विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१५०८०६
ग्रीक संस्कृती चा उदय इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहाल-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.
डोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.
पुढे कालांतराने आपापंसातल्या युद्धामुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ बनली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरांज्यावर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली.
ग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्यछोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात. (पुढे वाचा...)