कॉलिन मॅकेन्झी (१७५४/५८ - १८२१) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत लश्कर अधिकारी होते जे नंतर भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल बनले. ते पुरातन वास्तुंचे संग्रहक आणि एक ओरिएंटलिस्ट होते. त्यांनी स्थानिक दुभाषे व विद्वानांचा मदतीने दक्षिण भारतातील धर्म, मौखिक इतिहास, शिलालेख अभ्यासले. सुरुवातीला वैयक्तिक आवड आणि त्यानंतर १७९५ मध्ये टिपू सुल्तानवर ब्रिटिशांनी विजय मिळविल्यानंतर अधिकृत सर्वेक्षक म्हणून त्यांनी मैसुर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी केले आणि पुरातन नकाशाचे क्षेत्रफळावर पुरातन वास्तूंच्या जागा दाखविल्या. भारतीय हस्तलिखिते, शिलालेख, अनुवाद, नाणी व पेंटिंग यांचा अनमोल संग्रह त्यांनी केला. त्यांच्या निधना नंतर त्यांच्या पत्नीने हा संग्रह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विकला. हा संग्रह भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा स्रोत व भारताशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा सर्वात मौल्यवान संग्रह आहे.[१][२][ संदर्भ हवा ]

थॉमस हॅकी या चित्रकाराचे १८१६ साली काढलेले कॉलिन मॅकेन्झी व त्यांच्या सहकार्याचे चित्र

कॉलिन मॅकेन्झींचा जन्म स्कॉटलंड मधील स्टॉर्नॉय द लुईस बेटावर झाला. ते वडील मर्डोक मॅकेन्झी हे व्यापारी होते. अंदाजे तीस वर्षांचे असताना २ सप्टेंबर १७८३ रोजी ते मद्रासला आले व इन्फंट्री डिव्हिजनमध्ये कॅडेट म्हणून सामील झाले परंतु १७८६ मध्ये त्यांची कॅडेट ऑफ इंजिनियर म्हणून बदली करण्यात आली.

भारतात आगमन झाल्यानंतर त्यांची लॉर्ड फ्रान्सिस नेपियरची मुलगी हेस्टर हिचाशी भेट झाली. हेस्टरचा सॅम्युअल जॉन्सन यांच्याशी विवाह झाला होता जो मदुराई येथे प्रशासनिक सेवक म्हणून काम करीत होता. हेस्टरने कॉलिन मॅकेन्झीचा परिचय काही स्थानिक ब्राह्मणांशी करून दिला. या ब्राह्मणांच्या मदतीने कॉलिन मॅकेन्झीने प्राचिन भारतीय गणितीय घातगणन कोष्टकांचे ज्ञान व सोळाव्या शतकातील गणितज्ञ जॉन नेपियर निर्मित 'लोगॅरिथम' कोष्टके याचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला. पुढे काही कारणाने हा प्रकल्प थांबला परंतु मॅकेन्झीचा प्राचीन भारतीय संस्क्रुतीत व ज्ञानात रस वाढला.

सैन्य दलातील जीवन संपादन

भारतातील पहिली तेरा वर्षे ते सैन्य दलात व्यस्त होते. १७८३ च्या सुमारास त्यांनी कोइंबतूरदिंडुक्कल, मद्रास, नेल्लोरगुंटूर येथील सैन्य दलाच्या अभियांत्रिकी विभागात काम केले. १७९० ते १७९२ च्या दरम्यान ते मैसूरच्या मोहिमेत सामील झाले. १७९३ मध्ये त्यांनी पोंडिचेरीच्या वेढ्यात भाग घेतला. पुढे त्यांची श्रीलंकेला एक कमांडिंग इंजिनियर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली पण ते १७९६ साली परत आले. ६ मार्च १७८९ रोजी प्रथम लेफ्टनंट म्हणून त्यांची नेमणूक झाली, १६ मे १७८३ रोजी दुसरे लेफ्टनंट पदी बठती झाली. १६ ऑगस्ट १७९३ ते कॅप्टन झाले. १ जानेवारी १८०६ रोजी त्यांची मेजरपदी नेमणुक झाली. १२ ऑगस्ट १८१९ रोजी कर्नल बनण्याचा मान प्राप्त झाला. १७९६ साली सिलोनहून परतल्यावर त्यांची पुरातत्त्व अभ्यासात रुची वाढली.


म्हैसूरचे सर्वेक्षण संपादन

 
मॅकेंझी

१७९९ सालात मॅकेंझी श्रीरंगपट्टणच्या चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात ब्रिटीश सैन्यात कॅप्टन होते. या युद्धात टिपू सुल्तानचा पराभव झाला व तो मारला गेला. टिपूचा पराभव केल्यानंतर त्यांनी १७९९ ते १८१० च्या दरम्यान म्हैसूर इलाक्याचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश निजामाच्या राज्याच्या प्रांतांची सीमा निश्चित करणे हे होते. या सर्वेक्षणामध्ये अनेक दुभाष्यांसह ड्राफ्टस्मन आणि इलस्ट्रेटर यांच्या चमुचा समावेश होता. या भौगोलिक सर्वेक्षणा बरोबरच मॅकेंझीने या परीसराचा नैसर्गिक इतिहास, भूगोल, आर्किटेक्चर, राजकीय इतिहास, रीतिरिवाज, लोककथा आणि लोकसंख्या याचाही आभ्यास केला.

जेव्हा त्यांनी सर्वेक्षण सुरू केले, तेव्हा त्यांना दक्षिण भारतीय भाषांमध्ये ब्रिटिशांच्या प्राविण्यातील कमतरते मुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याच सुमारास, विल्यम लॅम्बटन यांनी त्रिकोणमितीय सर्वेक्षण पद्धतीने सर्वेक्षण करीत होते परंतु मॅकेंझीच्या या मैसुर सर्वेक्षणादरम्यान दोघांमधे काही सहकार्य नव्हते.

मॅकेन्झी यांना लष्करी किंवा भौगोलिक माहिती बरोबरच संपूर्ण देशाच्या सांख्यिकी अहवाल तयार करण्याचा आदेश आला तथापि या भव्य योजनेसाठी त्यांना पर्याप्त संसाधने प्रदान करण्यात आली नव्हती. त्यांनी बॅरी कोहस यांना लिहिलं की ते शेती व बिगरशेती जमिनीचा अहवाल करण्यापेक्षा ते राजकीय आणि सैन्यदृष्ट्या महत्त्व असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतील.

 
मेकेन्झीने तयार केलाला दक्षिण भारताचा नकाशा )

त्यांचे मुख्य दुभाषी हे कवेली वेंकट बोरिया होते. १७९६ साली श्रीलंकेहून परतल्यावर मॅकन्जी व कवेली वेंकट बोरिया प्रथम भेटले होते. कवेली वेंकट बोरिया हे संस्कृत सह तामिळ, तेलगू, कन्नड भाषेचे जाणकार तसेच सर्वेक्षणाच्या कामासाठी सक्षम व्यक्ती होते. मॅकेन्झी त्यांनी कवेली वेंकट बोरियांचा उल्लेख "भारतीय ज्ञानाच्या भांडाराचा माझा परिचय करण्यातला समर्थ सथीदार" म्हणून केला आहे. १७९७ मध्ये मॅकेंझीने मुदगेरीला भेट दिली आणि जैन मंदिराचे अवशेष शोधले. त्यांनी आपल्या अनुवादक कवेली वेंकट बोरियांच्या मदतीने मुलाखतींवर आधारित जैन धर्मावर एक व्यापक निबंध लिहिला. १८०३ साली मध्ये कवेली वेंकट बोरियांचे निधन झाले. मॅकेंझीने त्यांच्या भावाला वेंकट लक्ष्मैय्या यांना सोबत घेतले. मेकेन्झीच्या सहाय्यकांपैकी आणखी एक म्हणजे धर्मया होय. ते जैन पंथिक अभ्यासक होते. म्हैसूर राज्यातील मालेयूरचे निवासी आसलेले धर्मया हे हेल ​​कन्नड़ या प्राचिन कन्नड भाषेचे जाणकार होते. मॅकेन्झी धर्मयांच्या मदतीने शिलालेखांचा अभ्यास केला. धर्मयाने मॅकेन्झी यांना भारताच्या इतिहासातील जैन सांप्रदायचा परिचय करून दिला परंतु धर्मयांच्या जैन हे मक्काहून भारतात आल्याचा उल्लेख अविश्वसनीय समजले गेले. मार्क विल्क्स या इतिहासाच्या अभ्यासकाने धर्मयांच्या मुलाखतवर आधारित हिस्टॉरिकल स्केचस ऑफ द ऑफ साउथ इंडिया या पुस्तकात जैन पंथावर लिखाण केले आहे.

अमरावती संपादन

 
१८०९ साली अमरावती येथील शिल्पांच्या मॅकेन्झींने बनवलेल्या चित्रक्रूतीं

मॅकेन्झींच्या प्रचंड संग्रहणीय संकलनांमध्ये सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेल्या व सध्याच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात असलेल्या अमरावती मध्ये बनवलेल्या ८५ शिल्पांच्या चित्रक्रूतींचा समावेश आहे. मॅकेन्झींनी १७९८ साली प्रथम अमरावतीला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. पुढे भारताचे सर्वेअर जनरल झाल्यावर त्यांनी १८१६ ते १८२० सालाच्या दरम्यान या चित्रक्रूतींचा दस्तऐवजांच्या तीन प्रती बनवल्या. त्यातील प्रत एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाच्या कलकत्ता येथिल ग्रंथालयात, आणखी एक प्रत मद्रास येथे आणि तिसरी लंडनमधील ब्रिटिश ग्रंथालयात ठेवण्यात आली. केवळ लंडनची प्रत आज उरली आहे. ही रेखाटने १८१० पासून १८१८ पर्यंत मॅकेंझीचा ड्राफ्टस्मन जॉन न्यूमॅन यांनी बनविल्या आहेत. मॅकेन्झीना सुमारे १३२ शिलालेख सापडले होते परंतु हे आता सापडत नाहीत. मॅकेन्झीचा असा विश्वास होता की ही अमरावती हे जैन धर्माशी संबंधित आहे आणि तेव्हा भारतात बौद्ध धर्माची स्थापना झाली नव्हती. अमरावतीतील स्थंभलेखांचे अवषेश मछलीपट्टणमला आणले गेले परंतु त्यातील बरेच अवषेश जहाजांनी इंग्लंडला नेण्यात आले नाहीत. त्या नंतर हे स्थंभलेखांचे अवषेश मछलीपट्टणमचे १८१४ ते १८१७ पर्यंत असिस्टंट कलेक्टर असलेले फ्रान्सिस डब्ल्यू. रॉबर्टसन यांच्या नावाने "रॉबर्ट्सनचे माउंड" म्हणून ओळखले. त्यानंतर अमरावतीमधील सर वॉल्टर एलिएटच्या संकलनासह हे मछलीपट्टणमचे ६ शिलालेख मद्रास येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. मॅकेन्झीनी बनवलेल्या ८५ शिल्पांच्या चित्रांपैकी ७९ शिलालेख हरवले आहेत.

जावा संपादन

१८११ ते १८१३ सालाच्या दरम्यान मॅकेन्झीं नेपोलियोनिक युद्धात सामील झाले. जावा बेटांवरील दोन वर्षांच्या त्यांच्या वस्तव्याच्या दरम्यान त्यांचा पेट्रोनला जाकॉमीना बार्टेल या सिलोनमध्ये जन्मलेल्या डच मुलीशी विवाह झाला.

भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल संपादन

 
मॅकेन्झींची सही असलेला १८१६ सालचा पुडुचेरी चा नकाशा

२६ मे १८१५ रोजी मॅकेन्झींची भारताचे पहिले सर्व्हेयर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. कलकत्त्यातील फोर्ट विलियम येथे भारतीय सर्वेक्षण विभागाचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. पण १८१७ साली त्यांना सर्वेक्षणासाठी मद्रास येथे राहण्याची परवानगी देण्यात आली. १८१७ साला पर्यंत ते मद्रासलाच राहिले व या काळात त्यांनी विविघ सर्वेक्षणांचे नियोजन आणि आधीच्या सर्वेक्षणाचे निरीक्षण केले. त्यांनी बेंजामिन स्वाईन वार्ड यांना त्रावणकोर संस्थानाचे सर्वेक्षक म्हणुन नेमणूक केली. लेफ्टनंट पीटर इरे काननेर (५ ऑगस्ट १७८९ रोजी जन्मलेले, २९ एप्रिल १८२१ रोजी हैदराबाद येथे त्यांचा मृत्यू झाला) यांची कुर्गसाठी सर्वेक्षक म्हणुन नेमणूक केली. फ्रान्सिस माऊंटफोर्ड (१७९०- १८२४) यांची गुंटूर येथे आणि जेम्स गार्लिंग (१७८४ -१८२०) यांची निजामाच्या प्रांतांमध्ये सर्वेक्षक म्हणुन नेमणूक त्यांनी केली. १८१६ साली या जेम्स गार्लिंगने सर्वेक्षणासाठी त्रिकोणीय पद्घतीचा वापर करून अचूक मोजमाप सुरू केले. ब्रिटिश काळातील या मुंबई इलाख्याच्या प्रमुखपदी असलेले गव्हर्नर यांनी जेम्स गार्लिंगच्या अचूक सर्वेक्षणामुळे इतर अघीक प्रांतांमध्ये सर्वेक्षणासाठी प्रोस्ताहित केले. मॅकेन्झींने जेम्स गार्लिंगला फटकारले व निजामाच्या प्रांतांमधील सर्वेक्षणा पुरतेच मर्यादित रहाण्याचे आदेश दिले. ब्रिटिश सकारने परिस्थीती हाताळताना मॅकेन्झींना कलकत्ताला हलविण्याचा निर्णय घेत २४ जून १८१६ रोजी एच.सी. फिनिक्स या जहाजाला मद्रासला पाठवीले. बरेच दिवस चालढकल करत मॅकेन्झींने कलकत्ताला जाण्याचे टळले. ब्रिटिश सकारच्या सुचना वजा कडक आदेशाचे पालन करत अखेर १७ जुलै १८१७ रोजी सोफिया जहाजातून मॅकेन्झीं कलकत्ताला जाण्यासाठी मद्रासहून निघाले. मॅकेन्झींचा साथीदार वेंकट लक्ष्मैय्या हा कलकत्तास न जाता मद्रासलाच राहीला.

निधन संपादन

८ मे १८२१ रोजी त्यांचे कलकत्ता येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले, त्यांना पार्क-स्ट्रिटच्या दक्षिणेस असलेल्या स्मशानभूमीत दफन करण्यात आले. त्यांच्या विधवा पत्नी पेट्रोलाला यांनी मॅकेन्झींने जमवलेला कागदपत्रे, हस्तलिखिते, मुर्ती, नाणी, हत्यारे, चित्रे, कलाक्रूती याचा अनमोल संग्रह बंगाल सरकारला २० हजार रूपयांना विकण्याचा प्रस्ताव दिला. बंगाल सरकारने पामर आणि कंपनीला या संग्रहाचे मुल्यांकन करण्यास सांगितले. पामर आणि कंपनीने या संग्रहाचे मुल्यांकन अगदी कमीतकमी किंमत एक लाख रूपयांची असल्याचे सांगितले. बंगाल सरकारने हा संग्रहाचा खजाना मॅकेन्झींच्या पत्नी कडुन १,००,००० रूपयांना खरेदी केला. मॅकेन्झींच्या इच्छापत्रा प्रमाणे या रकमेतील ५ टक्के रक्कम ही वेंकट लक्ष्मैय्याला देण्यात आली. या संग्रहातील बहुतेक वस्तु या ब्रिटीश संग्रालयात आहेत. काही वस्तु या मद्रासच्या संग्रहालयात आहेत.

अलेक्झांडर जॉन्सन याने कॉलिन मॅकेन्झीच्या जीवनावर एक संस्मरण लिहीले आहे.[३][ संदर्भ हवा ]

संदर्भ संपादन