विकिपीडिया:मासिक सदर/एप्रिल २००९

मुखपृष्ठ सदर लेख
नागपूरातील शून्य मैल दगड
नागपूरातील शून्य मैल दगड

नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरास 'संत्रेनगरी' असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत व संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे. नुकताच शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वात वर असतो. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४०° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते.

नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवाळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स.९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.पुढे वाचा...