विद्रोही सांस्कृतिक चळवळ
कार्यकारणी (वर्ष?) :-अध्यक्ष-कॉ. वाहरू सोनावणे, कार्याध्यक्ष-कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस-कॉ. गौतम कांबळे, उपाध्यक्ष-डॉ. बाबुराव गुरव, प्रा. गौतम काटकर,राजकुमार तांगडे, युवा कार्यकर्ते-डॉ. जालिंदर घिगे, दिग्विजय पाटील, कॉ. शिवराम ठवरे, कॉ. मयूर खराडे.
पार्श्वभूमी :- विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यासाली आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत म्हणजे धारावीत पाहिले विद्रोही साहित्य संमेलन घेतले गेले आणि इथूनच विद्रोही या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. १९९९साली काही लेखक बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी लेखकांना 'बैल' संबोधले. यावर सबंध लेखक वर्गातून कोणतीही निषेधाची प्रतिक्रिया उमटली नाही. तर त्याचवेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनातून देखील धार्मिक तणाव व इतर सामाजिक प्रश्नांची दखल घेतली जात नव्हती. ही सगळी साहित्यिक परिस्थिती बिघडलेली होती.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरील आक्षेप :-महाराष्ट्रातील पहिल्या ग्रंथकार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे हे होते. त्यांनी सन्मानाने जोतिराव फुले यांना संमेलनाचे निमंत्रण पाठविले असता जोतिरावांनी "या घालमोड्या दादांनी दिलेल्या निमंत्रणास आम्ही नकार देत आहोत" असे उत्तर दिले होते. त्यानंतरच केव्हातरी महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे बीज रोविले गेले, आणि अधिकृत मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहण्याची प्रथा सुरू झाली. विद्रोहीने याचवेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनावर काही गंभीर आक्षेप घेतले अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासन २५ लाख रुपये देते. हा सर्व पैसा जनतेचा असतो. मात्र, अखिल भारतीय साहित्य संमेलनात कष्टकरी जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. संमेलनाचे होणारे ठराव यांत देखील राबणाऱ्या जनतेचे प्रश्न कधीच अजेंड्यावर नसतात, त्यामुळे हे फक्त अभिजनांचे संमेलन आहे, अशी विद्रोहीने भूमिका घेतली. त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांसाठी घेतल्या जाणाऱ्या पैशांचा हिशोब देखील जाहीर केला जात नाही. म्हणजेच यात आर्थिक गदारोळ देखील होता. फक्त आक्षेप घेऊन हे भागणार नाही तर यासाठी अखिल भारतीय संमेलनाला पर्याय उभा केला पाहिजे हे लक्षात घेऊन विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन घेण्याचे ठरले. त्यानुसार पहिले विद्रोही साहित्य संमेलन हे धारावीच्या झोपडपट्टीत झाले. त्यासाठी जनतेतून पैसे गोळा करण्यात आले. 'एक रुपया आणि एक मूठ धान्य'असे गोळा करून पाहिले संमेलन घेतले गेले. त्याचे अध्यक्ष बाबुराव बागुल हे होते तर उद्घाटक डाॅ. आ.ह. साळुंखे अर्थात आण्णासाहेब हरी साळुंखे हे होते. त्या संमेलनाचा एका महिन्याच्या आत सगळा हिशोब जाहीर केला गेला. या संमेलनाने महाराष्ट्राच्या वैचारिक वाटचालीत एक वेगळा ठसा उमटवला आहे. विद्रोही साहित्य संस्कृती संमेलने ही विद्रोहीची एक खास ओळख बनलेली आहे. सन २०१६पर्यंत १२ विद्रोही साहित्य संमेलन झाली असून, १३वे विद्रोही साहित्य संमेलन हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे झाले. (२३ व २४ डिसेंबर २०१७ )
विद्रोही सांस्कृतिक चळवळ भूमिका :- विद्रोह म्हणजे प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होय. असा विद्रोह करणारी प्रत्येक व्यक्ती विद्रोही आहे. विद्रोहीच्या मते भारतात दोन परंपरा राहिलेल्या आहेत. यात एक श्रमपरंपरा आहे जी कष्टकऱ्यांची राबणाऱ्या जनतेची समतावादी परंपरा आहे. तर दुसरी परंपरा ही वैदिक-विषमतावादी ऐतखाऊ संस्कृती आहे. विद्रोहीच्या मते भारताच्या सांस्कृतिक इतिहास हा या दोन परंपरांच्या विरोधातून घडलेला आहे. विद्रोही ही श्रमपरंपरेचा वारसा सांगते. विषमतावादी परंपरा ही दुसऱ्या प्रत्येक परंपरेला विरोध करते. श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विचारसरणीचा निर्णायक पराभव व समतावादी जगाची निर्मिती हे विद्रोहीचे ध्येय आहे. त्यामुळेच जातिव्यवस्थेचा अंत, स्त्री-पुरुष विषमतेचा अंत आणि संपूर्ण शोषणमुक्ती ही विद्रोहीMची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
विद्रोह हा शब्द सर्व संकल्पनांमधील काहीतरी नाकारणाऱ्या असल्यामुळे विद्रोही ही नकारात्मक चळवळ वाटते. विद्रोहींच्या मते 'नवीन जगाची निर्मिती करण्यापूर्वी जुन्या वाईट जग नाहीसे करणे गरजेचे असते. कचराकुंडीत गुलाबाचे रोप लावले तर ते जगण्याची शक्यता कमीच त्यासाठी ती जागा साफ करून रोप लावले पाहिजे म्हणून विद्रोहीचे काम हे नकारात्मक नसून सकारात्मकच आहे.'
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आदर् श:- विद्रोहींच्या मतानुसार, 'माणूस इतिहासाच्या खांद्यावर उभे राहून भविष्याचा वेध घेत असतो. इतिहासातील चांगल्या प्रेरणा घेऊन एका चांगल्या जगाची निर्मिती करणे यात काहीही गैर नाही.' त्यामुळे चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चक्रधरस्वामी, बसवण्णा व इतर शरण, नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई व इतर सर्व समतावादी संत परंपरा, छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, क्रांतीबा फुले, सावित्रीमाई, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, गुलाम महाराज, बिरसा मुंडा व इतर आदिवासी क्रांतिकारक उमाजी नाईक, क्रांतिसिंह नाना पाटील, तुकडोजी महाराज, साने गुरुजी, क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवाडी ह्या महामानवांचे विचार, त्यांचे आदर्श ही विद्रोहाची प्रेरणास्थाने आहेत. विद्रोही व्यक्तिपूजा मानत नाही मात्र चांगल्या माणसांचे चांगले विचार पुढे नेण्याचा निश्चित प्रयत्न करते.
विद्रोहीची कार्यपद्धती:- विद्रोही ही प्रामुख्याने सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामुळे प्रस्थापित चुकीच्या गोष्टींना सांस्कृतिक पर्याय देणे हे विद्रोहीचे प्रमुख काम आहे. विद्रोहीच्या वतीने तरुण-तरुणींसाठी अभ्यास शिबिरे घेतली जातात. विद्रोहीच्या विचारांची ओळख करून देणे आणि वर्तमानातील आव्हाने समजून घेणे हे या शिबिरांमधून होत असते. विद्रोही विद्यार्थी संघटना ही विद्रोहीची विद्यार्थी आघाडी आहे. या मार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. या शिवाय विद्रोहीने विविध आंदोलने केलेली आहेत. बडवे-उत्पात हटाव आंदोलन हे त्यामधील एक प्रमुख आंदोलन होते त्याचा परिणाम म्हणून सध्या विठ्ठल मंदिर कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. विद्रोहीच्या मार्फत वारकाऱ्यांसाठी आरोग्यसेवा देखील दरवर्षी पूरवली जाते. पथनाट्य आणि शाहिरी या माध्यमातून प्रबोधन केले जाते. याशिवाय पुस्तकचर्चा, गटचर्चा असे अनेक उप्रकम राबवले जातात. दर महिन्याला मासिक बैठक घेतली जाते. विद्रोहीचे प्रकाशन देखील असून त्यांनी २०पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचे "सम्यक विद्रोही" हे नियतकालिक आहे.
'