"निसर्गरक्षणाच्या परंपरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: निसर्गरक्षणाच्या अनेक चांगल्या परंपरा भारतीय संस्कृतीचे भूषण आ...
(काही फरक नाही)

१०:३४, १२ जानेवारी २०१० ची आवृत्ती

निसर्गरक्षणाच्या अनेक चांगल्या परंपरा भारतीय संस्कृतीचे भूषण आहेत. आपल्या देशभर वड-पिंपळ-उंबर-नांदुर्कीची झाडे विखुरलेली आहेत. यांना पवित्र मानून संरक्षण देण्यात आलेले आहे. आज परिसर शास्त्रज्ञांच्या लेखी ह्या सर्व वृक्षजाती कळीची संसाधने" मानण्यात आली आहेत. इतर झाडा-झुडपांना जेव्हा काहीही फळे नसतात, अशा दिवसांतसुद्धा ह्या जाती फळतात. ह्यांच्या फळांवर अनेक किडे, पक्षी, माकडे, खारी, वटवाघळे तग धरून राहतात. म्हणून निसर्गरक्षणाच्या दृष्टीने ह्यांना टिकवणे महत्वाचे अशी विज्ञानाची शिकवण आहे. हे शहाणपण पूर्वीपासून आपल्या लोकपंरपरेत आहे. मध्य प्रदेशातल्या शिवणी जिल्ह्यातल्या छपारा ब्लॉक मधल्या तेरा गोंड आदिवासी गावांच्या आसपासच्या जंगलात भरपूर चारोळी पिकते. पण एकमेकांवर विश्वास नसला, सहकार नसला, की लोक फळ वाढता वाढताच ओरबाडतात. पुरेसे मोठे होऊ देत नाहीत. कारण थांबले तर दुसरे कोणी तरी ते तोडेल ना! २००४ साली ह्या तेरा गावांतले लोक संयुक्त वनव्यवस्थापनासाठी एकत्र आले, तेव्हा त्यांनी ठरवले की सगळ्यांनीच संयम बाळगून चारोळी व्यवस्थित पिकू द्यायची. गोंडांच्या परंपरेप्रमाणे चारोळी पुरी वाढल्यावर मगच सर्वांनी मिळून पंडुम नावाची पूजा करेपर्यंत तोडली जायची नाही. त्यांनी ही परंपरा पुनरुज्जीवित केली. हे करताच त्या वर्षी त्यांचे चारोळीचे उत्पन्न तीस टक्कयांनी वाढले !
कारवार जवळच्या एका देवराईचे वर्णन करताना ईस्ट इंडिया कंपनीचा सर्जन बुचानन १८०२ साली लिहतो: गावचा गौडा ह्या देवाचा पुजारी आहे. त्याच्यामार्फत देवाची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही देवराईला हात लावत नाही. पण ही परवानगी देण्यासाठी तो काहीही पैसे मागत नाही. उघडच आहे की ईस्ट इंडिया कंपनीने आपला कायदेशीर हक्क बजावू नये म्हणून लोकांनी ही क्लुप्ती शोधून काढली आहे. उलट त्यानंतर ऐशी वर्षांनी डीट्रिच ब्रँडिसने ब्रिटिश पूर्व काळाचा महत्वाचा वारसा म्हणून भारतभर पसरलेल्या देवरायांच्या जाळ्याचे कौतुक केले. कोडगू प्रांतातल्या देवरायांचा मुद्दाम उल्लेख केला, आणि इंग्रजांच्या व्यवस्थापनाखाली ह्या भराभर नष्ट होत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला.
राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यात पूर्वी प्रथा होती की गावाच्या चार दिशांना चार प्रकारची जंगले गाव सांभाळत असे. एका दिशेला कांकडबनी, ज्यातून रोजच्या गरजांकरता वस्तू आणायच्या; रखतबनी दुसऱ्या दिशेला असायची, जेथून अकाल पडला तर वस्तू घ्यायच्या; महाअकाल पडला तरच तिसऱ्या दिशेच्या देवबनीला हात लावायचा आणि देवोरण्याला कधीच हात लावायचा नाही, गाव सोडून जायची वेळ आली तरी हे साठे सांभाळायचे. कर्नाटकातल्या सागर-सोरबा-सिद्धापूर भागात ह्या देवराया अलीकडपर्यंत बऱ्याच टिकून होत्या. तशाच मणिपूरच्या डोंगराळ भागांतही. त्यांच्या अभ्यासावरुन असे वाटते की सर्व देशभर साधारण १० टक्के भूभाग अशा देवरायांखाली होता. म्हणजे हे जाळे आजच्या अभयारण्य-राष्ट्रीय उद्यानांच्या दुप्पट मोठे होते. त्यात सर्व प्रकारच्या वनराजीचा समावेश होता. त्या सर्व लोकांना सहज आपापल्या पंचक्रोशीत उपलब्ध होत्या, त्यांचा आनंद उपभोगणे शक्य होते.
देवरायांची परंपरा ही जरी मानवाच्या निसर्गपूजेच्या परंपरांशी निगडित आहे, तरी या रीतीने सांभाळलेल्या वनराजीतून आपले हितसंबंध जपले जात आहेत याची लोकांना जाणीव असते असे अनेक अनुभव आहेत. रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात एक रहाटी - कोंकणात व घाटमाथ्यावर देवरायांना राहट्या म्हणतात- गारंबीच्या (एन्टाडा फॅझिओलाइडेस) प्रचंड वेलाकरता राखलेली आहे. गुरांवर उपचार करण्यासाठी त्याच्या बिया गोळा करायला दूरवरून लोक येतात. झारखंडात गावाच्या प्रवेशद्वाराजवळ बांबूच्या अशाच देवराया राखलेल्या आहेत. सामान्यत: अशा देवराया किंवा रहाटयांतून कोणताही जिन्नस बाहेर नेला जात नाही. परंतु खास आवश्यकता भासल्यास ते केले जाते. उदा. पुणे जिल्ह्यातल्या घोळ गावच्या देवरायांबद्दल सांगितले की पूर्वी एकदा आगीत गावातली सारी घरे खाक झाली, तेव्हा देवीच्या परवानगीने घरे पुन्हा बांधण्यासाठी काही झाडे तोडली होती. इतर देवरायांचा मर्यादित प्रमाणात उपयोग केला जातो. राजस्थानच्या ओरणांत गुरे चारली जातात. काही ओरणांतून हाताने तोडून लाकूड फाटा घेतला जातो, पण लोखंडी कोयती - कुऱ्हाड वापरण्यावर बंदी आहे. श्रीवर्धन तालुक्यातील गाणी नावाच्या गावकऱ्यांनी तर १९७२ साली आमच्या मार्फत खास विनंती करुन आपल्या गावची काळकाईची १० हेक्टरची राई वाचवली. त्यावेळी या राईत गावच्या ओढ्याचा उगम आहे, ती राई तुटल्यास ओढा आटेल; हे होऊ नये म्हणून ही राई वाचवायला हवी, असे त्यांनी बोलून दाखवले.
म्हणूनच आजच्या धर्माचा संदर्भ पूर्ण बदलेल्या परिस्थितीतही ही परंपरा नुसती टिकूनच नाही, तर काही ठिकाणी पुनरुज्जीवित होत आहे. मणिपूर-मिझोराममध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यावर तिथले देवरायांचे प्रचंड जाळे जीर्ण-शीर्ण झाले. कारण याच सुमारास तेथे रस्ते-ट्रका पोचून लाकडाला मोठी मागणी उत्पन्न झाली होती. परंतु देवराया तुटण्याचे तोटे मग अनेक ठिकाणी लोकांच्या डोळ्यात भरले. उदाहरणार्थ मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील गांगटे लोकांच्या गावांत यामुळे फिरत्या शेतीवर पेटवलेल्या आगी पसरून घरे जळण्याची भीति वाटायला लागली. तेव्हा गांगटे लोकांनी काही गावात पूर्वीप्रमाणे देवराईचे एक कडबोळ्यासारखे वलय पुनरुज्जीवित केले. आता ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याने त्यांनी या देवराईला ’सुरक्षावन’ असे वेगळे नांव दिले आहे, परंतु सामाजिकरीत्या ही बंधने पाळण्याची जी पूर्वी पध्दत होती तीच अंमलात आणली आहे.
अजूनही ह्या देवराया जैवविविधतेचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. केरळाच्या किनारपट्टीत दाट लोकवस्ती आहे, व तेथील नैसर्गिक वनराजी जवळ जवळ पूर्णपणे नष्ट झाली आहे. तरीही अशा नैसर्गिक वनराजीचे काही अवशेष शेतांतून विखुरलेल्या देवराया अथवा सर्पकावूंत सापडतात. अशाच एका देवराईत वनस्पतिशास्त्रज्ञांना कुन्स्टलेरिया केरळेन्सिस ही एक नवी प्रजाती सापडली. तसेच डिप्टेरोकार्पस इंडिकसचे उदाहरण बघा. ह्या कुळातील सदाहरित वृक्ष वर्षावनांत फोफावतात. हे प्रचंड आकाराचे, मऊ लाकडाचे वृक्ष प्लायवुड बनवण्याला उत्तम कच्चा माल आहेत. स्वातंत्र्यानंतर जेव्हा प्लायवुडच्या गिरण्या भारतात भराभर वाढल्या तेव्हा त्यांनी एका मागून एक त्यांना लाभदायक जातीचे वृक्ष संपवायचा सपाटा लावला. वन विभागानेही त्यांना हव्या त्या जाती-प्रजाती त्या नष्टप्राय होईपर्यंत उपलब्ध करून देणे-आणि अगदी स्वस्तात-सुरू केले. जरी सारखे जंगलांचा टिकाऊ पद्धतीने वापर केला पाहिजे, नाही करतच आहोत, असे सोंग घेतले होते तरी. प्रत्यक्षात ओळीने एका मागून एक प्लायवुड गिरण्यांना हव्या त्या जाती संपून जात राहिल्या. ह्यात कर्नाटकात प्रथम संपली डिप्टेरोकार्पस इंडिकस. आज या राज्यात त्याचे भले मोठे वृक्ष केवळ एका राईत शिल्लक आहेत; लोकांनी जतन केलेल्या करीकानम्मन मने अथवा किर्र रानाच्या आईचे घर नावाच्या होन्नावर जवळच्या देवराईत.