विकिपीडिया:जवळपास सर्व वाक्यांना संदर्भ का दिले जावेत
हे पान एक निबंध आहे.. यात एक किंवा अधिक विकिपीडिया सदस्यांचा सल्ला किंवा मते आहेत. हे पान विकिपीडियाच्या धोरण किंवा मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक नाही कारण ते समुदायाने मतदान किंवा इतर प्रक्रियेने मान्य केलेले नाही. निबंधामध्ये सर्वसामान्यपणे सर्वमान्य नियम अथवा काही सदस्यांना मान्य असलेले नियमच दर्शविले जातात. |
या पानाचा थोडक्यात अर्थ: विश्वकोशात सर्वच माहिती पडताळण्यायोग्य असावी त्यामुळे बहुतांश वाक्यांना संदर्भ असणे आवश्यक आहे. |
विकिपीडिया:पडताळण्याजोगे ह्या धोरणानूसार विश्वकोशात सहभागी केला जात असलेला सर्वच मजकूर वैध संदर्भासहित असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा आहे की, कोणत्याही वाचकाला ह्या विश्वकोशाचे वाचन करताना, येथील मजकूराची सत्यता सहज पडताळता आली पाहिजे. म्हणूनच येथे जोडलेल्या मजकूराला ओळीतच दिलेले संदर्भ असणे आवश्यक आहेत ज्याचा वापर प्रत्येक विधानाची सत्यता पडताळण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचाच वापर करून कोणताही वाचक येथील मजकूराच्या ओळीत दिलेला संदर्भ प्रत्यक्ष वाचून येथील विधानांची पडताळणी करू शकतो.
येथील मजकूर नि:पक्षपातीपणे लिहिला जाणे अपेक्षित आहे. शिवाय येथील मजकूरात स्वत:चे संशोधन मांडण्यास सक्त मनाई आहे. आधी प्रकाशित झालेल्या संशोधनांवर आधारित विश्वकोशीय लिखाण येते अपेक्षित आहे. आणि त्याच्या पडताळणीसाठी म्हणूनच प्रत्येक विधानाच्या शेवटीच, म्हणजे ओळीच्या शेवटीच संदर्भ जोडला जाणे आवश्यक ठरते जेणेकरून त्या विशिष्ट ओळीच्या सत्यतेची पडताळणी वाचकाला करता येते. अनेकदा संपूर्ण परिच्छेदाला मिळून एकच संदर्भ दिल्याचे दिसते, त्याचा तोटा असा होतो की, त्या परिच्छेदातील सर्वच विधाने त्या एकाच संदर्भाने तपासता येत नाहीत. शिवाय विकिकरणाच्या प्रक्रियेत अनेकदा मजकूराची पुर्नरचना होत असते, त्या पुर्नरचनेत विधाने आणि त्याला दिलेले संदर्भ ह्यांची जागा बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो प्रत्येक विधानाच्या शेवटी संदर्भ दिले जाणे अपेक्षित आहे. जेणेकरून संदर्भहीन मजकूर वगळला जाण्याची शक्यता कमी करता येते.