लोकसाहित्य शब्दकोश हा लोकसाहित्यातील भाषेचा शब्दकोश आहे. मराठीतील या प्रकारचा हा पहिला कोश आहे.

संपादक

संपादन

या कोशाच्या संपादिका कै. डॉ. सरोजिनी बाबर या आहेत. तसेच शब्द संकलनात गजमल माळी व ग.मो. पाटील यांचेही योगदान आहे.

बाळाला तीट लावताना आई 'अडगुलं मडगुलं, सोन्याच कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट लावू' असे म्हणते. पण 'अडगुलं', 'मडगुलं' आणि 'कडगुलं' या शब्दांचा किंवा अशाच विसरलेल्या अस्सल मराठी शब्दांचे अर्थ सांगणारा हा 'लोकसाहित्य शब्दकोश' आहे. डॉ. सरोजीनी बाबर यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत हिंडून प्रचंड प्रमाणात लोकगीते, लोकसाहित्य गोळा केले आहे. त्यांनी स्वतः संपादित केलेल्या किंवा इतरांच्या लोकसात्यविषयक पुस्तकांतील शब्दांचे अर्थ सांगणारा हा कोश आहे.

नाकातून रक्त आले की खेडयातील मुले 'घोणा फुटला' असे म्हणतात. हा कोश वापरला तर 'घोणा' याचा अर्थ नाक हे तर समजेलच, शिवाय 'गांजली द्रौपदी गांजली कोणा कोणा पायी पांडवांनी खाली घातल्या घोणा' अशा ओळीही मिळतील. 'शिंग वाजतं शिंगनापुरी कर्ना वाजतो कोल्हापुरी' या ओळी पाहिल्या तर शिंग आणि कर्णा ही वेगवेगळी वाद्ये असल्याचे लक्षात येईल.

'हारा बाई हरकुलं ' यांतील 'हारा' शब्द पाहिला तर छोटीशी टोपली घेऊन बोरे गोळा करण्यासाठी निघालेल्या आणि मित्रमंडळींना गोळा करणाऱ्या मुलांचे चित्र डोळयापुढे उभे राहील. अनेक गावांत 'लेंडीनाला', 'लेंडी ओहोळ' असे लहानसे नाले असतात. हा कोश पाहिल्यावर 'लेंडीं' म्हणजे नाला किंवा ओहोळ हा अर्थ कळेल. पिवळ्या पीतांबरसारखाच हा प्रकार आहे. मराठमोळा या शब्दासारखाच बामनमोळा असाही शब्द मराठीत असल्याचा शोध लागेल. साड्यांमध्ये 'बादला' म्हणून प्रकार असतो किंवा 'बादली' फेटा हा शब्द वाचण्यात येतो. त्याचा अर्थ समजेल आणि त्याचा पाण्याच्या 'बादलीशी' संबंध नाही हे कळेल. लोकगीतांतील आणि कहाण्यांतील न कळणारे शब्द या लोकसाहित्याच्या शब्दकोशात मिळतात.

वैशिष्ट्ये

संपादन

या कोशात लोकसाहित्यातील शब्दांचे अर्थ प्रमाण मराठीप्रमाणेच इंग्रजीतूनही दिले आहेत. उदा० अगर : टोक,शेवट; tip,end (जातं कां ओढावं नखाबोटाच्या अगरी, आई तुझं दुध पिलें मधाच्या घागरी[])

इतर तपशील

संपादन
  • प्रकाशक - महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य माला
  • पुष्प अठरावे, पृष्ठे - ३९१
  • प्रकाशन वर्ष - १९७३


संदर्भ

संपादन
  1. ^ जा माझ्या माहेरा - संपादिका सरोजिनी बाबर, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य माला, पुष्प आठवे- पहिली आवृत्ती १९६३