बलबाहू चीन मध्ये अर्निको नावाने ओळखला जातो. या बलबाहू चा चीन, बिजींग, मध्ये पुतळा उभारला गेला. बलबाहू ने चीन मध्ये वास्तुशास्त्रात बाराव्या आणि तेराव्या शतकात केलेल्या कामाची आठवण म्हणून हे स्मारक उभारले गेले.

बलबाहू हा मूळचा नेपाळ मधील पाटण गावाचा रहिवासी होता. पाटण हे कांस्य व इतर धातूविषयक ओतकाम करण्या साठी फार प्रसिद्ध होते. अशा प्रकारे सुबक रितीने घडवलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तींना तिबेटाच्या राजे आणि दरबारी मंडळींकडून चांगली मागणी होती. बोरोबदूर या इंडोनेशिया येथील स्तूपाच्या कामासाठी सन आठशे मध्ये येथून लोक गेले होते.

धातूकामा शिवाय ही मंडळी वेदातून मांडलेल्या 'आरेखने व मांडणी' या विषयातही तरबेज होती. नेपाळ हे भारतीय आणि चिनी संस्कृतीचा संगम बनले होते. ही नेपाळी कारागिरांची कीर्ती चीन च्या मिंग या राजघराण्या पर्यंत गेली. बाराव्या शतकाच्या मध्यावर चीन च्या राजांनी (व कुब्लाई खान?) नेपाळच्या राजांना विनंती केली की, त्यांना नवीन बांधून हव्या असणाऱ्या श्वेत स्तूपा साठी कारागीर पाठवावेत. या कामासाठी पाटण गावातून ऐंशी कुशल लोक निवडले गेले. या पथकाचा प्रमुख म्हणून, बलबाहू ची नेमणूक राजांनी केली. असे मानले जाते की या वेळी बलबाहू फक्त सतरा वर्षांचा होता. हे पथक मजल- दरमजल करत चीन च्या बिजींग या शहरात पोहोचले.

एक पोरगेलासा कारागीर का या स्तूपाचे आरेखन आणि बांधणी करणार, असा विचार करून बलबाहू ची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वीच्या राजाचा एक भग्न पुतळा त्याला दुरुस्ती साठी दिला. हा पुतळा बलबाहू ने इतका सुरेख रित्या दुरुस्त केला की चिनी कारागीर चकीत झाले.

श्वेत स्तूपाच्या कामासाठी बलबाहूची नेमणूक करण्यात आली. सर्व रेखाटणे व धातूच्या तुळयांचे काम बलबाहू ने केले. हे काम यशस्वी रित्या पूर्ण करून बलबाहू ने राजाचा विश्वास संपादन केला. या नंतर चीन मध्ये अनेक वास्तूंची कामे त्याने केली. बलबाहू चीन मध्ये अर्निको नावाने प्रसिद्ध झाला. चिनी संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उतरत्या टोकदार, डौलदार व एकाखाली एक अशा छपरांची परंपरा अर्निकोनेच सुरू केली. या डौलदार छपरांच्या कमानी टोकांवर तो (भारतीय परंपरेशी नाते सांगणारा) कळस बसवत असे. सुबक कळस आणि आणि एकाखाली एक अशा छपरावरच्या धातूच्या चमकदार कमानींची लाटच चीन मध्ये आली. बिजींग मध्ये त्याने अनेक भव्य अशा वास्तूंचा उभारणी कामात सहभाग घेतला. शहराच्या मांडणी मध्ये महत्त्वाचे योगदान दिले. या सगळ्याची पावती म्हणून राजाने त्याला उपाधी दिली. (उपाधीचे नाव कळले नाहीये अजून.)

अर्निकोने एका चिनी मुलीशी लग्न केले आणि चीन मध्येच राहिला. असा हा बलबाहू अर्निको भारतीय स्थापत्यशास्त्राचा झेंडा चीन मध्ये रोवून तेराशे सहा मध्ये मृत्यू पावला.