वसुधा सरदार या मराठी समाजसेवक आहेत. या पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील पारगाव येथील नवनिर्माण न्यासच्या कार्यकारी विश्वस्त आहेत.

पूर्वेतिहास

संपादन

वसुधा सरदार यांचे बालपण मुंबईतील दिंडोशी-गोरेगांव भागात गेले. ते गाव तेव्हा खेडे होते. वसुधाबाई इंटरला जाईपर्यंत गावात वीज नव्हती. त्यांचे वडील (आबा), मृणाल गोरे आणि बाबूराव सामंत यांसारखे सामाजिक कार्यकर्ते गावात रहात. त्यांचा घरात राबता असे. ते पाहून वसुधा सरदार यांना सामाजिक कार्याची ओढ वाटू लागली.

वसुधा सरदार मॅट्रिक झाल्या त्यावर्षी मे महिन्याच्या सुट्टीत बाबा आमटे यांनी जी पहिली ‘श्रमसंस्कार छावणी’ आयोजित केली होती, तिच्यात ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’तर्फे वसुधाबाई आणि गावातली पंधरा-वीस मुले सामील झाली होती. सकाळी सपाटून काम आणि दुपारी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्याने-चर्चा चालत. या पंधरा दिवसांच्या अनुभवाने वसुधाबाईंनी पुढच्या आयुष्यात सामाजिक काम करायचे हे नक्की झाले.

उत्क्रांति दल

संपादन

श्रमसंस्कार छावणीतले मुले नंतर ‘उत्क्रांती दल’ या नावाने एकत्र भेटू लागली. केशव गोरे स्मारक ट्रस्ट्च्या कार्यालयात विविध विषयांवरील कात्रणांचा मोठा संग्रह होता. ही कात्रणे व्यवस्थित चिकटवणे, वाचणे ट्रस्टच्या छोट्या-मोठ्या उपक्रमांत सहभाग घेणे, बोरीवलीजवळच्या मागाठाणे पाड्यावरच्या आदिवासींच्या शेतात विहीर खणणे, त्यांना सुधारित पद्धतीने भातलागवड शिकवणे वगैरेंतून वसुधाबाईंना सामाजिक प्रश्नांची तोंडओळख व्हायला लागली. तेव्हाच ‘मन, मेंदू आणि मनगट’ यांनी संघटितपणे काम करण्याचा वस्तुपाठ मिळाला. पालघर भागातल्या कर्जप्रश्नाच्या निमित्ताने आदिवासी समाजाची ओळख झाली. तेथे अफाट दारिद्रय़ होते. विकासाचं वारं पोचलं नव्हतं. सरकारी योजनांचा पत्ता नव्हता. भूमिमुक्ती आंदोलनामुळे खासगी सावकारांकडून कर्ज मिळण्याचा पारंपरिक मार्ग बंद झाल्यामुळे बँकेकडून पीक कर्ज देऊन त्यांना त्यांच्या जमिनीवर उभे करण्याचा कार्यक्रम आबांनी काही सहकाऱ्यांसह सुरू केला होता. रचनात्मक संघर्षांचा हा प्रयोग अनेक कारणांमुळे अल्पजीवी ठरला. पण मोठ्या सुट्टय़ांत आणि नंतर वर्षभर तिथे जाऊन राहण्याचा वसुधाबाईंना अनुभव आला.

विवाह

संपादन

पालघर येथे काम करत असतानाचा वसुधाबाईंची युवक क्रांति दलाच्या अजित सरदार यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. आणीबाणीत युक्रांदचे अनेक कार्यकर्ते मिसाखाली तरुंगामध्ये होते. रजिस्टर्ड लग्नाची नोटीस दिली आणि दुसऱ्याच दिवशी अजितना अटक झाली. तुरुंगात एकवटलेल्या अनेक नेत्यांच्या प्रयत्‍नांनी त्यांना शेवटच्या क्षणी पॅरोल मिळाला आणि ठरलेल्या दिवशी २६ जानेवारी १९७६ला वसुधा आणि अजित सरदार यांचे लग्न झाले.

स्त्रीविषयक चळवळीतले कार्य

संपादन

लग्न होऊन पुण्यात राहायला आल्यावर वसुधा सरदार यांचा स्त्रीचळवळीशी संबंध आला. पुणे शहर मोलकरीण संघटनेच्या कामात इतर कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी सुरुवातीला बराच काळ काम केलं. ‘साद युवती मंच’ हे कॉलेज युवतींसाठी केलेले व्यासपीठ काही वर्षे चांगले चालून एक दिवस बंद पडले. मात्र या सर्वांतून वसुधा सरदार यांची समज वाढली.

नवनिर्माण न्यास

संपादन

वसुधा सरदार यांच्या वडलांनी १९८५मध्ये दौंड तालुक्यातील पारगावला ‘नवनिर्माण न्यास’ ही स्वयंसेवी संस्था काढली. त्यामार्फत वसुधाबाईचा पुन्हा एकदा ग्रामीण महिलांशी जवळून संबंध आला. या न्यासामार्फत परिसरातील १० गावांमध्ये मुक्तशाळा चालवण्यात येते तसेच १५ गावांमध्ये २०० बचत गटांमार्फत महिला विकासाचे, प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जातात. दारूमुक्तीसाठी विविध मार्गानी चळवळ उभारणी केली जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २००३ पासून सेंद्रिय शेतीच्या अवलंबासाठी प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. त्यापूर्वीही युक्रांदच्या माध्यमातून, स्त्री चळवळींच्या माध्यमातून वसुधा सरदार यांनी सामाजिक कार्य केले. त्यांच्या शेतीविषय आणि अन्य सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार प्रदान झाले आहेत.

पुरस्कार

संपादन
  • भारत कृषक समाज कृषी पुरस्कार
  • किसान रक्षक पुरस्कार
  • विवेकरत्‍न पुरस्कार