेने हलका लागतो. दोन्ही डबे सारख्याच आकाराचे, चुरमुरे तांदळाचेच बनलेले असतात. मग एक डबा हलका व दुसरा जड, असे होण्याचे कारण घनता. चुरमुरे करतांना तांदूळाचा प्रत्येक दाणा फुगतो. म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान वाढल्याने एक डबाभर तांदळाचे सर्व चुरमुरे त्याच डब्यात भरले तर ते त्या डब्यात मावत नाहीत. काही बाहेर राहतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम व आकारमानाचे एकक घन सेंटीमीटर म्हणून ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर हे घनतेचे एकक आहे.

वरील उदाहरणात तांदळाच्या एका दाण्याचे वस्तुमान व त्याचे आकारमान यांचे गुणोत्तर (भागाकार) घेतल्यास काहीतरी संख्या मिळेल. आकारमानातील या वाढीमुळे मूळ तांदळाची घनता व चुरमुऱ्याची घनता यात फरक मिळेल. तांदुळाची घनता जास्त असेल; तर त्या पासून बनलेल्या चूरमुऱ्याची घनता कमी असेल.

वेगवेगळ्या धातूंची घनता वेगवेगळी असते. याचाच दुसरा अर्थ सारख्याच आकारमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे वस्तुमान भिन्न असेल. त्याचाच तिसरा अर्थ; सारख्याच वस्तुमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे आकारमान भिन्न असेल. याचे व्यवहारातील उदाहरण बघू. १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा एक ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ०.५२ घनसेंटीमीटर असेल; परंतु तितक्याच वस्तुमानाचा म्हणजे १० ग्रॅम शुद्ध अल्युमिनियमचा ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ३.७ घनसेंटीमीटर असेल.

शुद्ध सोन्याची घनता १९.३२ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर तर शुद्ध अल्युमिनियमची घनता २.७० ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर आहे. शुद्ध सोन्याची घनता ही शुद्ध अल्युमिनियमच्या घनतेपेक्षा जास्त आहे. शुद्ध धातूची घनता माहीत असल्याने वस्तुमान व आकारमान मोजून त्या धातूची शुद्धता तपासता येते.