ग्वादालुपे हिदाल्गोचा तह

ग्वादालुपे हिदाल्गोचा तह हा अमेरिका आणि मेक्सिको मध्ये झालेला तह होता. २ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी व्हिया दे ग्वादालुपे हिदाल्गो (आता मेक्सिको सिटीचा एक भाग) या गावात झालेल्या या तहाने मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेचे सैन्य मेक्सिको सिटीच्या सीमेवर आलेले असताना मेक्सिकोने हा तह करण्याचा प्रस्ताव मांडला.

या तहातील कलमांनुसार अमेरिकेने मेक्सिकोला १.५ कोटी अमेरिकन डॉलर देण्याचे तसेच मेक्सिकोने अमेरिकन नागरिकांना देणे असलेले ३२.५ लाख अमेरिकन डॉलर देण्याचे कबूल केले. बदल्यात मेक्सिकोने अमेरिकेची सीमा रियो ग्रांदे नदीपर्यंत असल्याचे स्वीकारले तसेच संपूर्ण कॅलिफोर्निया आणि न्यू मेक्सिको, कॉलोराडो, वायोमिंग, ॲरिझोना, नेव्हाडा आणि युटाचा भाग अमेरिकेच्या हवाली केला. या प्रदेशांत राहणाऱ्या मेक्सिकोच्या नागरिकांना मेक्सिकोत सुरक्षितपणे स्थलांतरित होण्याचा किंवा अमेरिकेचे नागरिकत्व पत्करण्याचा पर्याय देण्यात आला. ९०%पेक्षा अधिक व्यक्तींनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.