विकिपीडिया:मासिक सदर/ऑगस्ट २०१६

पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी अरुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे.

पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात - चैत्री, आषाढी, माघीकार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्‍या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणार्‍या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात.

पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजा या देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. ५१६ मध्ये राष्ट्रकूटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. १२३९ च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. १२९६ मध्ये चालू झाली; तर इ.स. १६५० मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली.

देऊळ व मूर्ती यांवर अनेकदा मुसलमानी आक्रमणे झाली व प्रत्येक वेळी मंदिर परत बांधण्यात आले. काहींच्या मते हे स्थान मूलतः शिवाचे होते तर वैष्णव पंथीय हे विष्णूचे स्थान मानतात. जैन धर्मीय यास नेमीनाथ समजतात तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवतास सूर्याचा अंशही मानतात.


पुढे वाचा... पंढरपूर