लेनर्ड ब्लूमफिल्ड (१८८७ - १९५९) हा अमेरिकन संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा language हा ग्रंथ १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील त्याच्या विचारांचा प्रभाव पुढे चॉम्स्कीच्या Syntactic Structure हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे १९५७ पर्यंत होता. त्याच्या प्रभावाखाली असलेली विश्लेषण पद्धती १९५७ पर्यंत चालली. तिलाच संरचनावाद म्हणतात. म्हणून ब्लूमफिल्डला अमेरिकन संरचनावादाचे प्रणेते मानले जाते.

अभ्यास परंपरा

संपादन

ब्लूमफिल्डची अभ्यास परंपरा फ्रांझ बोस यांची होती. १९११ साली फ्रांझ बोस याने, ‘प्रत्येक भाषा अनन्य असते’ असे म्हणले. आपल्याला परिचित अशा भाषेचे व्याकरण अपरिचित भाषेवर लादू नये असे बोस यांचे म्हणणे होते.

लेनर्ड ब्लूमफिल्ड यांनी बोस याची काही तत्त्वे स्वीकारून स्वतःची नवी अभ्यासपरंपरा निर्माण केली. या परंपरेने भाषेचा वर्णनात्मक आणि वैज्ञानिक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच अमेरिकन संरचनावाद म्हणतात.

पारंपरिक अभ्यासपद्धती भाषेच्या सर्वसामान्य वैशिष्ट्यावर भर देतात, मात्र त्यातून सर्व भाषांची समान अशी कोणतीही वैशिष्ट्ये सापडत नाही असे ब्लूमफिल्ड यांचे म्हणणे होते. त्यातून त्याने स्वतंत्र अशा भाषाविचार मांडला. 

ब्लूमफिल्डचा भाषाविचार

संपादन

१. ब्लूमफिल्ड यांच्या मते, मूल जन्मतःच भाषा घेऊन येत नाही, त्यामुळे ती अनुवांशिक नसते. भाषा ही जैविक क्रिया नाही तर ती आत्मसात करावी लागणारी क्रिया आहे. त्याच्या मते, मानवी मन कोऱ्या पाटीसारखे असते. मूल जन्मल्यानंतर ते हळुहळू सामाजिक आणि सांस्कृतिक चेतकांना- Stimulation प्रतिसाद देऊ लागते. त्यातूनच ते हळूहळू भाषा शिकू लागते.

२. मानवी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते ती अनुवांशिकतेमुळे नव्हे तर सामाजिक- सांस्कृतिक माध्यामांद्वारा होते.

३. एखादा माणूस कोणती भाषा शिकणार ते तो कोणत्या जाती जमातीत जन्मला यावर ठरत नसते, तर तो कोणत्या समाजात वाढला, शिकला यावर अवलंबून असते.

 ४. याउलट, मानवेतर प्राण्यांच्या बाबतीत असे दिसते की, त्यांची संदेश पद्धती ही जैविक प्रेरणा आहे. ती अनुवांशिक रीतीने संक्रमित होते. परिस्थिती कोणतीही असली तरी प्राणी विशिष्ट प्रकारचेच संदेश पाठवतात, पण मानवाचे तसे नसते. म्हणजे, मानवेतर प्राण्यांचे संदेशवहन पद्धतीचे संक्रमण हे जैविक असते, तर मानवी भाषेच्या बाबतीत ते सांस्कृतिक असते. 

मानसशास्त्रातील वर्तनवादाचे भाषा शास्त्रात उपयोजन

संपादन

ब्लूमफिल्डने सोस्यूरप्रमाणेच व्यक्ती व्यक्तीच्या भाषिक भेदापासून अमूर्त अशी भाषिक संरचना वेगळी काढण्याचा प्रयत्न केला.

ब्लूमफिल्डच्या विवेचनाचा पाया मनोविज्ञानातील वर्तनवाद आहे. मन, विचार, भावना, या संकल्पना निरीक्षण योग्य नाही, म्हणून वर्तनवादाने त्याज्य ठरवल्या. त्यांना निरीक्षण योग्य बनवून मनोविज्ञानाला एक नवी दिशा दिली.

मनोविज्ञान म्हणजे वर्तनविज्ञान आहे अशी त्यांनी भूमिका घेतली आणि शरीरवर्तन हा या भूमिकेचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे मानवी मन ही मुळात कोरी पाटी असते; तिच्यावर बाह्य जगातील वस्तू, स्थिती, घटना आपापले ठसे उमटवत असतात हे वर्तनवादाचे गृहीतक होते.

चेतक आणि प्रतिसाद यांच्या साह्याने कोणत्याही मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देता येते, ज्ञान म्हणजे दुसरे काही नसून विशिष्ट चेतक आणि विशिष्ट प्रतिसाद यांच्यात निर्माण होणारा नित्य संबंध होय, असे या वर्तनवादी मनोवैज्ञानिकांचे मत होते. हा वर्तनवाद मानवी भाषेच्या संदर्भात ब्लूमफिल्डने मांडला. मानव व इतर प्राणी यांच्या संदेशनात भेद असतो; पण तो गुणात्मक कमी संख्यात्मक जास्त असतो. कुत्रा, पोपट आदी प्राण्यांजवळ ठराविक आवाज असतात किंवा जास्त आवाज असले तरी विविध आवाजांना ते विविध प्रतिसाद देत नाहीत. उलट, मानवाकडे आवाज आणि त्यांना दिले जाणारे प्रतिसाद यांची संख्या खूपच जास्त असते. एखाद्या विशिष्ट चेतकांच्या प्रभावामुळे माणूस स्वरयंत्राच्या माध्यमातून विविध आवाज काढत असतो आणि त्याच्या भोवतालची माणसे ते आवाज ऐकून योग्य त्या प्रतिक्रिया देत असतो. तशी कृती करत असतो.

. यातून त्याने वाचिक वर्तनाची संकल्पना मांडली आहे.

ब्लूमफिल्डचा वाचिक वर्तन सिद्धांत

संपादन

ब्लूमफिल्डच्या मते, एकाचे कथन म्हणजे आवाज ऐकून दुसऱ्याने त्याला कृतीतून प्रतिसाद देणे हेच वाचिक वर्तन होय.

ब्लुमफील्डच्या मते, भाषेच्या माध्यमातून एकाने सांगितलेली गोष्ट किंवा केलेले कथन दुसरा माणूस तीच गोष्ट क्रियेच्या माध्यमातून करू शकतो. हीच वाचिक वर्तन क्रिया होय.  

उदा. शामराव नावाच्या व्यक्तीला शेतात गाय दिसली तर तिने नुकसान करू नये म्हणून तो रामरावला तो ‘गाय बांध’ असे म्हणतो. रामराव शामरावने केलेले कथन समजून घेऊन गाय बांधण्याची क्रिया करतो. भाषाच नसती तर शामराव रामरावला गाय बांधण्यास सांगू शकत नव्हता. उलट ही क्रिया त्याला स्वतः करावी लागली असती.

ब्लुमफील्डच्या मते, मूक प्राण्यांच्या क्रियात्मक वर्तनापेक्षा मानव भाषेच्या द्वारे वाचिक वर्तन करू शकतो. शामरावने उच्चारलेला ध्वनी रामराव तेव्हाच आत्मसात करू शकतो, जेव्हा वाक्यामागील सामाजिक संकेत दोघांचेही सारखेच असतात.

हे संकेत शामरावने उच्चारलेल्या ध्वनींचा अर्थ होय. या अर्थाद्वारेच शामरावाने सांगितलेली क्रिया रामराव आपल्या वर्तनातून नियंत्रित करू शकतो.

अशा तऱ्हेने भाषेचा व्ध्वनी आणि अर्थ अशा दोन पातळीवर वापर होत असतो.

अशा प्रकारे ब्लूमफिल्डचा वाचिक वर्तन सिद्धान्त सांगता येतो.

भाषा : एक यांत्रिक क्रिया 

संपादन

ब्लूमफिल्ड भाषा ही जैविक क्रिया नसून ती एक यांत्रिक क्रिया आहे असे मानतो. याचा अर्थ, तो मनोविज्ञानाला विरोध करतो ; तो भौतिकवाद व यांत्रिकवाद ग्राह्य मानून भाषेचे विश्लेषण करतो.

त्याच्या मते, बोलणे हे पर्यावरणातील समोरच्या घटनेवर अवलंबून असते. आपण पर्यावरणातील गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार भाषेचा वापर करीत असतो. म्हणून तो भाषेच्या संरचनेला आणि कार्यप्रणालीला ट्रिगर मशीन  संबोधतो. भाषा ही मज्जातंतू व्यवस्थेद्वारे चालणारी व्यवस्था मानतो.

बटन दाबताच जशी ट्रिगर मशीन जशी सुरू होते तशी मज्जातंतूच्या आदेशानुसार भाषा सुरू होते असे त्याचे म्हणणे आहे.

अशाप्रकारे ब्लूमफिल्ड भाषेच्या ध्वनी म्हणजेच स्वनिमविचारालाच प्राधान्य देतो. अर्थविचाराला नाही.

मनोविज्ञानवादाची पार्श्वभूमी

संपादन

आपण भाषेत केवळ स्वनिमांचा वापर करत नाही. तर त्या स्वनिमांपासून अनेक अर्थपूर्ण संरचना करीत असतो. या संरचनेतूनच आपण भाषिक संप्रेषण करीत असतो. अर्थात, ब्लूमफिल्ड सारख्या वर्तनवाद्यांनी मांडलेला सिद्धान्त आधुनिक भाषाविज्ञानाला नवी दिशा देणारा ठरला आणि अर्थविचाराला प्राधान्य देणारा मनोविज्ञानवाद त्यातून उदयास आला

संदर्भ ग्रंथ

संपादन

१. मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन, पुणे, २००३

२. आधुनिक भाषाविज्ञान : मिलिंद मालशे, लोकवाङ्मयगृह, मुंबई,२००९