१९७० मध्‍ये सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे 'बंगाली' शिकण्‍यासाठी शांतिनिकेतनामध्‍ये आपल्‍या पत्‍नीसह काही दिवस जाऊन राहिले होते. तेथे त्‍यांनी बंगाली भाषा शिकण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रयत्‍नांतील आनंद, तसेच बंगालमधील तत्‍कालीन सामाजिक परिस्थिती, शांतिनिकेतनचे राष्‍ट्रीयीकरण झाल्‍यानंतरची सदर संस्‍थेची परिस्थिती व तेथील लोकांची मनस्थिती, या बंगालच्‍या यात्रेत भेटलेली लक्षात राहण्‍यासारखी माणसे यांचे वर्णन पु. लं.नी 'वंगचित्रे' या पुस्‍तकात केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे सदर पुस्‍तकाच्‍या विक्रीतून आलेले उत्‍पन्न काही सामाजिक कार्यासाठी (दान करण्‍यासाठी) वापरले जाते. मी वाचलेल्‍या पु. लं. च्‍या पुस्‍तकांमधील मला सर्वात जास्‍त आवडलेले हे पुस्‍तक आहे. छोट्या छोट्या वाटणा-या मात्र मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्‍टींवर या पुस्‍तकामध्‍ये सुंदर मार्गदर्शन मिळते. उदाहरणार्थ मुलांना त्‍यांच्‍या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे हा विषय किंवा मुलांचा मोठे होतांना विकास कसा होतो. या सर्वांचा आनंद घेण्‍यासाठी हे पुस्‍तक वाचणे गरजेचे आहे.

वंगचित्रे
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार अनुभव कथन, प्रवासवर्णन
प्रकाशन संस्था साकेत प्रकाशन (सध्‍याचे प्रकाशक)
विषय अनुभव कथन, प्रवासवर्णन
पृष्ठसंख्या २२९
आय.एस.बी.एन. ८१-८७००२-११-५

रविंद्रनाथ टागोरांनी लहान मुलांच्‍यासाठी लिहिलेली पुस्‍तके 'सहजपाठ'. याविषयी पु.ल. भरभरून लिहितात आणि आपल्‍या बालपणी वाचनासाठी असलेल्‍या रुक्ष धड्यांशी तूलना करतात. आपण शिकत आहोत असे मुलांना न वाटता सहज शिक्षण घडावे असा उद्देश 'सहजपाठ'चा आहे हे ते आवर्जून सांगतात. मुलांना न पेलणा-या गोष्‍टी सहजपाठामध्‍ये दिलेल्‍याच नाहीत. खाणे, गाणे, सुट्टी, शेते, पाने, फळे, फुले या बालविश्वातील आवडीच्‍या गोष्‍टी सहजपाठामध्‍ये दिलेल्‍या आहेत. सहजपाठाची जादू बंगाली जनमानसावर (पुस्‍तकाच्‍या प्रथम प्रकाशनाचे वर्ष १९७०) अजूनही कशी आहे याचा निर्वाळा पु.ल. देतात. एका कौटुंबिक समारंभामध्‍ये सहजपाठाची गाणी सुरू झाल्‍यावर लहान, मोठे सर्वजण ती गाणी उत्‍स्‍फूर्तपणे गाऊ लागले व ते दृश्‍य पाहून पु.ल. प्रभावित झाले. आपल्‍या देशाला एकतेच्‍या धाग्‍यामध्‍ये बांधण्‍यासाठी सूर, नाद यांच्‍या अनुषंगाने काही गाणी तयार करून ती सर्व प्रांतांतल्‍या मुलांना शिकवावील असे देखील पु.ल. सुचवितात.