विकिपीडिया:ज्ञान आणि अथवा माहिती पोकळी
{{पोकळी}} हा साचा मराठी विकिपीडियातील लेख/विभाग/वाक्यांमध्ये ज्ञान अथवा माहितीची पोकळी / कमतरता (इन्फर्मेशन आणि नॉलेज गॅप) वाचकास जाणवल्यास लावला जातो/जावा.
बऱ्याच वेळा ज्ञान माहिती स्रोत उपलब्ध असूनही पुरेसे प्रयत्न न केल्यामुळे मराठी विकिपीडियातील लेख/विभाग/वाक्यांमध्ये माहितीची पोकळी निर्माण झालेली असते. अथवा बऱ्याचवेळा मराठी भाषेतील माहिती स्रोतांच्या अभावामुळेही अशी माहिती पोकळी निर्माण झालेली असू शकते. वेगवेगळ्या वाक्यरचना करुन ह्या पोकळ्या दुर्लक्षिल्या जातात अथवा लपवल्या जातात. विश्वासार्ह संदर्भ स्रोतांचा अभाव, विशेषणांचा आणि अलंकारिक भाषेचा वापर अशा काही प्रकारांनी माहिती पोकळी दडवली जाते. माहिती पोकळी दडवली गेल्याने खऱ्या अर्थाने ज्ञान आणि माहितीचा संग्रह वाढण्यास अडथळा येतो. अशा माहिती पोकळींकडे दुर्लक्ष होऊ नये, अशा माहिती ज्ञान पोकळ्या मराठी वाचकांच्या लक्षात याव्यात आणि कुणालातरी (इन्फर्मेशन आणि नॉलेज गॅप) कमी करण्यास प्रोत्साहन मिळावे या अपेक्षेने हा साचा लावण्यात आला असतो.
माहितीची खात्री करणे ही इतर माध्यमांतील लेखक आणि पत्रकारांची पहिली जबाबदारी असते. लेखक/पत्रकारांनी व्यक्ती, प्रसंग, घटना, विषय यांची आधी माहिती घ्यावी. दुजोरा घेऊन मग ती माहिती इतर माध्यमांत लिहावी आणि त्यानंतर ती माहिती इतर माध्यमांतील संदर्भांसहित ज्ञानकोशात यावी असा शिरस्ता अपेक्षित असतो. पण मराठी भाषेच्या बाबतीत इतर माध्यमे कमी पडतात म्हणून अशा समस्या उद्भवतात. माहितीतील कमतरता दूर करण्यासाठी अधिक माध्यमांतून शोध घ्यावाच, त्या व्यतिरिक्त इतर चर्चात्मक मराठी संस्थळांवर माहितीसाठी आवाहन करता येऊ शकेल का ते पहावे.
समीक्षा पोकळी
संपादन- {{समीक्षापोकळी}}
बाजूच्या चित्रात दाखवल्या प्रमाणे एखाद्या माहिती अथवा ज्ञानांशाची नोंद ज्ञानकोशात घेण्यापूर्वी त्याची तर्कसुसंगत समीक्षा झालेली असणे अभिप्रेत असते. परंतु एकूण नव्या माहितीच्या, संकल्पनांच्या आणि ज्ञानांशांच्या प्रमाणात तर्कसुसंगत समीक्षा होतेच असे नाही. वस्तुत: समीक्षा झाल्यानंतर समीक्षेची समीक्षा होण्याची पण गरज असते, पण ती अजूनच कमी प्रमाणात उपलब्ध असते. साधारणत: ज्यावर अद्याप टीका झालेली नाही ते ठीक असावे असे गृहीत धरण्याचा आणि एखाद्या पैलूवर टीका झाली असेल तर तीच स्थिती बरोबर धरण्याचा परिपाठ दिसून येतो. काही काही उदाहरणांत काही माहिती अथवा ज्ञानसंकल्पनाअंशाची शतको न शतके समीक्षा झालेली नसते अथवा काही किंवा बरेच पैलू अभ्यासण्याची राहून गेलेले असतात.
काही वेळा समीक्षा लेखन झालेले असून ते ज्ञानकोशीय लेखकांना उपलब्ध झालेले नसणे, किंवा विविध कारणांनी त्यांच्याकडून दुर्लक्षले जाणे, अथवा नजरेतून सुटणे असेही होऊ शकते. समीक्षा पोकळी निदर्शनास आणल्या नाहीत अथवा दुर्लक्षिल्या गेल्या तर ज्ञानकोशीय नोंदीचा समतोल ढळलेला आहे असे दिसते.
समीक्षा पोकळी भरून काढण्याचे काम ज्ञानकोशांचे नसते. फारतर समीक्षा पोकळीकडे निर्देश करता येऊ शकतो. आणि ज्ञानकोशांशिवाय इतरत्र लेखन आणि चर्चा करून त्यावर काही उलट सुलट प्रतिक्रिया/समीक्षा येतात का - त्यासाठी पुरेसा काळ /अवधी देऊन - आणि त्या विचारांत घेऊन, मगच ज्ञानकोशात त्याची समतोल दखल घेतली जाण्याची अपेक्षा असते. यादृष्टीने आंतरजालावर संवाद संकेतस्थळांची उपलब्धता असते.
मराठी लेखनातून अशा स्वरूपाचे समीक्षा पोकळीचे मोठे प्रमाण आढळून येते; आणि त्याकडे निर्देश करण्याच्या दृष्टीने विकिपीडियावर समीक्षापोकळी असा साचा योजलेला असतो.. ज्या नोंदी/ओळीपुढे समीक्षा पोकळी असा साचा सापडेल तेथे काही समीक्षा ग्रंथ उपलब्ध आहेत का याचा धांडोळा घेऊन त्यांचा संदर्भ देणे शक्य असल्यास पहावे. स्वत:स समीक्षा/ऊहापोह करावयाचा असल्यास विकिपीडिया शिवाय शक्यतो जेथे तटस्थ चर्चा शक्य असेल अशा माध्यमांतून करावा. त्याची दखल घेणे शक्यतोवर त्रयस्थ विकिपीडियनवर सोपवावे. स्वत: घेतल्यास झालेल्या टिकेसहित अत्यंत तटस्थतेने दखल घ्यावी.