मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू हे ११-११-१९११ सालीरोजी जन्मलेले मराठी भाषेचे एक लोककवी. आयुष्यभर केवळ लेखनावर जगलेल्या या माणसाने चरितार्थासाठी सर्व काही केले, प्रचंड हाल काढले आणि अवहेलना सहन केली. त्या काळात प्रसंगी मंगलाष्टके लिहून दिली, आणि ती संख्यासुद्धा पाच हजारांच्यावर असावी. पोटासाठी त्यांनी भविष्यही लिहिले. त्यांच्या कादंबर्या आणि लघुकथाही गाजल्या होत्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी एक पुस्तक लिहिले होते, त्याची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशन लवकरच काढणार आहे.(२७-६-२०११ ची बातमी). त्यांच्या आठवणी सांगणारे "आठवणीतील मनमोहन" हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ ला प्रकाशित होतझाले. या पुस्तकात भा.द.खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना.नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. अतिशय मनस्वी आयुष्य जगलेल्या या अतर्क्य व अनाकलनीय स्वभावाच्या लोकविलक्षण कवीचे वर्णन मराठी साहित्यिक [[जयवंत दळवी]] यांनी "चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस"असे केले आहे.