गी द मोपासाँ (फ्रेंच: Henri René Albert Guy de Maupassant) (जन्म : शातो द मिरोमेस्निल, नॉर्मंडी, ५ ऑगस्ट १८५०, - ६ जुलै १८९३) हा फ्रेंच साहित्यिक होता. त्याला आधुनिक लघुकथेचा जनक मानले जाते.

गी द मोपासॉँ
जन्म ऑगस्ट ५, इ.स. १८५०
मृत्यू जुलै ६, इ.स. १८९३
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा फ्रेंच
स्वाक्षरी गी द मोपासाँ ह्यांची स्वाक्षरी

जीवन संपादन

गी द मोपासाँ हा गुस्ताव द मोपासाँ व लॉर ल प्वातेव्हाँ या दांपत्याचे थोरले अपत्य होत. तो अकरा वर्षांचे असताना त्यांच्या आईने नवऱ्यापासून कायदेशीर फारकत घेतली.

घटस्फोटानंतर, ल प्वातेव्हॉं यांनी थोरला गी आणि धाकटा एर्वे यांचा ताबा स्वतःकडे ठेवला. वडील नसल्याने मोपासाँच्या आयुष्यावर त्याच्या आईचा सगळ्यांत जास्त प्रभाव होता. गीची आई उत्तम वाचक होती. तिला अभिजात साहित्याची आवड होती. गीने वयाच्या त्याच्या तेराव्या वर्षांपर्यंतचा काळ आईसोबत व्हिला दे वेर्गिये येथे आनंदात व्यतीत केला. तेराव्या वर्षी त्याला रूआँ येथील एका प्रतिष्ठित विद्यालयात अभिजात साहित्याच्या अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात आले.

इ.स. १८६८ साली, गीने प्रख्यात कवी अल्जेर्नों चार्ल स्विनबर्न यांना नॉर्मंडी येथील एत्रेता समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात बुडताना वाचवले. ज्युनियर हायस्कुलमध्ये गेल्यानंतर गीची भेट प्रख्यात लेखक गुस्ताव फ्लोबेर यांच्याशी झाली.

इ.स. १८७८ साली, गीने सूचना प्रसारण मंत्रालयात काम सुरू केले व ल फिगारो, गिल ब्ला, ल गोल्वा, ल'एको द पारी अशा नामवंत वृत्तपत्रांत सहसंपादक म्हणून काम पाहिले. फावल्या वेळात तो कादंबऱ्या व लघुकथा लिहीत असे.

इ.स. १८८० साली, गीने त्याची पहिली प्रख्यात साहित्यकृती बूल द स्विफ प्रकाशित केली. या साहित्यकृतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. फ्लोबेराने तिला 'चिरकाल टिकून राहणारी साहित्यकृती' म्हणून गौरवले. गीची ही पहिली लघुकथा फ्रान्स-प्रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतली होती. यानंतर त्याच्या दु आमी, मदर सॅवेज, मादमोझेल फिफी, इत्यादी लघुकथा प्रकाशित झाल्या. इ.स. १८८० ते इ.स. १८९१ या दशकात मोपासॉंने विपुल लिखाण केले.

इ.स. १८८१ साली, गीचा पहिला लघुकथासंग्रह 'ला मेसाँ टेलिये' या नावाने प्रकाशित झाला. दोन वर्षांतच या संग्रहाच्या बारा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. इ.स. १८८३ साली, त्याने पहिली कादंबरी 'यून वी' हातावेगळी केली. ही इंग्रजीत 'अ वूमन्स लाईफ' या नावाने अनुवादित झाली. वर्षाच्या आतच या कादंबरीच्या पंचवीस हजार प्रती खपल्या. त्याची दुसरी कादंबरी, बेलामी, इ.स. १८८५ साली प्रकाशित झाली व तीही अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली.

मोपासाँच्या लघुकथांचे जगातल्या सर्व भाषांत अनुवाद झाले आहेत. मराठीत विकास बलवंत शुक्ल यांनी दोन खंडांत 'मोपासा‍ंच्या सर्वश्रेष्ठ कथा' अनुवादित करून लिहिल्या आहेत. त्यांनी मोपासाँच्याच 'इन द बेडरूम' या कथेचा 'शय्यागृहात' या नावाचा अनुवाद केला आहे.

मोपासाँच्या साहित्यकृती संपादन

  • ओ सोलेय (प्रवासवर्णन, १८८४)
  • इवेत (लघुकथासंग्रह, १८८४)
  • काँत दु जूर ए दला न्वित (लघुकथासंग्रह, १८८५)
  • काँते दला बेकास (लघुकथासंग्रह, १८८३)
  • क्लेअर द ल्यून (लघुकथासंग्रह, १८८४) (यात गीची 'ले बिजू' ही लघुकथा आहे.)
  • त्वाइन (लघुकथासंग्रह, १८८५)
  • नोत्र केर (कादंबरी, १८९०)
  • पिए‍र ए ज्यां (कादंबरी, १८८८)
  • फो‍र्त कोमला मोर्त (कादंबरी, १८८९)
  • बेलामी (कादंबरी, १८८५)
  • मॉंतोरिओल (कादंबरी, १८८७)
  • मादमोझेल फिफी (लघुकथासंग्रह, १८८२)
  • माँसिये पाराँ (लघुकथासंग्रह, १८८६)
  • मिस हॅरियेत (लघुकथासंग्रह, १८८४)
  • यून वी (कादंबरी, १८८३)
  • ल'ओर्ला (लघुकथासंग्रह, १८८७)
  • ल'इन्युतिल ब्यूटे (लघुकथासंग्रह, १८९०)
  • ल रोझिये द मादाम उसों (लघुकथासंग्रह, १८८८)
  • ला पेतित रोक (लघुकथासंग्रह, १८८६)
  • ला माँ गोश (लघुकथासंग्रह, १८८९)
  • ला मेसाँ टेलिये (लघुकथासंग्रह, १८८१)
  • ला वी एरान्त (प्रवासवर्णन, १८९०)
  • ले सर रोंदोली (लघुकथासंग्रह, १८८४)
  • ले स्वारी द मेदाँ (लघुकथासंग्रह, यात गीची 'बूल द स्विफ' ही लघुकथा आहे. तसेच, झोला, ओस्मान्स इत्यादी लेखकांच्या लघुकथा यात आहेत.) (१८८०)
  • सूर लू (प्रवासवर्णन, १८८८)

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "मोपासॉंत्याना.एफआर - मोपासॉं व त्याच्या साहित्यकॄतींविषयीचे संकेतस्थळ" (फ्रेंच भाषेत).
  • "मोपासॉंच्या साहित्यकॄतीं" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)