वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या परभणी शहरातील हे एक प्रसिद्ध कृषी विद्यापीठ आहे. कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी राज्यात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली.त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. या कृषी विद्यापीठ उभारणीत वसंतराव नाईक यांचे शेती व शेतकरीवरील नितांत प्रेम आणि दूरदृष्टी होती.
१८ मे १९७२ रोजी वसंतराव नाईक सरकारने मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणी येथे केली. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलले आणि त्याचे नाव 'वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ' असे करण्यात आले. वसंतराव नाईकांचे कृषी क्षेत्रातील मोलाचे कार्य लक्षात घेऊन नोव्हेंबर २०१२ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषित केले. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव बदलून ते वसंतराव नाईक यांच्या नावावर ठेवण्यात आले. मराठवाड्यातील आठही जिल्हे हे या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. २०१४ पर्यंत, या विद्यापीठात १२ घटक महाविद्यालये आणि ३२ संलग्न महाविद्यालये आहेत, ज्यांची एकूण विद्यार्थी घेण्याची क्षमता ४१७५ विद्यार्थी इतकी आहे. घटक महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम, तर संलग्न महाविद्यालयात फक्त पदवी शिक्षण घेतले आहे. विद्यापीठात ९ घटक कृषी शाळा आणि ५३ संलग्न शाळा आहेत, ज्यामध्ये एकूण ३२७० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते. या विद्यापीठामध्ये आणि याच्या अंतर्गत वेगवेगळी महाविद्यालये आहेत. त्यामध्ये कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय (अलीकडे याचे नाव बदलून सामुदायिक विज्ञान महाविद्यालय असे करण्यात आले आहे), अन्नतंत्र महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इत्यादींचा समावेश होतो. या विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठामध्ये पशुवैद्यक आणि पशुविद्यान महाविद्यालयाचाही समावेश होता, परंतु महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या स्थापनेनंतर हे महाविद्यालय २००० - २००१ या वर्षात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठापासून वेगळे झाले. या विद्यापीठामध्ये वेगवेगळी पदविका, पदवी, पदविउत्तर, तसेच आचार्य पदवी अभ्यासकमे घेतली जातात. या विद्यापीठामध्ये शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विस्तार शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या १२ घटक महाविद्यालये:
१. कृषी महाविद्यालय, परभणी (स्थापना १९५६)
२. कृषी महाविद्यालय, लातूर (स्थापना १९८७)
३. कृषी महाविद्यालय, आंबेजोगाई (स्थापना २०००)
४. कृषी महाविद्यालय, बदनापूर, जिल्हा जालना (स्थापना २०००)
५. कृषी महाविद्यालय, उस्मानाबाद (स्थापना २०००)
६. कृषी महाविद्यालय, गोळेगाव
७. उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी (स्थापना १९८४)
८. अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी (स्थापना १९७६)
९. वसंतराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर (स्थापना २००६)
१०. कृषी अभीयांत्रिकी महाविद्यालय, परभणी (स्थापना १९८६)
११. गृहविज्ञान महाविद्यालय, परभणी (स्थापना १९७६) (२०१८ पासून बदललेले नाव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी)
१२. कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूर (स्थापना २००९)