"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अव्वल ब्रिटिश आमदानीतील महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या इति...
(काही फरक नाही)

२२:५३, १८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

अव्वल ब्रिटिश आमदानीतील महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या इतिहासाच्या अभ्यासकांच्या परंपरेमध्ये कै. रा. ना. चव्हाण हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा निकट सहवास, तसेच ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाजाचे वैचारिक संस्कार त्यांनी चिकित्सकपणे स्वीकारल्यामुळे त्यांच्या चिंतनाला देशीयतेची घट्ट पाळेमुळे प्राप्त झाली आहेत. पन्नास वर्षे चव्हाण सातत्याने मान्यवर नियतकालिकांमधून वैचारिक लेखन करीत होते. फुले, शाहू, आंबेडकर या विचारपरंपरेतील समन्वयाचे दुबे निष्ठेने जुळवणाऱ्या या विचारवंताने मोठे सामाजिक कार्य केले आहे. ते प्रसिद्धिपराङ्मुख होते.

चव्हाणांचा पहिला लेख ब्राह्मधर्म व बहुजन समाज हा प्रार्थना समाजाचे मुखपत्र ‘सुबोधपत्रिके’त १९३६ मध्ये प्रकाशित झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे तेवीस वर्षांचे होते. राष्ट्रीय चळवळीच्या जागृतीचा खोल ठसा त्यांच्या विचारविश्वावर होता. पण त्यांनी तो गडद केला. प्रार्थना समाज, ब्राह्मोसमाज, सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळीच्या तुलनात्मक आणि समन्वयक अभ्यास पद्धतीमुळे ही अभ्यासपद्धती फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, बुद्ध, मार्क्‍स, राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा आस्थेवाईक मागोवा घेते. वस्तुनिष्ठता व तर्कशुद्धता हे त्यांच्या लेखनशैलीचे विवेकपूर्ण वैशिष्टय़ आहे, असा अभिप्राय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींना दिला आहे. म्हणूनच ‘सत्यशोधक चळवळ पुष्कळपणे प्रतिक्रियात्मक व इहवादी होते, तत्त्वचिंतनाचा भाग तिच्यामध्ये नव्हता’ असे परखड मूल्यमापन चव्हाण करू शकले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे ते १४-१५ वर्षांचे असताना ‘फुलेवेडा’ झाल्यानंतरही ते असं प्रतिपादन करीत, हे अर्थपूर्ण आहे.

आज १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीचा अभ्यास मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. जुनी आणि नवी माहिती, संदर्भ चिकित्सकपणे प्रकाशित होत आहेत. या शतकातील विचारपर्वाचे चव्हाण साक्षीदार असल्यामुळे त्यांच्या लिखाणातून अज्ञात तपशील सहजपणे येतात. ‘मुंबई कौन्सिलात प्रथम घेतलेले दलितांचे प्रतिनिधी शिंद्यांच्या मिशनमध्येच शिकले किंवा महर्षी शिंदे यांनी ‘बहिष्कृत भारत’ (नंतर डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्राचे नाव) ही संज्ञा १९०३ पासून योजिली व भारतातील निरनिराळ्या प्रांतांमधून दलितांची संख्या केवढी आहे, हे साधार आकडे त्यांनीच शोधून काढले किंवा डॉ. आंबेडकरांशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीतील ‘सिंहगड हे पूर्वी बुद्धाचे ठिकाण असावे. कौंडव्य ऋषी बुद्ध होता,’ असे डॉ. आंबेडकरांचे मत उद्ध्वस्त करणे हा चव्हाण यांच्या विचारपरामर्षांचे विशेष आहे.

महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या स्वरूपाबद्दल त्यांची आग्रही मते होती. हे समाजप्रबोधन कालाच्या मर्यादेत जसे घडत होते, त्याचबरोबर या समाजप्रबोधनाच्या सूत्रधारांनाही मर्यादा होत्या, याचे भान त्यांना होते. ‘म्हणून कोणत्याच सामाजिक, राजकीय लढय़ात प्रार्थनासमाजी जोरकसपणे उतरले नाहीत. सत्यशोधक समाजाला अखिल भारतीय स्वरूप येऊ शकले नाही. मूर्तिपूजेचे प्राबल्य जनतेमध्ये आजही आहे. म्हणून सर्व चळवळी (आर्यसमाजासह सत्यशोधक समाजही) या दृष्टीने पराभूत आहेत, हिंदुत्ववादीदेखील या दृष्टीने आर्य समाजाशी पूर्ण समरस झाले नाहीत,’ ही सारी विधाने चव्हाणांचा चिंतनशील समतोलपणा दर्शविणारी आहेत.

समाजपरिवर्तनाची परंपरा चिवटपणे चालू राहिली पाहिजे. तिच्यामधील बुद्धिवादी आशय हा अधिक परिपक्व केला पाहिजे हा ध्यास चव्हाणांचा होता. ज्या विचारपरंपरेचे ते पाईक होते, ती समाजप्रबोधकांची परंपरा होती. म्हणून शिक्षणाचे मोल ते जाणत होते.

स्वातंत्र्योत्तर, महाराष्ट्रातील दलित चळवळ ही त्यांना आश्वासक वाटली. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील दलित चळवळ व स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांची चळवळ यामध्ये महदंतर आहे. दलितांचा प्रश्न राजकीय व आर्थिक झाला आहे, याचे भान दाखवले पाहिजे हा विचार ते प्रकर्षांने मांडीत. डॉ. आंबेडकर यांना स्वतंत्र चळवळ उभारावी लागली याचे कारण स्पृश्य बहुजन समाजाची उदासीनता हे आहे, असे स्पष्ट सांगताना आज मात्र हा विसंवाद मिटवून टाकणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत होते. कारण बहुजनी नव्या नेतृत्वाने फक्त राजकारणी व सत्तावादी स्वरूप घेतल्यामुळे त्याचा व म. फुले-शिंदे यांचा नामोच्चारापुरता संबंध उरला व यामुळेच अस्पृश्यांसंबंधीचा खेडय़ापाडय़ातील जनतेचा दृष्टिकोन विरोधी व पुराणमतवादी म्हणजे जुनाच राहिला हे विदारक वास्तव त्यांनीच परखडपणे सांगितले होते.

त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘सत्य शोधतो तोच सत्यशोधक. गेली पन्नास वर्षे मी विचारपूर्वक अक्षरे व शब्द वापरले. साहित्यिक म्हणवून घ्यावे यासाठी हा प्रवास नव्हता व नाही. पोटासाठी तर मुळीच नव्हता.’

आज महाराष्ट्रामध्ये व्रती विचारवंतांची परंपरा दुर्मीळ होत असताना हे विचार अजून धीराचे वाटतात. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीचे साधार परिशीलन करणारा हा विचारवंत स्वत:कडे कसलेच श्रेय घेत नाही. एका पत्रात त्यांनी लिहिलं, ‘महर्षी शिंदे यांनी माझ्यावर पैलू पाडले, नाहीतर मी अनगड राहिलो असतो. समाज निरीक्षण, अनुभव, प्रत्यक्ष परीक्षण व जातिधर्मपंथ पक्ष यांच्या बाहेर जाऊन चिंतन, मनन, लेखन करण्याची वाट कर्मवीर शिंद्यांनी मला दाखविली. त्यानुसार ध्येयवादी मार्गाने जात आहे. श्रेय त्यांचे आहे. त्यांचा मी मानसपुत्र आहे. त्यांनी यशापयशाचे हलाहल पचविले होते. ते उपेक्षित आहेत. निदान मी त्यांना श्रेय देताना तरी त्यांचा उल्लेख होईल.’

महाराष्ट्रातल्या एका मान्यवर विद्यापीठाच्या कार्यकारिणीने त्यांना डी.लिट. देण्याचा निर्णय घेतला, पण प्रत्यक्ष दिली नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने गौरववृत्ती देऊन सत्कार केला होता. त्यांचे अजून लेख संकलित करून ग्रंथ प्रकाशित करावेत. कारण ज्या बहुजन समाजासाठी व दलितांसाठी त्यांनी लेखन केले, त्यांच्या चळवळींना रा. ना. चव्हाण यांचे विचार हे लामणदिव्यासारखे ठरतील.

संदर्भ - http://www.loksatta.com/daily/20090410/lsv07.htm